Monday, 30 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 30.12.2019 TIME - 7.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१सकाळी ७.१० मि.

****

** महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार; ३६ मंत्री घेणार शपथ

** देशाला तरुण पिढीकडून अनेक अपेक्षा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

** ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित

आणि

** भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, रॅपिड बुद्धिबळ प्रकारात विश्वविजेती

****

राज्यातल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. विधानभवनाच्या प्रागंणात दुपारी एक वाजता  हा  शपथविधी सोहळा होणार असून एकूण ३६ मंत्र्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शपथ देतील. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी दहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री,  पद आणि गॊपनीयतेची शपथ घेतील. तर काँग्रेसकडून आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीला काल अंतिमरूप देण्यात आलं असून त्या सर्वांची नावं मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांकडे सोपवली आहेत. शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांचं खातेवाटप मुख्यमंत्र्यांकडून केलं जाईल. मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांकडून काही तरूणांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

****

देशाला तरुण पिढीकडून अनेक अपेक्षा आहेत. या तरुणांनीच देशाला नवीन उंचीवर न्यायचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी काल देशवाशियांशी संवाद साधला. या मालिकेचा साठावा भाग काल प्रसारित झाला.

दोन दिवसांत २०२० हे नवीन वर्ष सुरू होणार असून, आपण २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश करणार असल्याचं ते म्हणाले. २१ व्या शतकातली ही सोशल मीडियाची, प्रतिभावान पिढी, देशाच्या विकासाला गती देण्यात सक्रिय भूमिका बजावेल, असंही पंतप्रधान म्हणाले. एखादी व्यवस्था योग्य रीतीनं काम करत नसेल, तर आजचे युवक अस्वस्थ होतात आणि धैर्यानं व्यवस्थेला जाब देखील विचारतात, हे आपल्याला चांगलं लक्षण, वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

नवीन वर्ष, नवीन दशक, नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह - चला पुढे जाऊया, असं सांगून पंतप्रधानांनी, देशवाशियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

****

निमलष्करी दलातला प्रत्येक जवान वर्षातले शंभर दिवस तरी आपल्या कुटुंबासोबत घालवू शकेल, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महानिदेशालयाच्या इमारतीची पायाभरणी करताना ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबांची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं असून, राज्य सरकारला जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य कार्ड उपलब्ध करुन देण्याचं आवाहन केलं आहे. तसंच जवानांना घराची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठीही एक समिती गठित केली आहे, असं त्यांनी नमूद केलं.

****

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी, काल रांची इथं झारखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी, सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांच्यासह काँग्रेस पक्षाचे डॉक्टर. रामेश्वर उरांव, आलमगीर आलम आणि राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सत्यानंद भोक्ता यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.

****

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना काल नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सुवर्ण कमळ आणि दहा लाख रुपये रोख, असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. बच्चन यांनी यावेळी सरकार, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच निवड समितीचे आभार मानले. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहू शकले नव्हते.

****

राज्य सरकारनं कर्जमाफी देताना अटी शर्ती लागू करुन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नाशिक इथं काल आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आयुष्मान भारत ही योजना पारदर्शी योजना असल्याचं फडणवीस म्हणाले.  

दरम्यान,  बेळगाव मधल्या मराठी माणसाच्या प्रश्नावर वार्ताहरांशी बोलताना फडणवीस यांनी, मराठी माणूस हा मराठी माणसाबरोबरच राहील, असं स्पष्ट केलं.

****

देशात महिला अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी याकरता सक्षम कायदा तयार करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. हैदराबाद प्रकरणातल्या आरोपींचा पोलिस चकमकीत मृत्यू होण्याला देशातल्या जनतेनं समर्थन देणं, यातून लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला असल्याचं दिसून येतं, असं हजारे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. निर्भया प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत आपलं मौन व्रत सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

रायगड संवर्धन प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाड ते रायगड किल्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली. किल्ल्यावर जाण्यासाठीच्या रोपवेच्या कामात दिरंगाई तसंच संबंधित विभागाचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलं.

****

सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर काल शिवसेना आणि कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिवसैनिकांनी भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्याचं तिरडी मोर्चा काढून दहन केलं. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.

दरम्यान, महाराष्ट्र- कर्नाटकच्या सीमा भागातल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली इथून जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. कन्नड भाषिक नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना गोळ्या घाला, असं वक्तव्य केल्यामुळे सीमेलगतच्या भागात तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर आणि सांगलीकडून कर्नाटकात येणाऱ्या बसेस काल सकाळपासून बंद झाल्या आहेत. तसंच या मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात कालही राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

नाशिक शहरात या कायद्याच्या समर्थनार्थ १६ ठिकाणी मानवी साखळी करण्यात आली होती. अकोला इथंही काल समर्थन रॅली काढण्यात आली, तर  धुळे शहरातही भारतीय जनता पक्ष, विविध हिंदुत्ववादी संघटना तसंच या कायद्याला समर्थन देणाऱ्या नागरिकांनी मोर्चा काढून, जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं.

****

औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात मक्रणपूर इथं आज एक्यांशीवाव्यामक्रणपूर परिषद आणि जयभीम दिनाचंआयोजन करण्यात आलं आहे. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहन- धम्मोपदेशनंतर ज्येष्ठ विचारवंत दत्ता भगत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं  उद्घाटन होईल. ज्येष्ठ विधिज्ञ डी. एन. संदानशिव परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. यावेळी साहित्यक शिल्पा कांबळे यांना स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब मोरे साहित्य पुरस्कार आणि  भादोला इथले आंबेडकरी  जलसाकार जनार्दन गवई यांना भाऊसाहेब मोरे प्रबोधन पुरस्कार प्रदान केला जाईल.

****

बीड जिल्ह्यातल्या ११ पंचायत समिती सभापती- उपसभापतींची आज निवडणूक होत आहे. यामध्ये  शिरूर पंचायत समितीसाठी अनुसूचित जाती - महिला, परळी- इतर मागासवर्गीय, माजलगावसह  आष्टी- इतर मागासवर्गीय महिला, तसंच गेवराई,धारूर,बीड याठिकाणी  खुल्या तर केज, अंबाजोगाई, पाटोदा, वडवणी इथं खुल्या प्रवर्गातल्या महिलांसाठी आरक्षण देण्यात आलं आहे.

****

भारताची महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, रॅपिड बुद्धिबळ प्रकारात महिला विश्वविजेती ठरली आहे. रशियात मॉस्को इथं झालेल्या अंतिम सामन्यात तिनं चीनच्या ली तिंगजी हिला अटीतटीच्या लढतीत पराभूत केलं.

****

औरंगाबाद इथं बीबी का मकबरा परिसरात इतिहासप्रेमींनी काल हेरिटेज वॉकचं आयोजन केलं होतं. यात इतिहास तज्ज्ञ डॉक्टर. दुलारी  कुरैशी आणि डॉक्टर रफत कुरैशी यांनी बीबी का मकबऱ्याविषयी इतिहासप्रेमींना मार्गदर्शन केलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातल्या वाडी मुक्त्यारपूरचे रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक साहेबराव देशमुख यांचं काल निधन झालं, ते ९५ वर्षाचे होते. साहेबराव देशमुख यांनी निजाम सत्तेविरूध्द झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या पार्थिवावर आज मुक्त्यारपूर वाडी इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

औरंगाबाद-जालना महामार्गावर गेवराई बाजार फाट्यावर जेसीबी घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा काल अपघात झाला. यात दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघे जण जखमी झाले आहेत.

****

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या दूधपुरी इथं शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. काल सकाळी ही घटना उघडकीस आली. सिद्धेश्वर रामकिसन धांडे, शुभम कल्याण पाटोळे अशी मृतांची नावं असून, दोघेही परवा सायंकाळपासून बेपत्ता होते.

****

नाशिक-पंचवटी एक्सप्रेसला पर्याय म्हणून मनमाड ते मुंबई ही राज्यराणी इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु, आता ती मनमाडऐवजी नांदेडपर्यंत नेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी काल नाशिक रोड रेल्वे स्थानकावर नागरिकांनी निदर्शनं केली. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण इथं काल अखिल भारतीय प्रकाशक संघाच्या तिसऱ्या लेखक- प्रकाशक संमेलनाचा समारोप झाला. साहित्यिक चळवळीला शासनाची ही भरीव मदत मिळाली पाहिजे, असं मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी समारोप समारंभात व्यक्त केलं. पुढचं लेखक प्रकाशक संमेलन नाशिक इथं होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

****








No comments: