Friday, 27 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 27.12.2019 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ डिसेंबर २०१सकाळी ११.०० वाजता

****

अहमदनगर-पुणे रस्त्यावरच्या रेल्वे पुलावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर एकोणीस जण जखमी झाले. पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला या वाहनांचा धक्का लागून पुलावरुन खाली पडल्यामुळे, त्याच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे. बसचा चालक आणि वाहकही अपघातात जखमी झाले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती आमच्या  वार्ताहरानं वर्तवली आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यात येलदरी इथं एका व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. या व्यक्तीला साप चावल्यानंतर गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे, त्याच्यावर वेळेत औषधोपचार होऊ शकले नाही, म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली. निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला असून येत्या दोन ते तीन दिवसात कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर मयत मारोती वाकळे याच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव इथं भरलेल्या यात्रेत महिला स्‍वयंसहाय्यता गटांना राजमाता जिजाऊ स्‍वावलंबन जिल्‍हास्‍तरीय पुरस्‍कारांचं वितरण करण्‍यात आलं. नांदेड तालुक्‍यातल्या नाळेश्‍वर इथल्या रेणुका माता स्‍वयंसहाय्यता समुहास जिल्‍हास्‍तरीय प्रथम पुरस्‍कार मिळाला आहे. तसंच तुप्‍पा इथल्या भारतीय स्‍टेट बँक शाखेला जिल्‍हास्‍तरीय उत्‍कृष्‍ट बँकर्स पुरस्‍कार देण्‍यात आला.



दरम्यान, माळेगाव यात्रेत शुध्‍द पाणी पुरवठा करण्‍यासाठी जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्‍या वतीनं नियोजन करण्‍यात आलं असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर.एस.बारगळ यांनी दिली आहे. या यात्रेत आज पारंपारीक लोककला महोत्‍सव होणार असून विविध स्‍पर्धांचे बक्षीस वितरणही आज होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

 ****

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दौंड - मनमाड मार्गावर अभियांत्रिकीचं देखभाल दुरूस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर ३१ जानेवारीपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहे.

****

No comments: