Monday, 30 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत असून, यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण २५ कॅबिनेट मंत्री तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं वृत्त आहे. विधान भवनाच्या प्रांगणात होत असलेल्या या शपथग्रहण समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. या विस्तारात मराठवाड्यातून अनेकांची वर्णी लागत असून, यामध्ये अशोक चव्हाण, अमित देशमुख, राजेश टोपे, धनंजय मुंडे, संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे.



या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला तीन मंत्रिपदं मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्रिपद, तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होत आहे.

*****

२०२६ पर्यंत भारत जर्मनीला मागे टाकत जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज इंग्लंड इथल्या आर्थिक आणि व्यापारविषयक संशोधन संस्थेच्या एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल ‘२०२०’ या नावाच्या या अहवालात २०२६ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्सवर पोहोचेल तर २०३४ पर्यंत जपानला मागे टाकत भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असं म्हटलं आहे.

२०१९ या वर्षात फ्रान्स आणि ब्रिटन यांना मागे टाकत भारत जगातली पाचव्या क्रमाकाची मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. या अहवालासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आर्थिक दृष्टीकोनाची माहिती आधारभूत मानली आहे.

****

नीती आयोग आज नवी दिल्लीत भारताच्या शाश्वत विकासाबाबतचा निर्देशांकाची दुसरी आवृत्ती जारी करणार आहे.  या निर्देशांकामध्ये  २०३० वर्षापर्यंत शाश्वत विकासाचं लक्ष्य प्राप्त करण्यात भारतातली राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचा आढावा असेल. नीती आयोग डॅशबोर्ड २०१९-२० अर्थात ‘डिजिटल माहिती फलक’ सुद्धा जारी  करणार असून त्यामध्ये शंभर मानकांवर आधारित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रगतीचं परिक्षण केलं जाईल. हे मानक सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं तयार केलं आहे.

****

आर्यंलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या वराड या आपल्या मूळ गावाला भेट दिली. २०१७ मधे आर्यंलंडचे प्रधानमंत्री झाल्यानंतर लिओ यांची वराड या गावाची ही पहिली भेट असल्याचं त्यांच्या मुंबईतल्या नातेवाईंकांनी सांगितलं. गावकऱ्यांनी अत्यंत प्रेमानं आणि आपुलकीनं लिओ याचं स्वागत केलं. लिओ यांचे वडिल अशोक वराडकर यांनी ६० च्या दशकात इंग्लंडमधे स्थलांतर केलं होतं.

****

सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे संजू परब विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेना-महाविकास आघाडीच्या बाबू कुडतरकर यांचा ३१३ मतांनी पराभव केला. परब यांना ४ हजार ४८८ तर कुडतरकर यांना ४ हजार १६८ मतं मिळाली. 

****

रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप साळवी एक हजार १८२ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांचा पराभव केला. प्रदीप साळवी यांना १० हजार सात, तर पटवर्धन यांना आठ हजार ८२५ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कीर यांना तिसऱ्या क्रमांकाची आठ हजार २५२ मतं मिळाली.

****

पालघर इथं आज नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ संविधान सन्मान मंचच्यावतीने संदेश फेरी काढण्यात आली आहे. अनेक व्यावसायिक तसंच दुकानदार आज आपली प्रतिष्ठानं सकाळच्या वेळेत बंद ठेवून या संदेश फेरीत सहभागी झाले. सर्वसामान्य नागरिकांचाही या फेरीत लक्षणीय सहभाग होता.

****

सांगली जिल्ह्यातल्या साखर कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे. साखर नियंत्रण कायद्यानुसार ऊस तोडल्यानंतर १४ दिवसांच्या आत त्याचं देयक अदा करणं बंधनकारक आहे. मात्र कारखाने सुरू होऊन एक महिना उलटला, तरीही उसाचे पैसे शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेले नाहीत. रास्त आणि किफायतयशीर दर - एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचे मान्य करून कारखाने सुरू करण्यात आले. मात्र आता एफ आर पी तीन टप्प्यात देण्यासाठी  शेतकऱ्यांचे संमतीपत्र लिहून घेतली जात आहेत, अशी संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस नेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****


No comments: