Thursday, 26 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 नागरिकता सुधारणा विधेयकावरून विरोधी पक्ष देशवासियांची दिशाभूल करत असल्याचं, गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही आज भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय नागरिक नोंदणी एनआरसीच्या मुद्यावरून काँग्रेस पक्षाचे नेते देशभरात संभ्रम पसरवत असल्याचा आरोप केला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्वीट करून, पंतप्रधानांवर टीका केली होती, त्या अनुषंगानं संबित पात्रा बोलत होते. काँग्रेसच्या कार्यकाळात आसाममध्ये तीन डिटेंशन कॅम्प - बंधकगृह उभारण्यात आली होती, तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या निर्देशावरून तरुण गोगोई सरकारनं ही बंधकगृहं उभारल्याचं संबित पात्रा यांनी सांगितलं.

****



 देशात विभाजनासारखी स्थिती आणि अराजकतेचं वातावरण असल्याचं, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून होणाऱ्या हिंसाचाराबद्दल बोलताना राऊत यांनी, देशात हिंसाचाराला प्रेरणा कोणाची आहे ते शोधले पाहिजे, असं नमूद केलं. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला होईल आणि खातेवाटपावरून आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत काहीही मतभेद नाहीत, असं राऊत म्हणाले.

****



 दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज मुंबईत दादरमध्ये धरणे आंदोलन केलं.

****



 पथकर नाक्यांवर कर भरण्यासाठी लागू करण्यात आलेली फास्ट टॅग यंत्रणा भीम ॲपशीही संलंग्न करण्यात आली आहे. या महिन्याच्या पंधरा तारखेपासून चारचाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांना फास्ट टॅगद्वारे पथकराचा भरणा बंधनकारक करण्यात आला आहे.

****



 युवा खेळाडूंनी सराव तसंच परिश्रम करत क्रीडा क्षेत्रात देशाला जागतिक पातळीवर पुढे घेऊन जावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. सोलापूर इथं पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठातल्या २३ व्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झालं, त्यानंतर ते बोलत होते. खेळात एक वेगळी ऊर्जा आहे. खेळामुळे आरोग्य उत्तम राहतं. दुर्दैवाने क्रीडा क्षेत्रात भारत मागे आहे, ऑलम्पिकमध्ये भारताला पदकं कमी मिळतात, अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली.

****



 धुळे महापालिकेच्या एलबीटी अर्थात स्थानिक संस्था कर वसुली मोहिमेला येत्या २६ जानेवारी पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेनं शहरातल्या व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. १५ महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगित केलेली कारवाई पुन्हा सुरू केल्याबद्दल व्यापारी वर्गामध्ये रोष व्यक्त केला जात होता, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला .

****



 आध्यात्माच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत प्रबोधन झालं तर ग्रामीण भाग स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वास स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर यांनी केलं आहे. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात चुडावा ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर आज ते बोलत होते. या ग्रामपंचायतीत शौचालय बांधकाम पूर्ण झालेल्या ७० लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदानाचं वितरण करडखेलकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.

****



 नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आमितसिंह तेहरा यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज झालेल्या या पदाच्या निवडणुकीसाठी तेहरा यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता.

****



 गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्लीचे तहसीलदार सुभाष यादव यांचं आज सकाळी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झालं. ते ३१ वर्षांचे होते. मुळचे अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत इथले रहिवासी असलेले यादव एटापल्ली इथे कार्यरथ होते.

****



 टेनिसपटू लिएंडर पेसने टोक्यो ऑलिम्पिक नंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढच्या हंगामातल्या काही स्पर्धांनंतर निवृत्त होणार असल्याचं पेसनं जाहीर केलं. १९९२ पासून टेनिस कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या लिएंडरने टेनिसमध्ये पुरुष दुहेरीतले आठ तर मिश्र दुहेरीतले दहा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहेत. सात ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा तो एकमेव भारतीय टेनिसपटू आहे.

*****

***

No comments: