Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 28 December
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
राज्य सरकारनं महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शासन निर्णय आज
जारी केला आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९
या काळात दोन लाख रूपयांपर्यंत एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या अल्प तसंच
अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याच काळात पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन
करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या तसंच व्याजासह थकित असलेल्या हप्त्याची रक्कम
दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
राज्यातले आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी-माजी खासदार तसंच आमदार यांना तसंच चतुर्थ
श्रेणी कर्मचारी वगळता ज्या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन २५ हजार
रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
****
कॉंग्रेस पक्ष आज आपला एकशे पस्तीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे. यानिमित्त पक्षातर्फे
देशभरनागरिकता सुधारणा कायद्याविरुद्ध संविधान बचाव - देश बचाब आंदोलन केलं जात आहे.
यामध्ये मोर्चे काढण्यात आले असून जाहीर सभांमधून संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं
जात आहे.
मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीजवळच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापर्यंत
संविधान वाचवा-देश वाचवा मोर्चा काढण्यात आला. पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन
खरगे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. मोर्चापूर्वी ऑगस्ट क्रांतीमधील शहिदांना
श्रध्दांजली वाहण्यात आली. केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेशसह अन्य राज्यातही
अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, पक्ष वर्धापनदिनानिमित्त पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते दिल्लीत
मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. माजी पंतप्रधान मनमोहसिंग, ज्येष्ठ नेते ए. के.
अँटनी, मोतीलाल व्होरा, आनंद शर्मा यांच्यासह
पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिकत्त्व
नोंदणी हे नोटबंदी पेक्षाही आपत्तीजनक असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी
यावेळी बोलतांना केली.
****
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सबनीस यांच्या निधनामुळे कलाक्षेत्राचा मार्गदर्शक
हरपला असून संपूर्ण ‘व्यंगनगरी’ मूक झाली आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी आपल्या भावना
व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांच्या शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानी जाऊन
त्यांचे अंत्यदर्शन घेतलं.
****
नागरिकता संशोधन कायद्याच्या विरोधात आज धुळे इथं जमियात उलेमा आणि विविध मुस्लिम
संघटनांसह काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
या धरणे आंदोलनामुळे परिसरातली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून मोठा पोलिस बंदोबस्त
लावण्यात आला आहे.
****
मुंबईतल्या साकीनाका भागातल्या कपड्याच्या गोदामाला काल लागलेल्या भीषण आगीत जखमी
झालेले दोघेजण आज मरण पावले. या भागातल्या जवळपास ३५ गोदामांना काल संध्याकाळी अचानक
आग लागली. या दुर्घटनेत अनेक लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचं
पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
राजधानी दिल्लीत आज या चालू हंगामातला सर्वात थंड दिवस नोंदवला गेला. सर्वात कमी
म्हणजे दोन पूर्णांक चार दशांश डिग्री सेल्सीयस इतकं कमी तापमानाची नोंद आज पहाटे तापमापकावर
झाल्याचं सफदरजंग वेधशाळेतून सांगण्यात आलं. शहरात पसरलेल्या घनदाट धुक्यामुळे दृश्यमानता
घटली असून याचा परिणाम विमानसेवा आणि रस्त्यावरच्या वाहतुकीवर झाला आहे. चार विमानसेवा
इतरत्र वळवण्यात आल्या असल्याचं विमानतळ नियंत्रण विभागाकडून सांगण्यात आलं. दृश्यमानता
घटल्यामुळे २४ रेल्वेगाड्या दोन ते पाच तास विलंबानं धावत असल्याचं रेल्वे विभागानं
सांगितलं.
****
मादक द्रव्य प्रतिबंधक चाचणीत दोषी आढळल्यामुळे भारतीय राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेतली
रजत पदक विजेती भारोत्तलक सीमावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. विशाखापट्टणम्
इथं झालेल्या ३४व्या राष्ट्रीय महिला भारोत्तलक स्पर्धेदरम्यान सीमाच्या रक्ताचा राष्ट्रीय
मादक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं नमुना घेतला होता. या नमुना तपासणीमध्ये बंदी असलेले
घटक आढळून आले, त्यामुळे तिला भारोत्तलन स्पर्धेतून चार वर्षांसाठी निलंबित करण्याचा
निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment