Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा
हा शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी आहे, कुणाचंही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही,
असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. देशातल्या नागरिकांनी
इंडिया सपोर्ट्स सी.ए.ए. हा हॅशटॅग वापरून नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शवावा
असं आवाहन त्यांनी ट्विटरवरून केलं आहे.
****
जनरल मनोज मुकुंद नरवणे
यांनी आज भारताचे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. आपल्या सदोतीस वर्षांच्या
सेवेत नरवणे यांनी जम्मू काश्मीर तसंच पूर्वोत्तर भारतातल्या कार्यासह इतर अनेक महत्वपूर्ण
जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. लष्करप्रमुख पदावर नियुक्ती होण्याआधी, लष्कराच्या पूर्व
मुख्यालयाचे ते प्रमुख होते.
****
रेल्वे मंत्रालयानं केलेल्या
उपायांमुळे यावर्षी सगळ्या रेल्वेगाड्या वेळापत्रकानुसार धावत होत्या आणि एकही प्राणहानी
झाली नाही, तसंच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी रेल्वेचा वक्तशीरपणा आठ टक्क्यांनी वाढला आहे, अशी माहिती रेल्वेनं जारी केलेल्या पत्रकात
दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ५००
रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे निर्भया निधीतून बसवल्याची आणि ५ हजार पेक्षा
जास्त रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सेवा पुरवल्याची माहितीही यात दिली आहे. दहशतवादी
आणि नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोरस रेल्वे कमांडो बटालियनची स्थापना केल्याचं
याशिवाय आय.आर.सी.टी.सीच्या माध्यमातून दर्जेदार खाद्य पदार्थ पुरवले जात असल्याचंही
या पत्रकात म्हटलं आहे.
****
औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड झाल्याचं वृत्त
आहे. जंजाळ यांना एक्कावन्न , भारतीय जनता पक्षाचे गोकुळ मलके यांना चौतीस तर एम आय
एमचे उमेदवार शेख अख्तर यांना तेरा मतं मिळाली.
****
वर्षअखेर आणि नववर्ष
आगमनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथं पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहराचे पोलिस
आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आज संध्याकाळपासून
उद्या पहाटे अडीच वाजेपर्यंत शहरातल्या सर्व हालचालींवर पोलिस यंत्रणेचं लक्ष राहणार
असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. औरंगाबाद शहरात गुन्ह्यांच्या प्रमाणात गेल्या वर्षभरात
दहा टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
परभणी इथं व्यापारी तसंच
नागरिकांनी पाण्याचे प्लास्टिक पाऊच आणि प्लास्टीक पिशव्यांचा वापर केल्यास दंडात्मक
कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे. आयुक्त रमेश पवार यांनी यासाठी एका पथकाची
नियुक्ती केली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आज
सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही भागात पाऊस झाला आहे. औंढानागनाथ ,कनेरगाव नाका,
कळंबोली, बासंबा आणि बळसोंड परिसरात सकाळी
पाऊस पडला. ढगाळ वातावरणामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी
वर्तवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अमरावती जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून
काही भागात पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
ठाणे शहरात सर्व सोयींनी
युक्त असं क्रीडा वसतीगृह सुरू करण्यात येणार आहे. या शहरात दरवर्षी होत असलेल्या विविध
क्रीडा स्पर्धांसाठी देशभरातून येणाऱ्या खेळाडूंची निवासाची सोय व्हावी, यासाठी महापौर
नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जायस्वाल यांनी हा निर्णय घेतल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पुढच्या वर्षीच्या ऑलम्पिक
पात्रतेसाठी 69 किलो वजन गटात विकास कृष्णननं भारतीय मुष्टीयुद्ध संघात स्थान निश्चित
केलं आहे. भारतीय संघात स्थान मिळवणा-यांमधे राष्ट्रकुल पदक विजेते गौरव सोळंकी आणि नमन तंवर यांचाही समावेश आहे.
****
बर्मिंगहॅम इथं २०२२
मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी
हा क्रीडाप्रकार वगळल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा याआधी घेतलेला निर्णय
भारतानं मागे घेतला आहे. २०२६ किंवा २०३० साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या
मुख्य स्पर्धेआधी नेमबाजी स्पर्धेचं यजमानपद घेण्याचाही भारत विचार करत आहे, असं भारताच्या
ऑलम्पिक समितीनं जाहीर केलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष डेम लुईस मार्टिन,
यांनी भारताच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये काल
रात्री दोन तासाहून कमी कालावधीत भूकंपाचे चार धक्के बसले. रात्री पावणेअकरा ते अकरा
वाजून वीस मिनिटांमध्ये जाणवलेल्या या धक्क्यांची कमाल तीव्रता रिश्टर स्केलवर पाच
पूर्णांक पाच इतकी होती. या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त आतापर्यंत
आलेलं नाही.
*****
***
No comments:
Post a Comment