आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. विधानभवनाच्या प्रागंणात दुपारी एक वाजता हा शपथविधी सोहळा होणार असून एकूण ३६ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महाविकास आघाडी सरकारच्या या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री, पद आणि गॊपनीयतेची शपथ घेतील. तर काँग्रेस पक्षाचे दहा मंत्री शपथ घेणार आहेत, यामध्ये अशोक चव्हाण, के.सी.पडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सुनील केदार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, असलम शेख, सतेज पाटील, आणि विश्वजीत कदम यांचा समावेश आहे.
****
राज्य पोलीस अकादमीच्या उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा दीक्षांत सोहळा आज नाशिक इथं होत आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल उपस्थित आहेत.
****
आझाद हिंद सेनेनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते अंदमानात पहिला ध्वज फडकवण्य़ात आल्याच्या क्षणाचा ७६ वा वर्धापन दिन आज पोर्ट ब्लेअर इथं साजरा झाला. लेफ्टनंट गव्हर्नर अॅडमिरल डी.के. जोशी तसंच आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दुचाकी फेरी तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं.
****
सांगली जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. साखर नियंत्रण कायद्यानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्याचं देयक अदा करणं बंधनकारक आहे. मात्र कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही उसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत. रास्त आणि किफायतयशीर दर - एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचे मान्य करून कारखाने सुरू करण्यात आले. मात्र आता एफ आर पी तीन टप्प्यात देण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र लिहून घेतली जात आहेत, अशी संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment