Saturday, 28 December 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.12.2019....Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.

****

·      जागतिक मंदीतून बाहेर येणारी भारत ही जगातली पहिली अर्थव्यवस्था ठरेल: केंद्रीय गृहमंत्र्यांचा विश्वास

·      नागरिकता कायद्याच्या समर्थनात भाजपची मुंबईत सभा; औरंगाबाद-परभणी इथं निषेध मोर्चा

·      त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

आणि

·      परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांपैकी पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, दोन शिवसेना तर, राष्ट्रीय समाज पक्ष आणि घनदाट मित्रमंडळाचा प्रत्येकी एका जागेवर विजय



****

जागतिक मंदीतून बाहेर येणारी भारत ही जगातली पहिली अर्थव्यवस्था ठरेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथं काल गुंतवणुकदारांच्या परिषदेमध्ये ते बोलत होते. जागतिक मंदीचा तात्पुरता परिणाम भारतावर दिसत असून, अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवीन योजना आणून, जागतिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करत असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

****

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात तसंच विरोधात कालही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

मुंबईत भारतीय जनता पक्षानं आझाद मैदानावर जाहीर सभा घेतली. विधीमंडळाच्या दोन्ही सदनातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलतांना फडणवीस यांनी नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या विरोधात भूमिका घेऊन विरोधी पक्ष संकुचित राजकारण करत असल्याचा आरोप केला.

औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर नागरिकांनी या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. एनआरसी आणि सीएए विरोधी कृती समितीच्या नेतृत्वात जामा मशीदीपासून निघालेल्या या मोर्चात या कायद्याच्या निषेधाचे फलक घेऊन नागरिक सहभागी झाले होते. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय नेते यावेळी उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही या कायद्याच्या विरोधात काल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्ठमंडळाच्या वतीनं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं.

अहमदनगर इथं अनेक मुस्लिम संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला, कोठला मैदानावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला.



नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर इथं काल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मिरवणूक काढण्यात आली, या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

काँग्रेस पक्ष आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर आज पक्षाकडून देशभरात संविधान बचाओ मोर्चा काढला जाणार आहे. पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. नागरिकता सुधारणा कायद्याला देशाच्या अनेक भागातून होणारा विरोध पाहता, सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात हे मोर्चे काढले जाणार असल्याचं वेणुगोपाल यांनी सांगितलं. यावेळी होणाऱ्या जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं जाणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीतर्फे मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावरून सकाळी दहा वाजता हा मोर्चा निघेल, गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ हा मोर्चा विसर्जित होईल.

****

महिला अत्याचार प्रकरणातले खटले वेगानं निकाली निघावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होऊन गुन्हेगारांवर जरब बसावी, यासाठी कठोर कायदा करण्याचे संकेत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत काल विधी आणि न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. संबंधित कायद्यात या दृष्टीने काय सुधारणा करता येतील, याबाबतचं प्रारूप तयार करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.

****

कारगील युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेली मिग २७ श्रेणीची सात विमानं काल वायूसेनेच्या सेवेतून निवृत्त झाली. वायू दलाच्या जोधपूर विमानतळावरून ही विमानं काल आकाशात अखेरची झेपावली. विमानांच्या या तुकडीने तीस वर्ष वायूसेनेत सेवा बजावताना, अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वीपणे पूर्ण केल्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा साठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

उस्मानाबाद इथं येत्या दहा जानेवारी पासून आयोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका काल औरंगाबाद इथं जारी करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही पत्रिका जारी केली. ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १० जानेवारीपासून होत असलेल्या या साहित्य संमेलनात वाङमयीन आणि सामाजिक प्रश्नांवर पाच परिसंवाद, साहित्यिक प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत, कविसंमेलनं तसंच कथाकथन आदी कार्यक्रम होणार आहेत.

****

परभणी जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, दोन जागांवर शिवसेना, तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि घनदाट मित्रमंडळानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. पाथरी पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कल्पना थोरात, सोनपेठ इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीरा जाधव, पूर्णा राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक बोकारे, जिंतूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वंदना इलग, सेलू पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन गाडेकर यांची निवड झाली.
      परभणी पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या गोकर्णा डुबे, तर मानवत पंचायत समिती सभापतीपदी शिवसेनेच्या प्रमिला उकलकर यांची निवड झाली आहे.
      गंगाखेड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रीय समाज पक्षाच्या छाया मुंडे, तर पालम पंचायत समिती सभापतीपदी घनदाट मित्रमंडळाच्या अलका शिंदे यांची निवड झाली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या विजयमाला राम मुळे या निवडून आल्या. नगराध्यक्ष पदासाठी काल नगरपालिकेच्या सभागृहामध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आलं. त्यामध्ये विजयमाला मुळे यांना नऊ मतं तर भाजपाच्या सीता नागरे यांना सहा मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले.

नंदुरबार नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारती राजपूत यांची निवड झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समित्यांच्या सभापती तसंच उपसभापती पदांसाठी येत्या मंगळवारी ३१ डिसेंबरला निवडणूक होणार आहे.

****

नागरिकत्त्व सुधारणा कायद्यातल्या तरतुदींबाबत मोठ्या प्रमाणावर समज -गैरसमज आहेत, या पार्श्वभूमीवर ऐकू या कायद्यातल्या तरतुदींविषयीची माहिती.

नागरिकता सुधारणा कायद्यानंतर आता एन आर सी आणलं जाईल का? आणि मुस्लिमांना डिटेंशन कँप म्हणजे बंधकगृहात पाठवलं जाईल का?
मुळीच नाही. नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीचा काहीही संबंध नाही. एनआरसी ही भारतीय नागरिकांची नोंदणी आणि त्यांना राष्ट्रीय ओळखपत्र जारी करण्याची प्रक्रिया आहे. गेल्या सुमारे पंधरा सोळा वर्षांपासून हा नियम अस्तित्वात आहे आणि त्यात काहीही बदल करण्यात आलेला नाही.

****

आपल्याला दिलेली सुरक्षा काढून घेण्याची मागणी करणार पत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. गरीब जनतेचा पैसा आपल्या सुरक्षेवर खर्च होऊ नये. समाज, राज्य आणि देशाची सेवा करता करता मरण आलं, तर ते आपलं भाग्य असेल, असं हजारे यांनी या पत्रात नमूद केलं आहे. यापूर्वी चार वेळा सुरक्षा काढून घेण्याच्या मागणीचं पत्र आपण सरकारला लिहिलं, पण त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नाही, असंही हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. 

****

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या मौजे सुरवाडी इथल्या चार औद्योगिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी दिले आहेत. या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडून मिळालेलं भागभांडवल आणि कर्जाचा वापर योग्यरित्या न करता अपहार केल्याचं तपासणीत उघड झाल्यानं ही कारवाई करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत कुस्त्यांच्या दंगलीत लोहा तालुक्‍यातल्या किवळा इथले कुस्तीपटू अच्युत टरके यांनी माळेगाव केसरीचा बहुमान पटकावला. एकवीस हजार रुपये रोख, गदा आणि मानाचा फेटा असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या स्पर्धेत पुण्यातल्या गणेश जाधव या मल्लाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
या यात्रेत काल लावणी महोत्सवालाही कालपासून प्रारंभ झाला. पशू प्रदर्शनातही उत्कृष्ट पशूंना काल पारितोषिकं प्रदान करण्यात आली.

****

लातूर महानगरपालिकेनं मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी शिबिरं सुरू केली आहेत. शहरातल्या जवळपास ९२ हजार मालमत्ताधारकांकडे शंभर कोटी रुपयांची थकबाकी आहे. या शिबिरात कराचा भरणा करणाऱ्यांना व्याजात सवलत दिली जात असून, उद्यापर्यंत ही शिबिरं सुरु राहणार आहेत. 

****

औरंगाबाद-नांदेड या एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या इंजिनात काल जालना-परतूर दरम्यान सारवाडी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर तांत्रिक बिघाड झाला, यामुळे या गाडीसह नंदीग्राम एक्सप्रेस आणि मराठवाडा एक्सप्रेस या रेल्वे गाड्याही सुमारे दोन तास खोळंबून होत्या. औरंगाबाद-नांदेड गाडीला दुसरं इंजिन बसवल्यानंतर ही गाडी आणि त्यानंतर अन्य दोन्ही रेल्वे गाड्या मार्गस्थ झाल्या.

****

No comments: