Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ डिसेंबर
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** हिंसाचारापासून
दूर राहण्याचं आणि सार्वजनिक
मालमत्तेचं नुकसान न करण्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन
** नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिम
आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
** राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आज दिल्लीत वितरण
आणि
** अंतिम सामन्यात विजय मिळवत भारतानं
वेस्ट इंडिजविरूद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका दोन-एक फरकानं जिंकली
****
जनतेनं
हिंसाचारापासून दूर राहावं, तसंच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करू नये, असं आवाहन करत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी
यांचा विशिष्ट धर्माच्या लोकांशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारतीय
जनता पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भात सरकारनं
अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून ही बाब, आसामशी संबंधित असल्याचं त्यांनी यावेळी
नमूद केलं. शेजारच्या देशांमध्ये धार्मिक छळ झाल्यानं भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना
नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
सरकारच्या विविध विकास कामांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, विरोधी पक्षांना, सरकारच्या
प्रयत्नांमध्ये भेदभाव शोधून दाखवण्याचं आव्हान दिलं.
****
नागरिकत्व
सुधारणा कायदा मुस्लिम आणि अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही असं केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल या कायद्याच्या समर्थनार्थ भाजप, विश्व हिंदू
परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि लोकाधिकार मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
हा कायदा अल्पसंख्याकांच्या बाबतीत कसलाही भेदभाव करत नाही, विरोधी पक्ष मतपेढीचं राजकारण
आणि अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करत असल्याची टीकाही गडकरी यांनी केली.
जालना
शहरातही काल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीनं
फेरी काढली. विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या फेरीत सहभाग घेतला.
****
नाशिक
इथं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात काल मुस्लिम
संघटनांनी निषेध सभा घेतली. हे कायदे रद्द करण्याची, तसंच बेरोजगारांना रोजगार देण्याची
मागणी यावेळी करण्यात आली. रझा अकादमी, नुरी अकादमीच्या या निषेध सभेत काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
****
भारतीय
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचं
स्वागत केलं, मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांना संपूर्ण दिलासा देत नसल्याचं म्हटलं आहे.
ते काल जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. योजनेची व्याप्ती, लाभार्थ्यांची संख्या
याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय योजनेबद्दल काहीही बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले.
आपण भाजप सोडून जाणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
****
६६वे राष्ट्रीय
चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्ली इथं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते
प्रदान केले जाणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपट सृष्टीतल्या योगदानासाठी
दादासाहेब फाळके हा सर्वोच्च पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट
म्हणून गुजराती चित्रपट हेल्लारोला तर हिंदी चित्रपट अभिनेते आयुष्यमान खुराना आणि विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार दिला जाईल. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनाशी संबंधित सर्वोत्कृष्ट
चित्रपट गटात पाणी या मराठी चित्रपटाचा गौरव यावेळी केला जाईल.
****
‘हुनर
हाट’ हे भारताचं प्रतिकात्मक स्वरुप आहे असे गौरवोद्वार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी काढले. मुंबईत बांद्रा- कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीएच्या मैदानावर केंद्रीय
अल्पसंख्याक मंत्रालयानं भरवलेल्या ‘हुनर हाट’ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत
होते. यावेळी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्यांक
विभागाचे सचिव पी. के. दास उपस्थित होते. ‘हुनर हाट’ या उपक्रमामुळे छोट्या कलाकारांच्या
सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले.
****
झारखंड
विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानांची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार असल्याची
माहिती मुख्य निवडणूक अधिकारी विनयकुमार चौबे यांनी दिली. राज्यातल्या विधानसभेच्या
८१ जागांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान झालं होतं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा साठावा भाग असेल. या कार्यक्रमासाठी
नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या
नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं
आवाहन करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
इथं `औरंगाबाद फर्स्ट` या संस्थेच्या वतीनं ‘झाडांना वेदनामुक्त करु या’ अभियानाचा
प्रारंभ काल उद्योजक मानसिंग पवार यांच्या हस्ते झाला. झाडावर ठोकलेले खिळे काढून त्यांनी
या अभियानाची सुरूवात केली. शहरातल्या दिल्ली गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान ही मोहीम
राबवण्यात आली. औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी, मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक,
विद्यार्थी, प्रयास ग्रुपचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले होते.
****
नागरिकत्त्व
सुधारणा कायद्यातल्या तरतुदींबाबत मोठ्या प्रमाणावर समज -गैरसमज आहेत, या पार्श्वभूमीवर ऐकू या कायद्यातल्या तरतुदींविषयीची
माहिती.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातले या तीन देशातल्या हिंदू, शीख, बौद्ध,
जैन, पारशी आणि खिश्चन समुदायांना या नागरिकत्व सुधारणा कायद्याचा लाभ कसा होईल?
या शरणार्थ्यांकडे पासपोर्ट किंवा व्हिसा आदी कागदपत्रांचा अभाव असेल, आणि
संबंधित देशात त्यांचा छळ झालेला असेल, तर हे शरणार्थी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज
करू शकतील. या लोकांना नागरिकत्वाच्या किचकट प्रक्रियेतून सूट देत, भारतीय नागरिकत्व
देण्याचा अधिकार हा नागरिकत्व सुधारणा कायदा देतो.
****
कटक इथं
झालेल्या तिसऱ्या अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चार गडी राखून वेस्टइंडिजवर विजय
मिळवत भारतानं तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका दोन-एक अशा फरकानं जिकंली. वेस्टइंडिजनं
प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३१६ धावा करण्याचं आव्हानं भारताला दिलं. भारतानं ४९व्या
षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केलं. भारताचा कर्णधार विरोटी कोहली यानं
८५, लोकेश राहुल ७७, आणि रोहित शर्मानं ६३ धावा करत विजयाला हातभार लावला. सामनावीर
म्हणून विरोट कोहली, तर मालिकावीर म्हणून रोहित शर्माला सन्मानित करण्यात आलं.
***
महाराष्ट्र
लोकसेवा आयोगानं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरता यावर्षी घेतलेल्या परीक्षेत
परभणी जिल्हा न्यायालयातल्या तीन विधिज्ञांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे. गणेश खुपसे,
प्रतिभा कांबळे आणि विवेक राजूरकर अशी त्यांची नावं आहेत.
****
परभणी
शहरात पोलिसांनी काल छापा मारुन लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला. शहरातल्या नानलपेठ
परिसरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून हा गुटखा
पकडला.
****
हिंगोली
जिल्हा कलाध्यापक संघानं औंढा नागनाथ इथं काल निसर्ग दृश्य चित्रकला स्पर्धा घेतली.
पुणे, औरंगाबाद, माहूर, यवतमाळ, नांदेड, पुसद, परभणी, हिंगोली इथले विद्यार्थी, कलाशिक्षक,
चित्रकार, प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत
समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम काल घोषित झाला. पंचायत समितीच्या सभापतीपदाची
निवडणूक ३१ जानेवारीला, तर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक तीन जानेवारीला
होणार आहे. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलेसाठी आरक्षित
आहे.
दरम्यान,
औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित झाला असून
३१ डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. २६ डिसेंबरला अर्जांचं वितरण आणि २७ डिसेंबरपासून
अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याचं नगर सचिव कार्यालयानं म्हटलं आहे.
****
बीड जिल्हा
परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक चार जानेवारीला होणार आहे. तर जिल्ह्यातल्या
११ पंचायत समित्यांमधल्या पदाधिकाऱ्यांची निवड ३० डिसेंबरला करण्यात येणार असल्याचं
प्रभारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या फुलंब्रीच्या तलाठ्याला काल पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत
प्रतिबंधक विभागानं अटक केली. दिलीप बावस्कर असं त्याचं नाव असून, हॉटेलची कर आकारणी
कमी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. कर आकारणीचे साडे तीन हजार रुपये आणि लाचेचे
पाच हजार रुपये असे साडेआठ हजार रुपये स्विकारताना ही कारवाई करण्यात आली.
****
ढाका इथं
झालेली आंतरराष्ट्रीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा भारताच्या मीराबा लुवांग यानं जिंकली
आहे. पुरुष एकेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात मीराबानं मलेशियाच्या केन योंग ओंग
याचा २१ - १४, २१ - १८ असा पराभव केला.
महिला
एकेरीच्या अंतिम सामन्यात मात्र भारताच्या ट्रीसा जॉलीला पराभवाचा सामना करावा लागला.
****
No comments:
Post a Comment