Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ डिसेंबर
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** राज्यातल्या कोणत्याही जाती-धर्मातल्या नागरिकांच्या हक्काला धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्र्याचं आश्वासन
** झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत
** राज्य मंत्रिमंडळाचा येत्या ३० डिसेंबरला विस्तार
** मुंबई-नागपूर महामार्गावर जळगाव जिल्ह्यात झालेल्या ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपच्या अपघातात नऊ जण ठार
आणि
** उस्मानाबादचे काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातला आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार
****
राज्यातल्या कोणत्याही जाती-धर्मातल्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं. सुधारित नागरिकत्त्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्त्व कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज न बाळगण्याचं आणि राज्यात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला केलं.
****
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून या आघाडीला ८१ जागांपैकी ४६ जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला २५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. राज्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत.
****
सरकारनं शेतकऱ्यांचं फक्त थकित कर्ज माफ करुन त्यांचा विश्वासघात केला असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे, ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते. अवकाळी पाऊसग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची अधिक गरज होती मात्र, ते या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहणार असल्याचं, फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी सात-बारा कोरा करण्याचं आश्वासन पूर्ण करायला हवं, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही पक्ष करत असल्याचा आरोप, फडणवीस यांनी केला. हा कायदा, नागरिकत्व देणारा कायदा आहे, काढून घेणारा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आज मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची काल दिवसभर चर्चा होती, मात्र काँग्रेस पक्षानं अद्याप आपल्या मंत्र्यांची यादी निश्चित न केल्यामुळे हा विस्तार आता ३० डिसेंबरला करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना, सरकारच्या योजना घराघरात पोहोचवण्याचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ठाकरे यांनी काल प्रथमच मुंबईत शिवसेना भवनाला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारनं अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं असून, शिवसैनिकांनी नागरिकांना त्यासाठी मदत करावी, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं एक जानेवारी रोजी साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा पोलिसांनी १६३ जणांना जिल्हा बंदीची नोटीस बजावली असून, यामध्ये संभाजी भिडे तसंच मिलिंद एकबोटे यांचा समावेश आहे. एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचारानंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. भिडे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला होता, या पार्श्वभूमीमुळे या दोघांनाही संबंधित नोटीस बजावली असल्याचं, पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलं आहे.
****
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत ६६ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते. ‘हेलारो’ या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ‘बधाई’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ‘मनोरंजनपर’ चित्रपट, अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, आयुष्मान खुराना आणि विकी कौशल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता, कीर्ती सुरेश हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सुरेखा सिकरी यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री, स्वानंद किरकिरे यांना ‘चुंबक’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, ‘भोंगा’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार, ‘नाळ’ या चित्रपटातला बालकलाकार ‘श्रीनिवास पोफळे’ याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार आणि याच चित्रपटासाठी सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘पाणी’ या मराठी चित्रपटानं मिळवला आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गीस दत्त पुरस्कार ‘ओंडाला इराडाला’ या कन्नड चित्रपटाला प्रदान करण्यात आला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातल्या पिंपळकोठा गावानजीक ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा अपघात होऊन नऊ जण ठार तर आठ जण जखमी झाले. मुंबई - नागपूर महामार्गावर ट्रकचा स्टेअरींग रॉड तुटल्यानं हा ट्रक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी जीपवर जाऊन आदळल्यामुळे हा अपघात झाला. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
****
मराठवाड्यातले काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातला आरोपी पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार बनला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष न्यायालयानं त्याच्या अर्जाला मंजुरी दिली. राजकीय वैमनस्यातून निंबाळकर आणि त्यांच्या वाहनचालकाची १३ वर्षांपूर्वी हत्या झाली होती.
****
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काल नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह अनेक मान्यवर या समर्थन धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. लातूर जिल्ह्यात उदगीर इथंही काल या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली.
****
बुलडाणा जिल्ह्यात शेगांव इथं, काल नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींनी हा कायदा लागू करण्यापूर्वी या कायद्याचे स्वयं मूल्यमापन करून निर्णय घ्यावा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात काल जालना शहरात संविधान बचाव कृती समितीच्यावतीने संविधान बचाव महापदयात्रा काढण्यात आली. मस्तगड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झालेल्या या पदयात्रेत मुस्लिम समाजबांधवांसह सर्व समाज घटकातल्या नागरिकांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. छत्रपती संभाजी महाराज चौकात ही पदयात्रा एका जाहीर सभेत विसर्जित झाली.
वाशिम जिल्ह्यात मंगरूळ पीर इथंही मुस्लिम बांधवांच्या वतीनं काल या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा लिहिलेले फलक तसंच राष्ट्रध्वज हाती घेतलेले अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
*****
नागरिकत्त्व सुधारणा कायद्यातल्या तरतुदींबाबत मोठ्या प्रमाणावर समज-गैरसमज आहेत, या पार्श्वभूमीवर ऐकू या कायद्यातल्या तरतुदींविषयीची माहिती.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातले मुस्लिम कधीही भारतीय नागरिक होऊ
शकणार नाहीत का?
नागरिकत्व कायद्याच्या कलम सहानुसार, कोणतीही विदेशी व्यक्ती नागरिकीकरण प्रक्रियेच्या
माध्यमातून भारताचं नागरिकत्व मिळवू शकते. याशिवाय नागरिकत्व कायद्याच्या कलम पाचनुसारही
नागरिकत्व नोंदणी करता येऊ शकते. कायद्यातल्या या दोन्हीही तरतुदी कायम आहेत.
****
हैदराबादला जाणाऱ्या रेल्वेत फटाका फुटून एक प्रवासी जखमी झाला. काल परळी स्थानकावर ही घटना घडली. सय्यद अक्रम असं या प्रवाशाचं नाव असून, तो परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथला रहिवासी आहे. फटाका फुटल्याने त्याच्या तोंडाला इजा झाली असून, त्याच्यावर अंबाजोगाई इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातल्या माळेगाव इथल्या प्रसिध्द खंडोबा यात्रेला आजपासून पालखी पूजन आणि देवस्वारी काढून सुरुवात होत आहे. या यात्रेत दुपारी कृषी प्रदर्शन, विविध दुकानांचं उद्घाटन तसंच कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे. येत्या शनिवारपर्यंत चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात मार्डी गावात यमाई देवीच्या मंदिरात काल पहाटे चोरी झाली. यामध्ये ४० किलो चांदी, सहा तोळे सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील अडीच लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे.
****
भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळ लातूर जिल्ह्यात अपंगांसाठी कृत्रिम अवयव वितरण करण्यासाठी येत्या ३१ डिसेंबर ते सात जानेवारी दरम्यान तालुका निहाय तपासणी शिबीरं घेणार आहे. या शिबिरात जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांगांची नोंदणी करण्याचं आवाहन खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment