Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या नेतृत्वातल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. राज्यपाल
भगतसिंग कोश्यारी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी
काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, आणि
राजेश टोपे यांच्यासह १४, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण,
विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, सुनील केदार, अमित
देशमुख, बाळासाहेब पाटील, के. सी. पाडवी
यांच्यासह १० आमदारांनी
पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
शिवसेनेच्या कोट्यातून संजय राठोड, गुलाबराव पाटील,
अनिल परब, उदय सामंत, दादा
भुसे, संदीपान भुमरे, शंकरराव गडाख,
अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर आणि आदित्य ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली.
****
कोल्हापूर जिल्ह्यात नव्यानं अस्तित्वात
आलेल्या चंदगड नगरपंचायतीच्या पहिल्याच नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या
प्राची कालेकर या विजयी झाल्या आहेत. १५०० हून अधिक मतांनी त्यांनी विजय मिळवला. १७
जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं दहा जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं
आहे.
हातकणंगले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत
काँग्रेस पक्षाचे अरुणकुमार जानवेकर विजयी झाले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातील पाचही पंचायत
समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. पाचपैकी तीन पंचायत समित्यांची
सभापती पदं शिवसेनेनं तर काँग्रेस तसंच भाजपला प्रत्येकी एक सभापती पद मिळवता आलं.
हिंगोली पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सुमनबाई झुळझुळे, सेनगाव -शिवसेनेच्या
छाया संजय हेंबाडे, औंढा - शिवसेनेच्या संगीता ढेकळे, कळमनुरी
- काँग्रेसच्या पंचफुलाबाई अशोक बेले, तर वसमत पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या
ज्योती विश्वनाथ धसे यांची निवड झाली आहे .
****
जालना जिल्ह्यातल्या आठही पंचायत समित्यांच्या सभापती
आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. जालना पंचायत समिती वगळता सर्व
ठिकाणी निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. जिल्ह्यात चार जागांवर भाजप, तर शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी दोन सभापती पदं मिळवली. जालना पंचायत समितीच्या
सभापतीपदी शिवसेनेच्या विमल पाखरे, बदनापूर - शिवसेनेच्या शिला शिंदे, भोकरदन - भाजपाच्या
वैशाली गावंडे, परतूर - भाजपाच्या मनकर्णा येवले, जाफराबाद - भाजपच्या विमल गोरे, मंठा
- भाजपाच्या शिल्पा पवार, अंबड - राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूराव खटके, तसंच घनसावंगी
पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत रक्ताटे यांची निवड झाली
आहे.
****
देशाच्या वनक्षेत्रात १८८ चौरस किलोमीटरने वाढ होऊन,
वनाच्छादित जमिनीचं प्रमाण आता सुमारे २५ टक्के झालं आहे. पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश
जावडेकर यांनी आज देशातल्या वनांची स्थिती सांगणारा अहवाल जारी केला, त्यात ही माहिती
देण्यात आली आहे. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि
केरळ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
****
देशाच्या शाश्वत विकास निर्देशांकात सुधारणा झाली
असून, हा निर्देशांक ५७ वरून ६० झाला आहे. जल, स्वच्छता, ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रातल्या
चांगल्या कामगिरीमुळे ही सुधारणा झाल्याचं, नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी
सांगितलं. कुपोषण आणि लिंगभेद या दोन बाबींमध्ये अजुनही सुधारणा आवश्यक असल्याचं त्यांनी
नमूद केलं.
****
नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधातल्या आंदोलनात
रेल्वेचं सुमारे ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तेचं नुकसान झालं आहे. या आंदोलनात
सहभागी असणाऱ्यांकडून या नुकसानाची भरपाई केली जाणार असल्याचं, रेल्वे मंडळाचे अध्यक्ष
विनोदकुमार यादव यांनी सांगितलं. नुकसानाला जबाबदार लोकांचा तपास सुरू असल्याची त्यांनी
यावेळी माहिती दिली.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा
देण्यासाठी सांगलीत आज शिवप्रतिष्ठानतर्फे संदेश फेरी काढण्यात आली. संघटनेचे मार्गदर्शक
संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या संदेश फेरीत कणेरी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर महाराज,
खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, आदी नेते सहभागी झाले होते.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत इथंही आज नागरिकत्व सुधारणा
कायद्याच्या समर्थनार्थ भव्य संदेश फेरी काढण्यात आली या फेरीत नागरिक मोठ्या संख्येने
सहभागी झाले होते.
जालना जिल्ह्यात परतूर इथंही आज नागरिकत्व सुधारणा
कायद्याच्या समर्थनात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीनं संदेश फेरी काढण्यात आली. उपविभागीय
कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या फेरीत नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.
*****
***
No comments:
Post a Comment