Monday, 23 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23.12.2019 TIME – 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 December 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ डिसेंबर २०१दुपारी .०० वा.

****

झारखंड विधानसभा निवडणूक निकालात आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार २९ जागांवर तर काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार ४२ जागांवर पुढे आहेत, यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा २४, काँग्रेस तेरा तर राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार पाच जागांवर आघाडीवर आहेत. मात्र अद्याप एकाही जागेचा अंतिम निकाल हाती आलेला नाही. ८१ जागा असलेल्या झारखंड विधानसभेत बहुमतासाठी ४२ सदस्य संख्या आवश्यक आहे. दरम्यान निवडणूक कल काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आघाडीच्या बाजूने दिसत असल्यानं, दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्ते फटाके फोडून तसंच मिठाई वाटप करून जल्लोष करत असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी मात्र भाजपच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. अजून मतमोजणी पूर्ण झालेली नाही, अंतिम निकाल भाजपच्या बाजूले असेल, असं दास यांनी म्हटलं आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अफवा पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही पक्ष करत असल्याचा आरोप, विधानसभेतले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. हा कायदा, नागरिकत्व देणारा कायदा आहे, काढून घेणारा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचा आरोप फेटाळून लावत, आर्थिक स्थिती उत्तम असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. नागपुरात झालेलं राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन हे फक्त औपचारिकतेपुरतंच होतं, असंही फडणवीस यांनी म्हटल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज जालना शहरात संविधान बचाव कृती समितीच्यावतीने संविधान बचाव महापदयात्रा काढण्यात आली. मस्तगड इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झालेल्या या पदयात्रेत मुस्लिम समाजबांधवांसह सर्व समाज घटकातल्या नागरिकांनी हातात तिरंगा झेंडा घेऊन मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. छत्रपती संभाजी महाराज चौकात ही पदयात्रा एका जाहीर सभेत विसर्जित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

वाशिम जिल्ह्यात मंगरूळ पीर इथंही मुस्लिम बांधवांच्या वतीनं आज या कायद्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा लिहिलेले फलक तसंच राष्ट्रध्वज हाती घेतलेले अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

****

सातारा जिल्ह्यात कोयना खोऱ्याला आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक सहा दशांश एवढी नोंदवली गेली. सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सुदैवानं या भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.

****

मुंबई महानगरपालिका बांधा वापरा आणि हस्तांतरित करा - बीओटीवर पशु वैद्यकीय रुग्णालय उभारणार आहे. टाटा समूह हे रुग्णालय उभारणार असून सुधार समितीच्या बैठकीत या रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली. हे रुग्णालय उभारणीसाठी सर दोराबजी टाटा ट्रस्ट या संस्थेनं पुढाकार घेतला आहे. मात्र रुग्णालयाची मालकी मुंबई महापालिकेकडेच राहणार आहे.

****

पुणे जिल्ह्यात कोरेगाव भीमा इथं एक जानेवारी रोजी साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा पोलिसांनी १६३ जणांना जिल्हाबंदीची नोटीस बजावली असून, यामध्ये संभाजी भिडे तसंच मिलिंद एकबोटे यांचा समावेश आहे. एक जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचारानंतर एकबोटे यांना अटक करण्यात आली होती. भिडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता, या पार्श्वभूमीमुळे या दोघांनाही संबंधित नोटीस बजावली असल्याचं, पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

डिसेंबरच्या महिन्यात अवैध मद्य विक्रीवर नियंत्रण मिळवता यावं, तसंच भेसळयुक्त मद्याची विक्री आणि वापर रोखता यावा यासाठी मुंबई शहर पोलीसांनी ९ तपासणी पथकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मद्यविक्रीतले गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागनं मुंबई शहरातल्या स्पोर्टस क्लब, पंचतारांकित हॉटेल्स, तसंच देशी - विदेशी मद्याच्या दुकानांना एक दिवसाचे मद्यप्राशन परवाने वितरीत केले आहेत.

****

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या क्रिकेट कारकीर्दीला आज पंधरा वर्ष पूर्ण झाली. साडे तीनशे एकदिवसीस सामने, नव्वद कसोटी सामने आणि अट्ट्याण्णव टी ट्वेंटी सामन्यांमध्ये, कुशल यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत धोनी याने आठशे २९ फलंदाजांना यष्टिचित केलं आहे. या सर्व सामन्यांमध्ये मिळून त्याने सतरा हजार २६६ धावा काढल्या आहेत.

****




No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...