Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागरिकांना
नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी वर्ष सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचे
जावो,तसंच आपलं राज्य आणि आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीच्या वाटेवर निरंतर अग्रेसर
राहो, असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशामध्ये म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनीही नवीन वर्षानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या असून, नवीन
वर्षाचं स्वागत आपण सगळ्यांनी आनंदानं आणि उत्साहानं करू या, असं आपल्या शुभेच्छा संदेशात
म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली आहे. महापालिकेत
आज झालेल्या निवडणुकीत जंजाळ यांना एक्कावन्न,
भारतीय जनता पक्षानं पाठिंबा दिलेले उमेदवार गोकुळ मुळके यांना चौतीस तर एम आय एमचे
शेख जफर अख्तर यांना तेरा मतं मिळाली. या निवडणुकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल एम आय
एम पक्षाच्या सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती या पक्षाचे
गटनेते गंगाधर ढगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या नऊ पंचायत समितींच्या सभापती आणि उपसभापती पदांसाठी आज निवडणूक झाली.
नऊ सभापती पदांपैकी पाच शिवसेनेनं, दोन भारतीय जनता पक्षानं तर काँग्रेस आणि रायभान
जाधव विकास आघाडीनं प्रत्येकी एक सभापती पद मिळवलं आहे. उपसभापती पदांपैकी पाच शिवसेनेनं,तीन
भाजपनं तर एक राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलं.
औरंगाबाद
पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या छायाताई घागरे तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या
मालती पडूळ यांची निवड झाली आहे.
पैठण पंचायत
समितीमध्ये सभापतीपदावर शिवसेनेचे अशोक भवर आणि उपसभापतीपदी शिवसेनेचेच कृष्णा भूमरे
यांची बिनविरोध निवड झाली. वैजापूर पंचायत समितीतही सभापती पदी शिवसेनेच्या सिना मिसाळ
तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र मगर यांची बिनविरोध निवड झाली.
कन्नड
पंचायत समिती सभापतीपदी रायभान जाधव विकास आघाडीचे आप्पाराव घुगे तर उपसभापतीपदी भाजपच्या
डॉ. नयना तायडे यांची निवड झाली आहे.
गंगापूर,सिल्लोड
आणि सोयगाव पंचायत समितींमध्ये सभापती आणि उपसभापती पदांवर शिवसेनेचे तर फुलंब्री आणि
खुलताबाद मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले.
औरंगाबादच्या
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी येत्या तीन जानेवारीला निवडणूक होणार आहे. हे पद सर्वसाधारण
महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
****
सोलापूर
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप आघाडीचे अनिरुद्ध कांबळे यांची आणि उपाध्यक्षपदी
भाजप आघाडीच्याच दिलीप चव्हाण यांची आज निवड झाली.
अहमदनगर
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री
घुले पाटील आणि उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप शेळके यांची बिनविरोध निवड झाली.
****
प्रधानमंत्री
पीक विमा योजनेअंतर्गत येणा-या ‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा” २०१८-१९ या वर्षासाठी
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले
यांनी कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानभवनात आज यासंदर्भात
झालेल्या एका बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
****
नववर्षाच्या
स्वागताच्या वेळी मद्यपान करून वाहन न चालवण्याचं आवाहन औरंगाबाद पोलिसांनी शहरातल्या
सगळ्या वाहनधारकांना केलं आहे. मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात
येणार असल्याचं पोलिस उप आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी सांगितलं आहे. उद्या सकाळी पाच
वाजेपर्यंत पूर्ण शहरात वाहनधारकांची यासाठीची चाचणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
ऐतिहासिक
कोरेगाव लढाईच्या दोनशे दोनव्या जयंतीच्या वेळी, उद्या, कोरेगाव भीमा इथे दहा हजारहून
जास्त पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. २०१८ मध्ये या जयंतीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराच्या
पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. सामाजिक माध्यमांवर
आक्षेपार्ह साहित्य टाकणाऱ्यांवर याआधीच कारवाई सुरू केली असून, कायदा आणि सुव्यवस्थेला
हानी पोचेल, असे संदेश कोणीही टाकू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दक्षतेचा उपाय
म्हणून सुमारे साडेसातशे जणांवर कारवाई करण्यात आली असून, सामाजिक माध्यमांवर नजर ठेवली
जात आहे, तसंच अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात
कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी
दिला आहे.
**********
No comments:
Post a Comment