Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
स्वामी
विवेकानंद यांची विचारधारा आणि उत्साह आजही देशभरातल्या तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचं,
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. कन्याकुमारी इथल्या विवेकानंद शिळा स्मारकाच्या
सुवर्ण जयंती समारोहात ते आज बोलत होते. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यासह
अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कन्याकुमारी इथं तीन दिवस ध्यान केल्यानंतर विवेकानंदांनी
अमेरिकेत शिकागोच्या धर्म परिषदेसाठी प्रस्थान केलं, त्यामुळे विवेकानंदांच्या जीवनात
कन्याकुमारी या स्थानाला विशेष महत्त्व असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. तीन समुद्रांच्या
संगमावर असलेल्या शिळास्मारकाचंही राष्ट्रपतींनी कौतुक केलं.
****
उत्तर
काश्मिरात उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलिकडून पाकिस्ताननं काल रात्री नागरी वसाहती
आणि भारतीय चौक्यांवर गोळीबार केला, यामध्ये सैन्यदलाच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याला वीरमरण
आलं, तर एक महिला ही मरण पावली. या गोळीबाराला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
आज सकाळीही पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच असल्याचं, सैन्यदलाच्या सूत्रांनी सांगितलं.
****
नवी दिल्ली
इथं आज सकाळी ५ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. आज दिवसा
हे तापमान १७ अंश सेल्सिअस इतकं असेल, असा अंदाज आहे. दिल्लीत आज सकाळी अनेक भागात
दाट धुकं असल्यानं दिल्लीहून सुटणाऱ्या २५ हून अधिक रेल्वेगाड्या २ ते ६ तास उशिरानं
धावत आहेत.
****
राज्याच्या
अनेक भागात कालपासून ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस
झाला. अमरावती इथं काल रात्री जोरदार पाऊस झाला, जिल्हाभरात आज सकाळी ७ वाजताही सुमारे तासभर, पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
सातारा
जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून, सकाळपासून पावसाची भूरभूर सुरु आहे.
जालना
जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून रात्री हलका पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसर आणि जिल्ह्यातही
काल रात्री पाऊस झाला. शहरात काही ठिकाणी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. नाशिक,
हिंगोली, नांदेड इथं ही ढगाळ वातावरण असून, पावसाची भूरभूर काही ठिकाणी सुरु आहे.
या ढगाळ
हवामानामुळे अनेक ठिकाणी आजचं सूर्यग्रहण पाहता आलं नाही. ग्रहण पाहण्यासाठी विशेष
चष्मे घेऊन तयारीत असलेल्या खगोलप्रेमींचा यामुळे हिरमोड झाला.
लातूर
इथं, महापालिका, एम डी ए फाउन्डेशन आणि रोटरी क्लब मिडटाउन च्या वतीने पहिली ते दहावीच्या
विद्यार्थ्यांना ग्रहण पाहण्यासाठी चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आलं होतं. जिल्हा क्रीडा
संकुलावर सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. मात्र ढगाळ हवामानामुळे विद्यार्थ्यांना
अल्पावधीसाठीच ग्रहण पाहता आलं, विद्यार्थ्यांनी हा क्षण उत्साहानं अनुभवल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नागरिकता
सुधारणा कायद्याला आपलं समर्थन नसल्याचं, हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी
म्हटलं आहे. पाटील यांच्या स्वाक्षरीचं समर्थन पत्र हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना
सादर करण्यात आलं होतं, हे पत्र बनावट असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. आपण अन्य
एका कामासाठी दिलेल्या पत्राचा गैरवापर करण्यात आला असून, या प्रकरणी हिंगोली पोलिसांकडे
आपण तक्रार दाखल केल्याची माहिती खासदार पाटील यांनी पीटीआयला दिली.
दरम्यान
या कायद्याच्या समर्थन मोर्चात शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगरही सहभागी झाले
होते. मात्र या भूमिकेबाबत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नसल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे.
या कायद्याच्या
विधेयकाला शिवसेनेनं लोकसभेत पाठिंबा दिला होता, मात्र राज्यसभेत या विधेयकावर मतदानावेळी
शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला होता. शिवसेनेच्या या भूमिकेचा कॉंग्रेससोबत
केलेल्या आघाडीशी काहीही संबंध नसल्याचं, शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांनी
सांगितल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नागरिकत्व
सुधारणा कायदा हा अल्पसंख्याकांवरचा अन्याय दूर करणार कायदा असल्याचं, भाजपचे सहमुख्य
प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
कॉँग्रेस पक्ष मतपेटीसाठी राजकारण करून अराजकता निर्माण करण्याच प्रयत्न करत असल्याचा
आरोप उपाध्ये यांनी केला. राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांची शिवसैनिकांकडून मुस्काटदाबी
केली जात आहे. अशा शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करणार काय, याकडे राज्याचं लक्ष लागून
असल्याचं उपाध्ये म्हणाले.
****
No comments:
Post a Comment