Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
नागरिकता
कायद्याच्या समर्थनात तसंच विरोधात आजही अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. मुंबईत भारतीय
जनता पक्षानं आझाद मैदानावर जाहीर सभा घेतली. विधीमंडळाच्या दोन्ही सदनातले विरोधी
पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते. तिरंगा ध्वज तसंच या कायद्याच्या समर्थनाचे फलक घेऊन अनेक लोक या सभेला हजर होते.
औरंगाबाद
इथं विभागीय आयुक्त कार्यालयावर नागरिकांनी या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. एनआरसी
आणि सीएए विरोधी कृती समितीच्या नेतृत्वात जामा मशीदीपासून निघालेल्या या मोर्चात या
कायद्याच्या निषेधाचे फलक घेऊन नागरिक सहभागी झाले होते.
****
आपल्याला
दिलेली सुरक्षा काढून घ्यावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी
केली आहे. अशा आशयाचं पत्र हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
यापूर्वी चार वेळा सुरक्षा काढून घेण्याच्या मागणीचं पत्र सरकारला लिहिलं, पण त्यावर
कार्यवाही करण्यात आलेली नाही, असं हजारे यांनी या पत्रात म्हटलं आहे. गरीब जनतेचा
पैसा आपल्या सुरक्षेवर खर्च होऊ नये. समाज, राज्य आणि देशाची सेवा करता करता मरण आलं,
तर ते माझं भाग्य असेल, असं हजारे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या
साक्री तालुक्यात दातर्ती इथं वाळुतस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाळू
उपसा प्रकरणी कारवाई करत असताना साक्रीचे तहसीलदार प्रवीण चव्हाण यांच्यासह महसुल कर्मचाऱ्यांच्या
अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, हा गुन्ही नोंदवण्यात आला
आहे. संबंधित डंपर चालक, मालक आणि इतर सहा जणांविरुध्द वाळू चोरी, पर्यावरणाचं नुकसान
आणि शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
कृषिक्रांतीचे
प्रणेते देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त
अकोला इथं राज्यस्तरीय तीन दिवसीय कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरवात झाली. शेतीशास्त्रातलं अभिनव तंत्रज्ञान, कौशल्य विकास,
कृषी प्रक्रिया, कृषी अभियांत्रिकी, सेंद्रिय शेती यासारख्या माहितीची दालनं या प्रदर्शनात
उभी करण्यात आली आहेत. देशात शेतीच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांऐवजी आज प्रत्येक
शेतकऱ्यानं सेंद्रीय खतांचा वापर करून जैविक शेती करणं गरजेचं असल्याचं मत कृषीतज्ज्ञ
प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केलं.
****
वाशिम
जिल्ह्यातल्या कारंजा इथं श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या सातशे विसाव्या
जयंती महोत्सवाला उद्या पासून सुरूवात होत आहे. हा उत्सव पंचेचाळीस दिवसांचा असून या
मध्ये कीर्तन, भजन, पारायण यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच आरोग्य तपासणी,
पारंपारिक कला सादरीकरण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या विजयमाला राम मुळे या निवडून
आल्या. नगराध्यक्ष पदासाठी आज नगरपालिकेच्या सभागृहामध्ये हात उंचावून मतदान घेण्यात
आलं. त्यामध्ये विजयमाला मुळे यांना नऊ मतं तर भाजपाच्या सीता नागरे यांना सहा मतं
मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक तटस्थ राहिले.
दरम्यान,
नंदुरबार नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारती अशोक राजपुत यांची निवड करण्यात आली
आहे.
****
उस्मानाबाद
इथं येत्या दहा जानेवारी पासून आयोजित त्र्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची
कार्यक्रम पत्रिका आज औरंगाबाद इथं जाहीर करण्यात आली. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष
प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी मराठवाडा साहित्य
परिषदेच्या सभागृहात संयुक्त पत्रकार परिषदेत ही पत्रिका जाहीर केली. ज्येष्ठ साहित्यिक
फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या साहित्य संमेलनात वाङमयीन
आणि सामाजिक प्रश्नांवर पाच परिसंवाद, साहित्यिक प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत,
कविसंमेलनं तसंच कथाकथन आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
नांदेड
इथल्या माळेगाव यात्रेत आज दुपारी लावणी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. आमदार श्यामसुंदर
शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव पाटील हंबर्डे आणि जिल्हा परिषदेचे
उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. माळाकोळी इथले
प्रेमकुमार मस्के आणि अनुराधा नांदेडकर यांच्या गण-गवळणीने या महोत्सवाला सुरुवात झाली.
****
अल्पसंख्याक
विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
परभणी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचं, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी म्हटलं आहे.
अल्पसंख्याक हक्क दिवसाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनांचे अर्ज वेळेत निकाली काढण्याची सूचना सर्व बँक
व्यवस्थापकांना देण्यात आली असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment