Tuesday, 24 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 केंद्रीय मंत्रिमंडळानं अटल भूजल योजनेला मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. देशात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, उत्तरप्रदेश, आणि हरयाणा या सात राज्यांमध्ये पाच वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. अंदाजे सहा हजार कोटी रुपयांच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मदत होणार असल्याचं, जावडेकर यांनी सांगितलं.



 राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी एनपीआरचं अद्ययावतीकरण आणि २०२१च्या जनगणनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. जनगणनेसाठी आठ हजार ७५४ कोटी रुपये तर एनपीआर अद्ययावतीकरणासाठी तीन हजार ९४१ कोटी रुपये खर्चालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.



 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात संरक्षण दल प्रमुख पदनिर्मितीला तसंच रेल्वे मंडळाच्या संघटनात्मक पुनर्बांधणीलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली.

****

 नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ लातूर इथं विविध सामाजिक तसंच व्यावसायिक संघटनाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात आली. खासदार सुधाकर शृंगारे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी या कायद्याविषयी माहिती देणाऱ्या पत्रकांचं वाटपही करण्यात आलं केलं. महिला आणि दिव्यांग व्यक्तीही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.



 उस्मानाबाद इथं विविध ४५ संस्था संघटनांनी एकत्र येऊन या कायद्याच्या समर्थनात संदेश फेरी काढली. या कायद्यासंदर्भात जनजागृती फलक हातात घेऊन निघालेली संदेश फेरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विसर्जित झाली. या कायद्याबद्दल जनतेत संभ्रम पसरवून अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी यांच्यासह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं या संदेश फेरीत सहभागी झाले.



 हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथंही नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना या कायद्याच्या समर्थनाचे निवेदन देण्यात आलं. या कायद्यासंदर्भात यावेळी नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आलं. हिंगोली इथंही या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं.



 औरंगबाद इथं राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं या कायद्याच्या समर्थनात उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता शहरातल्या क्रांती चौक इथून या मोर्चाला सुरूवात होणार आहे.

****



 नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात परवा २६ डिसेंबरला वंचित बहुजन आघाडी दादर इथं धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यात सोळा टक्के समाज असा आहे ज्याच्याकडे कोणत्याही नोंदी नाहीत. एनआरसीमुळे मुस्लिम समाजच नव्हे तर हिंदू समाजावरही अन्याय होणार असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं.

****



 ग्रामीण भागात नागरिकांनी वैयक्तिक शौचालयाचं बांधकाम करुन त्याचं  प्रोत्साहन अनुदान तात्काळ देण्यासाठी परभणी जिल्ह्यात मोहीम सुरू करण्यात आली आहे. परभणी तालुक्यामध्ये आतापर्यंत ९८ ग्रामपंचायतींना शौचालय बांधकामाचा प्रोत्साहन अनुदान निधी वाटप करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 लातूर महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदी पुन्हा एकदा भाजपाचे मंगेश बिराजदार यांची निवड झाली आहे. काँग्रेसचे इसरार सगरे यांचा पराभव करत बिराजदार यांनी विजय प्राप्त केला.

****



 औरंगाबाद - मुखेड बस आणि केजहून बीड कडे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेंम्पोची समोरा समोर  धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधल्या चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ प्रवासी जखमी  झाले. बीड जिल्ह्यात केज जवळ चंदन सावरगाव इथं आज दुपारी ही दुर्घटना घडली.

****



 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या ५० हजार तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत राज्यात ११ हजार तरुणांनी २७ कोटींचे कर्ज घेवून व्यवसाय सुरू केले आहेत, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज जालना इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.

****



 औरंगाबाद इथल्या भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेच्या वतीनं आज जे के जाधव साहित्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

*****

***

No comments: