आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ डिसेंबर
२०१९ सकाळी ११.०० वाजता
****
दहशतवादी
कारवायांमुळे विकासाच्या मार्गावर सातत्यानं अडथळे येत असल्याचं, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या
नायडू यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांच्या एका चमूनं आज उपराष्ट्रपतींची
भेट घेतली, या विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत होते. विद्यार्थ्यांनी देशाटन करून, आपल्या
संस्कृतीतली विविधता जाणून घेतली पाहिजे, असं नायडू म्हणाले. भारताला आपल्या सगळ्याच
शेजारी राष्ट्रांसोबत शांतता आणि सौहार्दाचे संबंध हवे असल्याचं, उपराष्ट्रपतींनी यावेळी
नमूद केलं.
****
झारखंडची
राजधानी रांची इथं आज झारखंड मुक्ती मोर्चाची बैठक होत आहे, या बैठकीत पक्षाचे कार्यकारी
अध्यक्ष हेमंत सोरेन यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.
काँग्रेससह इतर मित्रपक्षांच्या आघाडीचीही आज बैठक होणार असून, त्यातही हेमंत सोरेन
यांची गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या काल लागलेल्या निकालात
झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
****
नांदेड
वाघाळा शहर महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी परवा गुरुवारी निवडणूक होत
आहे. औरंगाबादचे विभागीय महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या निवडणुकीसाठी पीठासीन
अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची नियुक्ती केली आहे. स्थायी समितीवर
१६ पैकी १५ सदस्य काँग्रेसचे आहेत.
दरम्यान,
नांदेड जिल्ह्यातल्या १६ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी येत्या
६ जानेवारीला निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी याबाबतचे आदेश जारी
केले. सभापती आणि उपसभापती यांची अडीच वर्षाची मुद्दत २० ऑगस्ट २०१९ रोजी संपली होती,
मात्र राज्य विधानसभा निवडणुकीमूळे या पदांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.
****
सांगली
जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांना राज्य बँकेने कर्जपुरवठा मंजूर केला आहे. वाळवा
इथल्या हुतात्मा साखर कारखान्यास ३१५ कोटी, शिराळा इथल्या विश्वास साखर कारखान्यास
१५० कोटी आणि ग्रीन पॉवर शुगर कारखान्याला १४२ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात
आले.
****
No comments:
Post a Comment