Sunday, 22 December 2019

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 22.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****

जनतेनं हिंसाचारापासून दूर राहावं तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं असून नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी यांचा विशिष्ट धर्माच्या लोकांशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भाजपच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भात सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून ही आसामशी संबंधित असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. शेजारच्या देशांमध्ये छळ झाल्यानं भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. सरकारच्या प्रयत्नांमधील कोणताही भेदभाव सिद्ध करा, असं आव्हानही पंतप्रधानांनी यावेळी विरोधी पक्षांना

केलं.

***

नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं या कायद्याच्या समर्थनार्थ भाजप, विश्व हिंदू परिषद, भाविप आणि लोकाधिकार मंचाच्या मेळाव्यात बोलत होते. हकायदा अल्पसंख्याकांच्या बाबतीत कसालाही भेदभाव करत नाही, विरोधी पक्ष मतपेढीचराजकारण आणि अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करत असल्याची टीकाही गडकरी यांनी केली. काही राजकीय पक्ष या कायद्या विषयी गैरसमज पसरवून अस्वस्थता निर्माण करत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

***

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात जालना शहरात आज राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीनं फेरी काढली. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या फेरीत सहभाग घेतला.

***

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा तसंच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी मागणी आज नाशिक इथं मुस्लिम  संघटनांच्या निषेध सभेत  करण्यात आली. रझा अकादमी, नुरी अकादमीच्या या निषेध सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले.

***

वस्तआणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार, वर्षातून एकदाच केला जाऊ  शकतो, असा विचार प्रत्येक बैठकीत केला जाऊ शकत नाही असं वस्तआणि सेवाकर मंत्रीगटाचे समन्वयक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्ली इथं फिक्कीच्या

कार्यक्रमात बोलत होते.

***

हिंगोली जिल्हा कलाध्यापक संघानं औंढा नागनाथ इथं आज निसर्ग दृश्य चित्रकला स्पर्धा घेतली. पुणे, औरंगाबाद, माहूर, यवतमाळ, नांदेड, पुसद, परभणी, हिंगोली इथले विद्यार्थी, कलाशिक्षक, चित्रकार, प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला.

***

नाशिकमध्ये आज सकाळी पुस्तक प्रेमी नागरिकांनी पुस्तक फेरी काढली. पुस्तक प्रेमी विनायक रानडे हे वाचन चळवळ वाढवण्यासाठी राबवत असलेल्या `ग्रंथ आपल्या दारी` या उपक्रमाची दशकपूर्ती याद्वारे साजरी करण्यात आली. पुस्तक प्रेमी यात आवडीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं छायाचित्र घेऊन सहभागी झाले. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी वाचन या विषयावर मुक्त संवाद साधला. समग्र कुसुमाग्रज हा कार्यक्रम या निमित्त सादर झाला.

***

भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारीत ‘सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयंत्रिक- डॉ. अनिल काकोडकर ’ या चरित्रग्रंथाचं प्रकाशन आज ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये झालं. अनिता पाटील लिखीत या चरित्राचं संपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यानी केलं आहे. 

***

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा वाशिम जिल्ह्यात सुमारे नव्वद हजारावर शेतक-यांना फायदा मिळणार आहे. वाशीम जिल्ह्यातील शेतक-यांचे किमान पाचशे कोटी रुपये यामुळे माफ होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

***

देशाचे पहिले कृषीमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या एकशे एकविसाव्या जयंती उत्सवाला कालपासून अमरावती इथं सुरुवात झाली आहे. हा जयंती उत्सव सत्तावीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

***

लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं फुलंब्रीच्या तलाठ्याला आज अटक केली आहे. दिलीप बावस्कर असं अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचं नाव असून त्यानं हॉटेलची कर अकारणी कमी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. कर अकारणीचे साडे तीन हजार रुपये आणि लाचेचे पाच हजार रुपये असे साडे आठ हजार रुपये स्वीकारताना या तलाठ्याला अटक करण्यात आल्याचं लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं कळवलं आहे.

//************//




No comments: