Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** देशभरात थंडीची लाट; राज्यातही अनेक शहरांचं
तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी
** महात्मा जोतिराव
फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शासन निर्णय जारी; दोन लाख
रूपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत वेगळा विचार - अर्थमंत्री जयंत पाटील
** नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात
देशभर संविधान बचाव - देश बचाव
आंदोलन
आणि
** पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षातून हकालपट्टी
****
देशभरात विशेषत: उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे.
राजधानी दिल्लीत काल या हंगामातलं निचांकी तापमान नोंदवलं गेलं.
राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
काल सर्वात कमी पाच अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं.
मराठवाड्यातही थंडीची लाट आली असून, औरंगाबादचं
तापमान काल आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं होतं. राज्यातल्या
अनेक शहरांचं तापमान काल दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होतं. पुढचे
तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
राज्य सरकारनं महात्मा जोतिराव फुले शेतकरी
कर्जमुक्ती योजनेचा शासन निर्णय काल जारी केला. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च
२०१९ या काळात, दोन लाख रूपयांपर्यंत एक किंवा एकापेक्षा जास्त
कर्ज घेतलेल्या, अल्प तसंच अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना,
कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. याच काळात पुनर्गठन
करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या, तसंच व्याजासह थकित
असलेल्या हप्त्याची रक्कम, दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या
शेतकऱ्यांनाही, या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातले आजी- माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार तसंच आमदार यांना तसंच
चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता ज्या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन
२५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
दरम्यान, या योजनेतल्या अटीवरून अनेकांनी नाराजी व्यक्त
केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घाईगडबडीत घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना
न्याय मिळणार नसल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. नव्या कर्जमाफी योजनेनुसार, मागील वर्षी जो शेतकरी
थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर यंदा ज्यांनी कर्ज काढलं ते
पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी असून, सरकारनं
या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांची
सरसकट फसवणूकच केल्याचा आरोप केला आहे.
कर्जमाफीसाठी घातलेल्या अटी पाहता राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याची
टीका शेतकरी नेते अजित नवले यांनी केली आहे. निवडणुकीपूर्वी सरकारनं
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते पाळलं
गेलं नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, दोन लाख रूपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबत
सरकार वेगळा विचार करत असल्याचं राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
या कर्जदार शेतकऱ्यांनाही मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. यासाठी अशा शेतकऱ्यांची संख्या, त्यांनी घेतलेलं एकूण
कर्ज आणि त्यावरील व्याजाची माहिती सरकार सध्या संकलित करत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीदेखील सरकार एक योजना
आखत असल्याचं ते म्हणाले.
****
काँग्रेस पक्षानं काल स्थापना दिनानिमित्त नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या
विरोधात देशभर संविधान बचाव - देश बचाव आंदोलन केलं. यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, तसंच जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.
मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत
संविधान वाचवा-देश वाचवा
मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब
थोरात यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थिते होते. नागरिकता सुधारणा कायदा आणि एन.आर.सी सारखे कायदे जनतेवर लादून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू
असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले.
औरंगाबाद इथंही "भारत बचाव संविधान बचाओ" फेरी काढण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
वनस्पती उद्यानापासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत ही फेरी काढण्यात आली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अपर्ण
करण्यात आला. काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष
डॉ. अरुण शिरसाट यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या फेरीत
कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा साठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष
नेताजी पाटील आणि सावरगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांची पक्षातून
हकालपट्टी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाई
केल्याच्या आरोपावरुन जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी, ही कारवाई केली.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात कालही अनेक ठिकाणी मोर्चे
काढण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथं मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे शहरातल्या सर्व बाजारपेठा आणि दुकानं बहुतांशी बंद ठेवण्यात
आली होती.
धुळे शहरातही या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जमियत उलेमा
संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनात हजारो नागरिक सहभागी झाले होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नागरिकत्व कायद्याच्या
समर्थनात मोर्चा काढण्यात आला, आणि सभा घेण्यात आली. या सभेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी सभेच्या
आयोजकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली पोलीस दलातल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सेनगाव इथून साडे सहा लाख
रुपयांचा गुटखा जप्त केला. परभणीहून आणलेल्या गुटख्याची सेनगाव इथं साठवणूक
केल्याची माहिती मिळाल्यानंतर काल ही कारवाई करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी काल शालेय पोषण आहारासाठीची डाळ बाजारपेठेतल्या एका दुकानातून जप्त केली. मूग तसंच मसूर डाळीचा हा साठा काळ्याबाजारात खरेदी करणाऱ्या दुकान
मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
जालना जिल्ह्यात मंठा तालुका पशुचिकित्सालयातला सेवानिवृत्त
पशुसंवर्धन सहायक आयुक्त बाळासाहेब राजूरकर याच्याविरुध्द पाच हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी
काल गुन्हा दाखल करण्यात आला. राजूरकर यानं तक्रारदार शेतकऱ्याच्या गायीवर
उपचार करण्यासाठी ही लाच मागितली होती.
****
परभणी जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी शौचालय बांधकामात सक्रीय सहभाग नोंदवण्याचं आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी केलं आहे. ३१ डिसेंबर पर्यंत शौचालयांचं बांधकाम पूर्ण केलं नाही तर यापुढे शौचालयासाठी
निधी मिळणार नसल्याचं केंद्र सरकारनं सूचित केलं आहे. या पार्श्वभूमीवर
पृथ्वीराज यांनी शौचालय बांधकामानंतर दिला जाणारा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्याचा
निर्णय घेतला आहे. यामुळे शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांना
प्रोत्साहन अनुदान तत्काळ मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माळेगाव इथल्या यात्रेत काल लोककला महोत्सव पार
पडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई जवळगावकर यांच्या हस्ते महोत्सवाचं
उद्घाटन झालं. माळेगाव यात्रा म्हणजे पारंपारिक लोककलेचं उगमस्थान
असल्याचं मत आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
औरंगाबाद इथं हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं आज बीबी का मकबरा परिसरात हेरिटेज वॉकचं
आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी साडेसात वाजता या वॉकला सुरूवात होणार
आहे. यात इतिहास तज्ज्ञ डॉ.दुलारी कुरैशी आणि रफत कुरैशी बीबीका मकबऱ्याविषयी
इतिहास प्रेमींनी मार्गदर्शन करणार आहेत.
****
मनमाड ते सिकंदराबाद अजंठा एक्सप्रेसच्या वेळेत दहा जानेवारीपासून बदल करण्यात
आला आहे. ही गाडी मनमाड इथून सायंकाळी पावणे सहा वाजता
सुटणार असून औरंगाबाद, परभणी, नांदेड मार्गे
सिकंदराबादला पहाटे पाच वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात
या गाडीच्या वेळेमध्ये कुठलाही बदल करण्यात आला नसून ती निर्धारित वेळेत संध्याकाळी
सहा वाजून दहा मिनिटांनी सिकंदराबाद स्थानकावरून सुटणार आहे.
****
नांदेड - अमुतसर सचखंड एक्सप्रेस रेल्वेगाडी आज तिच्या
निर्धारित वेळेपेक्षा तीन तास पंचेचाळीस मिनिटं उशिरा दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी
नांदेड इथून सुटणार आहे. अमृतसरहून येणारी रेल्वेगाडी उशिरा धावत
असल्यामुळे ही गाडी उशिरा सुटणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं
कळवलं आहे.
****
नांदेड- औरंगाबाद- नांदेड आणि नांदेड- पनवेल- नांदेड विशेष रेल्वेगाडीच्या फेऱ्यांमध्ये पुढच्या महिन्यात वाढ करण्यात
आली आहे. नांदेड - औरंगाबाद - नांदेड ही रेल्वे गाडी एक जानेवारी ते ३१ जानेवारी
दरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावेल. तर नांदेड
-पनवेल - नांदेड ही रेल्वेगाडी प्रत्येक शनिवारी आणि परतीच्या प्रवासात रविवारी धावणार आहे.
****
ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये ५१ किलो वजनी गटात मुष्टीयुद्धा
मेरी कोम हिनं काल निखत झरीन हिचा पराभव केला. पुढच्या वर्षी चीनमध्ये
होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी मेरीकोमनं आपलं स्थान निश्चित केलं आहे.
****
No comments:
Post a Comment