Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
निमलष्करी दलातील प्रत्येक जवान वर्षातले शंभर दिवस
तरी आपल्या कुटुंबासोबत घालवू शकेल, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महानिदेशालयाच्या
इमारतीची पायाभरणी करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा रक्षकांच्या
कुटुंबांची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं असून, राज्य सरकारला जवानांच्या कुटुंबियांना
आरोग्य कार्ड उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जवानांना घराची सुविधा उपलब्ध
करुन देण्यासाठीही एक समिती गठित केली आहे, असं त्यांनी नमूद केलं.
****
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी,
आज रांची इथं झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू
यांनी, सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांच्यासह डॉ. रामेश्वर उरांव, आलमगीर आलम आणि
राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
यावेळी माजी राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, कॉंग्रेस सरचिटणीस
प्रियंका गांधी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल,
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी
पक्षाचे अखिलेश यादव, तसंच राष्ट्रीय जनता दलाचे नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
झारखंडमध्ये नुकत्याच
झालेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा - कॉंग्रेस - राष्ट्रीय जनता दल आघाडीनं ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या होत्या.
****
सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसेना
आणि कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी
करण्यात आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्याचं
तिरडी मोर्चा काढून दहन केलं. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं. पोलीस आणि आंदोलक यांच्यात यावेळी
झटापट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अतिवृष्टी, लांबलेला पावसाळा आणि आता ढगाळ वातावरणाचा
आंबा पिकाला मोठाच फटका बसण्याची शक्यता आहे. रायगड जिल्हयात ४२ हजार हेक्टर क्षेत्र
आंबा लागवडीखाली आहे. त्यापैकी १४ हजार हेक्टर क्षेत्रफळ उप्तादनक्षम आहे. यातून दरवर्षी
२१ हजार मेट्रिक टन आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र हवामान काही दिवस असंच राहिलं,
तर आंबा पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचं आमच्या रायगडच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबाद-जालना महामार्गावर गेवराई बाजार फाट्यावर
जेसीबी घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा दुपारी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात
कंटेनर चालक आणि ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघे जखमी झाले आहेत. जखमींना
तातडीनं उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या दूधपुरी
इथं शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली.
सिद्धेश्वर रामकिसन धांडे, शुभम कल्याण पाटोळे अशी मृतांची नावं असून, दोघेही काल सायंकाळपासून
बेपत्ता होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड-पुणे एक्सप्रेस रेल्वेगाडी आज तिच्या ठरलेल्या
वेळेपेक्षा दीड तास उशिरा धावणार आहे. पुण्याहून येणारी रेल्वेगाडी उशिरा धावत असल्यामुळे
नांदेड रेल्वेस्थानकातून रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी सुटणारी ही गाडी, रात्री अकरा
वाजता सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
नाशिक-पंचवटी एक्सप्रेसला पर्याय म्हणून मनमाड ते
मुंबई ही राज्यराणी इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु, आता ती मनमाडऐवजी नांदेडपर्यंत
नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी आज नाशिक रोड
येथील रेल्वे स्थानकावर नागरिकांनी निदर्शनं केली. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी
या आंदोलनाचं नेतृत्व केलं.
*****
***
No comments:
Post a Comment