Sunday, 29 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 निमलष्करी दलातील प्रत्येक जवान वर्षातले शंभर दिवस तरी आपल्या कुटुंबासोबत घालवू शकेल, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महानिदेशालयाच्या इमारतीची पायाभरणी करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबांची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं असून, राज्य सरकारला जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य कार्ड उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जवानांना घराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही एक समिती गठित केली आहे, असं त्यांनी नमूद केलं.  

****



 झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी, आज रांची इथं झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी, सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांच्यासह डॉ. रामेश्वर उरांव, आलमगीर आलम आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.



 यावेळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तसंच राष्ट्रीय जनता दलाचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.



 झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा - कॉंग्रेस - राष्ट्रीय जनता दल आघाडीनं ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या होत्या.

****



 सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसेना आणि कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्याचं तिरडी मोर्चा काढून दहन केलं. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं. पोलीस आणि आंदोलक यांच्यात यावेळी झटापट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 अतिवृष्टी, लांबलेला पावसाळा आणि आता ढगाळ वातावरणाचा आंबा पिकाला मोठाच फटका बसण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हयात ४२ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. त्यापैकी १४ हजार हेक्टर क्षेत्रफळ उप्तादनक्षम आहे. यातून दरवर्षी २१ हजार मेट्रिक टन आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र हवामान काही दिवस असंच राहिलं, तर आंबा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचं आमच्या रायगडच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 औरंगाबाद-जालना महामार्गावर गेवराई बाजार फाट्यावर जेसीबी घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा दुपारी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात कंटेनर चालक आणि ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या दूधपुरी इथं शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सिद्धेश्वर रामकिसन धांडे, शुभम कल्याण पाटोळे अशी मृतांची नावं असून, दोघेही काल सायंकाळपासून बेपत्ता होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 नांदेड-पुणे एक्सप्रेस रेल्वेगाडी आज तिच्या ठरलेल्या वेळेपेक्षा दीड तास उशिरा धावणार आहे. पुण्याहून येणारी रेल्वेगाडी उशिरा धावत असल्यामुळे नांदेड रेल्वेस्थानकातून रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटणारी ही गाडी, रात्री अकरा वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****



 नाशिक-पंचवटी एक्सप्रेसला पर्याय म्हणून मनमाड ते मुंबई ही राज्यराणी इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु, आता ती मनमाडऐवजी नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी आज नाशिक रोड येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांनी निदर्शनं केली. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

*****

***

आकाशवाणी औरंगाबाद दि.29.12.2019 संध्याकाळी सहा वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – सिंधदुर्ग जिल्हा वार्तापत्र दिनांक– २९.१२.२०१९

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 29.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा.

****

देशाला तरुण पिढीकडून अनेक अपेक्षा आहेत. या तरुणांनीच देशाला नवीन उंचीवर न्यायचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा साठावा भाग आज प्रसारित झाला.

दोन दिवसांत २०२० हे नवीन वर्ष सुरू होणार असून, आपण २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणार असल्याचं ते म्हणाले. २१ व्या शतकातली ही सोशल मीडियाची, प्रतिभावान पिढी, देशाच्या विकासाला गती देण्यात सक्रिय भूमिका बजावेल, असंही पंतप्रधान म्हणाले. एखादी व्यवस्था योग्य रीतीनं काम करत नसेल, तर आजचे युवक अस्वस्थ होतात आणि धैर्यानं व्यवस्थेला जाब देखील विचारतात, हे आपल्याला चांगलं लक्षण वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. या दशकातल्या प्रत्येक तरुणानं आपल्या जबाबदारीवर चिंतन केलं पाहिजे, आणि या दशकासाठी एखादा संकल्प देखील केला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. कन्याकुमारी मध्ये ज्या दगडावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती, तिथे जे विवेकानंद यांचं शिळा स्मारक आहे, त्याला ५० वर्ष पूर्ण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

२०२२ मध्ये स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, कमीतकमी या दोन-तीन वर्षांत आपण स्थानिक, आपल्या देशवासीयांच्या हातांनी बनलेली उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन केलं. स्थानिक उत्पादनांना आपल्या प्रतिष्ठा आणि अभिमानासोबत जोडून आपण आपल्या देशवासीयांना समृद्ध करण्याचं माध्यम बनू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले.

नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विक्रमी काम झाल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, इतकं काम होणं हे भारतीय लोकशाहीची ताकत आणि लोकशाहीवर असलेला विश्वास दर्शवतो, असं म्हटलं. दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, सर्व राजकीय पक्ष, सर्व खासदारांच्या सक्रिय भूमिकेबद्दल पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं.

नुकत्याच झालेल्या या दशकातल्या शेवटच्या सूर्यग्रहणाचाही पंतप्रधानांनी या कार्यक्रमात उल्लेख केला.

जानेवारी महिन्यात साजरे होणारे विविध सण, महाराष्ट्रात संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये लोहड़ी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आणि आसाममध्ये माघ-बिहू, हे सण आपल्याला भारताचं ऐक्य आणि विविधतेची आठवण करून देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

नवीन वर्ष, नवीन दशक, नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह - चला पुढे जाऊया, असं सांगून पंतप्रधानांनी, देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल, आज संध्याकाळी प्रख्यात चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना, नवी दिल्ली इथं दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय सिनेमाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके यांच्या नावानं हा पुरस्कार १९६९ मध्ये सुरू करण्यात आला होता. भारतीय सिनेमाच्या विकासात उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार सरकारकडून देण्यात येतो. सुवर्ण कमळ आणि दहा लाख रुपये रोख, असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

****

महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमाभागात सांगली इथून जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सीमाप्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. कन्नड भाषिक नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना गोळ्या घाला, असं वक्तव्य केल्यामुळे सीमेलगतच्या भागात तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर आणि सांगलीकडून कर्नाटकात येणाऱ्या बसेस सकाळपासून बंद झाल्या आहेत. तसंच या मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दररोज सांगली-बेळगाव मार्गावर १२० एसटी बसेस ये-जा करतात, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद इथं बीबी का मकबरा परिसरात इतिहासप्रेमींच्या वतीनं हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी साडेसात वाजता या वॉकला सुरूवात झाली. यात इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरैशी आणि रफत कुरैशी यांनी बीबीका मकबऱ्याविषयी इतिहासप्रेमींना मार्गदर्शन केलं.

****


आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 29.12.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Akashwani Aurangabad Urdu News Bulletin 8.40 AM 29-12-2019

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...