Monday, 23 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००

****



 नागरिकता सुधारणा विधेयकाच्या समर्थनात भारतीय जनता पक्षाने आज कोलकात्यातून अभिनंदन फेरी काढली. हा कायदा प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचं अभिनंदन करणं, आणि या कायद्यासंदर्भात देशभरात पसरवण्यात आलेला संभ्रम दूर करणं, या उद्देशानं पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली. पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या अभिनंदन यात्रेत सहभागी झाले.

****



 राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज दिल्लीत राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची समाधी राजघाट इथं सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग, माजी अध्यक्ष राहुल गांधी, यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले. संविधानानं प्रस्थापित केलेली तत्व सांभाळणं आणि सर्वांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.

****



 झारखंड विधानसभा निवडणुकीतल्या ८१ पैकी तीन जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये दोन जागांवर भाजप तर अखिल झारखंड विद्यार्थी संघटना - AJSU ने एक जागा जिंकली आहे. याशिवाय २५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणूक निकालाचा कल काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीकडे असून, काँग्रेसचे १४ तर झारखंड मुक्ती मोर्चाचे २९ उमेदवार आघाडीवर आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार पाच जागांवर तर झारखंड विकास मोर्चाचे उमेदवार तीन जागांवर आघाडीवर आहेत.

****



 कोणत्याही हल्ल्यास त्वरित प्रत्युत्तर देणाऱ्या क्षेपणास्त्राची आज ओडिशात बालासोर नजिक यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओ नं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राने आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र पुढच्याच वर्षात सैन्यदलात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे.

****



 उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत ६६ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. ‘हेलारो’ या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ‘बधाई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ‘मनोरंजनपर’ चित्रपट, अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, आयुष्मान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, कीर्ती सुरेश हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सुरेखा सिकरी यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री, स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता,  ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार, ‘नाळ’ या चित्रपटातला बालकलाकार ‘श्रीनिवास पोफळे’ याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि याच चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला.



 पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘पाणी’ या मराठी चित्रपटानं मिळवला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार ‘ओंडाला इराडाला’ या कन्नड चित्रपटाला प्रदान करण्यात आला.

****


 नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आज नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह अनेक मान्यवर या समर्थन धरणे आंदोलनात सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****   

बुलडाणा जिल्ह्यात शेगांव इथं, नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींनी हा कायदा लागू करण्यापूर्वी या कायद्याचे स्वयंमूल्यमापन करून निर्णय घ्यावा, अशी विनंती या मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
****

 नांदेड जिल्ह्य़ाच्या लोहा तालुक्यात माळेगाव इथल्या खंडोबा यात्रेला उद्या पासून प्रारंभ होत आहे.  उद्या सकाळी पालखी पुजन आणि देवस्‍वारी काढून या यात्रेला सुरवात होणार आहे. ही यात्रा येत्‍या २८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या यात्रेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्‍यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 
****  

 हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेत फटाका फुटून एक प्रवासी जखमी झाला आहे. परळी स्थानकावर ही घटना घडली. सय्यद अक्रम असं या प्रवाशाचं नाव असून, तो परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथला रहिवासी आहे. फटाका फुटल्याने त्याच्या तोंडाला इजा झाली असून, त्याच्यावर अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.  
*****
*** 

No comments: