आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Thursday, 30 January 2020
Wednesday, 29 January 2020
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.01.2020 18.00
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****
न्यूझीलंड इथं झालेल्या
तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं सुपरओव्हर जिंकून विजय पटकावला. नाणेफेक जिंकून
प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान संघानं भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं.
भारतीय संघानं रोहित शर्माच्या ६५ धावांच्या बळावर वीस षटकांत पाच बाद एकशे एकोणऐंशी
धावा केल्या. न्यूझीलंडचा संघही वीस षटकांत सहा बाद एकशे एकोणऐंशी धावाच करू शकला,
त्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने सतरा धावा केल्या,
रोहित शर्माच्या दोन षटकारांच्या बळावर भारतानं अठरा धावा करून, सुपर ओव्हर आणि सामनाही
जिंकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत तीन सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी
घेतली आहे.
****
राज्य शासनाचा गानसम्राज्ञी
लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर झाला आहे. मानचिन्ह,
मानपत्र, शाल आणि ५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असून सांस्कृतिक कार्य मंत्री
अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या मुंबईत उषा खन्ना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात
येणार आहे. पुरुष संगीतकारांचं वर्चस्व असलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत दिग्दर्शक
म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या उषा खन्ना यांनी बिन फेरे हम तेरे, लाल बंगला, सबक,
हवस, हम हिंदुस्थानी, आप तो ऐसे ना थे, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, अनोखा बंधन,
शबनम, सौतन, आओ प्यार करे यासारख्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय लोकसंख्या
नोंदणी या कायद्यांना विरोध
करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा, काही कामगार संघटना तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं आज पुकारण्यात
आलेल्या भारत बंद ला राज्यभरात संमिश्र मिळाला.
औरंगाबाद शहरातल्या काही
भागांमध्ये दुकाने बंद करण्यासाठी फिरत असलेल्या जमावाला व्यापाऱ्यांनी विरोध केला
असता काही काळ तणाव निर्माण झाला होता. जिल्ह्यातल्या खुलताबाद शहरातला आठवडी बाजार
भरला नाही, अजिंठा चौफुली इथं मोर्चा काढण्यात आला. तर, सिल्लोड, बिडकीन, करमाड, शेकटा
परिसरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.
नांदेड शहरातल्या व्यापाऱ्यांनी बंद पाळण्यास नकार
देत आपली व्यावसायिक प्रतिष्ठानं सुरू ठेवली. हिंगोलीतही किरकोळ दुकानं बंद होती, मात्र
त्याचा बाजारपेठेवर परिणाम जाणवला नाही. परभणी जिल्ह्यात सेलू गंगाखेड तालुक्यात बंदला
काहीही प्रतिसाद मिळाला नाही, उर्वरित जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. लातूर
इथंही बंदला प्रतिसाद दिसून आला नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
यवतमाळ तसंच धुळे शहरात मात्र बंदला हिंसक वळण लागलं,
धुळ्यात आंदोलकांनी अनेक वाहनांवर दगडफेक केली तर काही वाहनं पेटवून दिल्याचं वृत्त
आहे.
यवतमाळ इथं आंदोलकांनी
दगडफेक केल्यामुळे वातावरण चिघळलं, व्यापारी आणि आंदोलक आमने सामने आल्याने दोन्ही
गटात वाद झाला. पोलिसांना लाठीमार करून, परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
****
महाविद्यालयीन शिक्षणात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच
कौशल्य विकास प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास शहराकडे धाव घेणारे विद्यार्थ्यांचे लोंढे
थांबतील, असं राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान - ‘रुसा’चे ज्येष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद
पाबरेकर यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं नारायणराव वाघमारे
महाविद्यालयात डॉ. पाब्रेकर यांच्या हस्ते आज पदवी प्रदान समारंभ झाला, त्यावेळी ते
बोलत होते. ग्रामीण भागातली गुणवत्ता तंत्रशुद्ध पद्धतीने विकसित होण्यावर डॉ पाब्रेकर
यांनी यावेळी भर दिला.
****
ग्रंथालय चळवळ तसंच शिक्षण क्षेत्रातले ज्येष्ठ कार्यकर्ते
अनंतराव चाटे यांचं आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं निधन झालं, ते ६६ वर्षांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले चाटे यांच्यावर अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद
तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान आज त्यांचं
निधन झालं, त्यांच्या पार्थिव देहावर वरवटी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी
आंदोलन मागे घेऊन नियमित वर्गांना सुरुवात केल्यावरच सर्व समस्या सोडवल्या जातील, असं
वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु
डॉ अशोक ढवण यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बदली
करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थी विद्यार्थिनींनी
ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 29.01.2020 TIME - 13.00
Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 29 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– २९ जानेवारी २०२० दुपारी ०१.०० वाजता
****
कोरोना
विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू
झाला असून, साडे चार हजार लोकांना त्याची बाधा झाली आहे. लोकांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन WHO अर्थात,
जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे. भारतासह जगातले सर्व देश चीनच्या हुबेई प्रांतातून आपल्या नागरिकांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तिथून परदेशी नागरिकांना
बाहेर काढण्याची गरज वाटत नसल्याचं जागतिक
आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
दरम्यान नोवेल कोरोना विषाणूवर प्रतिबंधक
लस विकसित करत असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.
यासाठी जागतिक आरोग्य प्राधिकरणाला चीननं सहकार्य करावं, असं आवाहन
अमेरिकेनं केलं आहे.
या लसीची पहिली चाचणी घ्यायला तीन महिने लागतील आणि त्यानंतर आलेल्या माहितीच्या पृथक्करणासाठी आणखी तीन महिने करण्यासाठी लागतील,
त्यानंतरच दुसरी चाचणी घेता येणार आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा तसंच राष्ट्रीय
लोकसंख्या नोंदणी या कायद्यांना
विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या वतीनं आज भारत बंदची हाक देण्यात
आली होती. या बंदला कोल्हापूर जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सर्व नागरी व्यवहार, सार्वजनिक वाहतूक, शाळा महाविद्यालयं सुरळीतपणे सुरू
आहेत. बंदचा कोणताही परिणाम जनजीवनावर जाणवला नाही. संघटनेच्या वतीनं आज पोलिस बंदोबस्तात मोर्चा
काढण्यात आला.
सातारा शहर आणि जिल्ह्यातही या बंदला फारसा प्रतिसाद
दिसून आला नाही. या
ठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं मात्र
या बंदला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी ऑटो रिक्षांच्या काचा फोडून रिक्षा
वाहतूक बंद पाडली. वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नाशिक मध्ये या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.
बहुजन क्रांती मोर्चा संघटनेच्या वतीनं शहरात मोर्चा काढण्यात येत आहे.
ठाणे शहर परिसरातही बंदचा फारसा
परिणाम जाणवला नाही, मात्र उपनगरी रेल्वेसेवा काही अंशी विस्कळीत झाली. मुंबईत कांजूरमार्ग
इथं रेल्वेमार्गावर आंदोलन करणाऱ्या सुमारे शंभर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
व्यापारी उद्योजक यांची शिखर संस्था असणाऱ्या
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेनं यापुढे कोणत्याही राजकीय बंदमध्ये
व्यापारी उद्योजक सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे, याची अंमलबजावणी आजच्या बंदपासून
सुरू करण्यात आली.
****
नाशिक जिल्ह्यात काल बस आणि ऑटो
रिक्षाच्या अपघातातली मृतांची संख्या २६ झाली आहे. काल बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक
होऊन, दोन्ही वाहनं रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून हा अपघात झाला होता.
****
शिक्षणामुळे
विद्यार्थ्यांत सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो, असं मत पोलीस
अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केलं. सांगली जिल्ह्यातल्या
मिरज इथं अटल टिंकरिंग लॅबच उद्घाटन पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं त्या वेळी काल बोलत होते. शास्त्रज्ञ
आणि तंत्रज्ञ तयार करणं,
गुणवत्ता प्रदान शिक्षणाबरोबरच शास्त्रज्ञ तयार करणं या उद्देशानं ही लॅब
तयार करण्यात आली आहे.
***
नाशिक जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढली आहे. नाशिक शहरात
आज सकाळी १३ पूर्णांक ९ दशांश इतक्या तापमानाची नोंद झाली.
***
भंडारा जिल्ह्यात सन २०१९-२० या
वर्षातल्या विकास कामांना
निधी देण्याचे तसंच पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याचे
निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज विधीमंडळात
विविध विभागांच्या सचिवांबरोबर पटोले यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना
केल्या.
****
बॅटमिंटनपटू
सायना नेहवालनं आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, नवी दिल्लीत भाजप पदाधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत सायननं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. सायनाची मोठी बहीण चंद्रांशू
नेहवाल हिनेही आज भाजपात प्रवेश केला.
****
पुणे इथं झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय बिलियर्ड्स स्पर्धेत
पंकज अडवाणीनं विजेतेपद मिळवलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात पंकजनं सौरव कोठारीचा पाच - दोन असा पराभव केला. पंकजचं हे ३३वं विजेतेपद
आहे.
****
भालाफेकपटू नीरज चोप्राने
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतला प्रवेश निश्चित केला आहे.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE - 29.01.2020 TIME - 11.00 AM
आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
दिल्लीतल्या
निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातला एक आरोपी मुकेश याची याचिका सर्वोच्च
न्यायालयानं फेटाळूल लावली आहे. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यावर मुकेशनं त्याविरोधात
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
****
कोरोना
विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणं असतील, तर लोकांनी पुढाकार घेऊन सरकारला याबाबत माहिती
द्यावी, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी केलं आहे. त्यासाठी
आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास कार्यरत संपर्क विभाग सुरु करण्यात आला असून, तिथं
या विषाणूसंदर्भातली सगळी माहिती उपलब्ध असणार आहे. या संपर्क विभागाचा दूरध्वनी क्रमांक
०११-२३ ९७ ८० ४६ असा आहे. आतापर्यंत देशातल्या विविध विमानतळांवर तब्बल ३५ हजार प्रवाशांची
आरोग्यविषयी तपासणी केल्याचंही डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.
****
प्रजासत्ताक
दिनानिमित्त नवी दिल्लीत चार दिवस चाललेल्या सोहळ्याची आज संध्याकाळी “बिटिंग द रिट्रीट”
कार्यक्रमानं सांगता होणार आहे. नवी दिल्लीतल्या विजय चौकात होणाऱ्या या ऐतिहासिक
कार्यक्रमात यावर्षी भारतीय संगीत रचना सादर होणार आहेत. लष्कर, हवाईदल आणि नौदल तसंच
केंद्रीय सशस्त्र पोलीस बल यांची बॅन्ड पथकं त्यांच्या चोवीस सांगितिक रचना उपस्थितांसमोर
सादर करतील.
****
कोल्हापूर
जिल्ह्यातल्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या किनी टोल नाक्यावर काल रात्री
पोलीस आणि गुंडांची टोळी यांच्यात गोळीबार झाला. या घटनेमध्ये पोलिसांच्या गोळीबारात
एक गुंड गंभीर जखमी झाला. रात्री उशीरा ही घटना घडली. या तिन्ही गुंडांना पोलिसांनी
अटक केली असून, ते गुंड राजस्थानातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
Subscribe to:
Posts (Atom)
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...