Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** सामुदायिक सहभागातून भूजल स्तरात सुधारणा करण्याची तरतूद असलेल्या अटल भूजल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; महाराष्ट्रासह सात राज्यातल्या अठ्ठ्यात्तर जिल्ह्यांचा योजनेत समावेश
** राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचं स्पष्टीकरण
** शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्याला तसंच ‘शिवभोजन’ योजनेस राज्य सरकारची मंजुरी
** आणि
** अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या ५० हजार तरुणांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट- नरेंद्र पाटील
****
सामुदायिक सहभागातून भूजल स्तरात सुधारणा करण्याची तरतूद असलेल्या अटल भूजल योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेश, आणि हरयाणा या सात राज्यांमध्ये आगामी पाच वर्ष ही योजना राबवली जाणार आहे. या राज्यातल्या अठ्ठ्यात्तर जिल्ह्यांतल्या ८३५० गावांना या योजनेचा लाभ मिळेल. ग्रामस्तरावर भूजल व्यवस्थापन आणि पाण्याच्या मागणीनुसार जलव्यवस्थापनात बदल करण्याच्या उद्देशानं ही योजना राबवण्यात येणार आहे. २०२५पर्यंत राबवण्यात येणाऱ्या या योजनेवर सहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एनपीआरचं अद्ययावतीकरण आणि २०२१च्या जनगणनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जनगणनेसाठी आठ हजार ७५४ कोटी रुपये तर एनपीआर अद्ययावतीकरणासाठी तीन हजार ९४१ कोटी रुपये खर्चालाही यावेळी मान्यता देण्यात आली.
****
राष्ट्रीय नागरिक नोंदणी - एन आर सी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी - एन पी आर यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीला काल दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी, एनपीआरमधली कोणतीही माहिती एनआरसीमध्ये वापरली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची सुरुवात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच झाली असून, ही एक चांगली योजना असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं ती सुरु ठेवल्याचं ते म्हणाले.
****
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आराखड्यास काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची घोषणा केली होती. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचं थकेललं दोन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज या योजनेअंतर्गत माफ होणार आहे.
राज्यातल्या गरीब आणि गरजू जनतेला केवळ दहा रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार असून, प्रतिदिन ५०० थाळी या भोजनालयात देण्याचा शासनाचा मानस आहे.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून तातडीनं आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काल मराठवाड्यात अनेक ठिकाणी मोर्चे तसंच पदयात्रा काढण्यात आल्या.
लातूर इथं विविध सामाजिक तसंच व्यावसायिक संघटनाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली. खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी या कायद्याविषयी माहिती देणाऱ्या पत्रकांचं वाटपही करण्यात आलं केलं.
उस्मानाबाद इथं विविध ४५ संस्था संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याच्या समर्थनात काल संदेश फेरी काढली. या कायद्याबद्दल जनतेत संभ्रम पसरवून अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
हिंगोली इथंही या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. या मोर्चामध्ये नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनाचे फलक हाती घेतलेल्या महिलांची संख्याही लक्षणीय होती. औंढा नागनाथ इथंही नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काल भव्य मोर्चा काढण्यात आला. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथंही या कायद्याच्या समर्थनार्थ आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.
****
आकाशवाणीच्या वार्षिक पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झालं. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाला २०१७ या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्त विभागाचा पुरस्कार मिळाला आहे. विभागप्रमुख उपसंचालक नितीन केळकर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या ५० हजार तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत राज्यात ११ हजार तरुणांनी ५५० कोटींचे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल जालना इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात यापुढे जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिरं, जनजागृती मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्न करेल, असंही त्यांनी सांगितलं.
****
लातूर महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदी पुन्हा एकदा भाजपाचे मंगेश बिराजदार यांची निवड झाली आहे. काँग्रेसचे इसरार सगरे यांचा पराभव करत बिराजदार यांनी विजय प्राप्त केला.
****
नागरिकत्त्व सुधारणा कायद्यातल्या तरतुदींबाबत मोठ्या प्रमाणावर समज -गैरसमज आहेत, या पार्श्वभूमीवर ऐकू या कायद्यातल्या तरतुदींविषयीची माहिती.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातले या तीन देशातून अवैधरित्या भारतात
आलेल्या मुस्लिमांना नागरिकत्व कायद्यांतर्गत परत पाठवून दिलं जाईल का ?
नाही. विदेशी नागरिकांना भारताबाहेर पाठवण्याची तरतूद नागरिकत्व कायद्यात नाही.
विदेशी नागरिक मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला भारताबाहेर पाठवण्याची प्रक्रिया
फॉरेनर्स ॲक्ट १९४६ किंवा पासपोर्ट ॲक्ट १९२० अंतर्गत पूर्ण केली जाते.
****
लातूर जिल्ह्यात पीक विमा कंपनीची नियुक्ती न करण्यात आलेल्या भागात लवकरात लवकर पीक विमा कंपनीची नियुक्ती करण्याची मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. रब्बी हंगामाच्या पीक विम्यासाठी पीक विमा कंपनीची नियुक्ती करण आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी शहरातल्या शांतीदूत संस्थेच्या वतीनं काल गोरगरीब आणि गरजू व्यक्तींना थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं. औरंगाबाद विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी २११ जणांना हे वाटप केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात जिल्हा प्रशासन आणि समाजिक कल्याणच्या वतीनं काल दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात आलं. यात ९७० दिव्यांगाची तपासणी करून त्यांना कृत्रीम अवयव आणि ३५० ज्येष्ठ नागरिकांना विविध संसाधनांचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी डी. बी. पाटील होटाळकर हे होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जंयती आज सुशासन दिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीच्या वतीनं मराठवाड्यात सामाजिक कार्य सातत्यानं करणाऱ्यांना लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
**
नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….
खंडेरायाच्या दर्शनासाठी नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली आदि जिल्ह्यांसह राज्यातून हजारो भाविकांनी रांगालाऊन देवस्वारीचं दर्शन घेतलं.
देवस्वारीचं शासकीय विश्रामगृह माळेगाव इथ आगमन झालं. शनिवार पर्यंत चालनाऱ्या या यात्रेत तमाशा महोत्सव, कुस्त्यांचा दंगली, लालकंधारी वळू आणि सुदृड गाईच्या स्पर्धा, भाजीपाला उत्पादक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबादहून मुखेडकडे जाणारी बस आणि केजहून बीडकडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेंम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधल्या चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १५ प्रवासी जखमी झाले. बीड जिल्ह्यात केज जवळ चंदन सावरगाव इथं काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
औरंगाबाद इथल्या भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या वतीनं काल जे के जाधव साहित्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ज्येष्ठ समीक्षक प्रभाकर बागले यांच्या हस्ते साहित्यिकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप होतं
****
No comments:
Post a Comment