Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 March 2025
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
• भारताची ज्ञानकेंद्रं असलेल्या प्राचीन विद्यापीठांचं पुनरुज्जीवन होण्याची आवश्यकता उपराष्ट्रपतींकडून व्यक्त
• अंमलीपदार्थ प्रकरणी दोषी पोलिसांवर थेट बडतर्फीची कारवाई-मुख्यमंत्र्यांचा इशारा
• राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला प्रारंभ-२० लाख मुला मुलींची मोफत आरोग्य तपासणी
• ज्येष्ठ लेखिका डॉ मीना प्रभू यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार
• बीड जिल्ह्यात धारूर इथं दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर पळवणाऱ्या दोघांना अटक
आणि
• आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा न्यूझीलंडशी सामना
****
भारताची एकेकाळी ज्ञानकेंद्रं असलेल्या नालंदा, तक्षशिला अशा महत्त्वाच्या विद्यापीठांचं पुनरुज्जीवन होण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती बोलत होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध विभागांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आला. एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत धनखड यांनी वृक्षारोपणही केलं.
****
अंमलीपदार्थांच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं यापुढे केवळ निलंबन न करता पोलीस सेवेतून थेट बडतर्फ केलं जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत झालेल्या पोलीस संमेलनानंतर माध्यमांशी बोलत होते.
ड्रुग्स संदर्भात जिरो ट्रॉलन्स पॉलीसी असणार आहेत. आणि कुठलाही पोलीस कुठल्याही लाईनच्या असू हा जर ड्रग्सच्या संदर्भात थेट सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बर्तार्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे महिलांवरचे जे अत्याचार आहे त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात त्याची दाखल होणार यासंदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मचे माध्यमातून तसेच ट्रेकिंग आम्ही करतो आहोत
दरम्यान, ३५ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल ठाण्यात झाला. विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं.
****
राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय अर्थसंकल्पात ज्यापद्धतीनं सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, त्याच मार्गावर चालण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न असेल, असं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले..
उद्याच्या तीन तारखेला पुरवणी मागण्या पहिले मांडल्या जाणार आहेत. नवीन वर्षाचा अर्थसंकल्प आम्ही सादर करणार आहोत. दहा तारखेला कामगार सल्लागार समितीनं अर्थसंकल्प सादर करण्याच्या बद्दल मान्यता त्याबाबतीमध्ये दिलेली आहे. आणि एकंदरीतच केंद्रानी जसं सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या बजटच्या माध्यमातनं केलेला आहे, तसाच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रीमंडळ आम्हीपण अशाच रस्त्याने जाण्याचा विचार करतोय.
****
देशभरात जनऔषधी जनचेतना सप्ताहाला कालपासून सुरुवात झाली. येत्या ७ मार्च रोजी जन औषधी दिवस साजरा केला जाणार असून त्यानिमित्त या आठवड्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाला कालपासून प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पुण्यात या कार्यक्रमाचा मुख्य उद्घाटन सोहळा पार पडला. राज्यभरात जिल्हास्तरावरच्या ३५, तर तालुकास्तरावरच्या ३५५ शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये शून्य ते १८ वयोगटातल्या सुमारे २० लाख मुला मुलींची सर्वांगीण शारीरिक आरोग्य तपासणी, विनामूल्य शस्त्रक्रिया, करण्यात येणार आहे. प्रत्येक बालकाचं आरोग्य आणि उज्ज्वल भविष्याची जबाबदारी शासन पूर्ण निष्ठेनं पार पाडत असल्याचं, पवार यांनी सांगितलं, ते म्हणाले....
राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक बालकाच्या आरोग्याची आणि उज्वल भविष्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल या बद्दलची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ इच्छितो. आपण सर्वांनी मिळून या मोहिमेला संपूर्ण राज्यभर यशस्वी करू या. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाला सशक्त आणि निरोगी जीवनाची हमी देण्याचं काम करू या.
पालक आणि शाळा व्यवस्थापनासह सर्व संबंधित यंत्रणेने पुढच्या दोन महिन्यात हे अभियान राबवून त्याचा अहवाल सादर करण्याची सूचना आबिटकर यांनी यावेळी केली. ते म्हणाले...
सगळ्या योजनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अपेक्षित असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना उपयोग होतोय, भविष्यकाळामध्ये त्यांच्या एकूण आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण सगळेजण करतोय. त्याच धर्तीवरती या आर बी एस के प्रोग्रामचं आपण उद्घाटन केलंय. या योजनांच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी, पालकांनी आणि आमच्या आरोग्य विभागाच्या सर्व टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पुढच्या दोन महिन्यांमध्ये या सगळ्यांचे रिझल्टस् सुद्धा सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायचेत.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना प्रभू यांचं काल पुण्यात निधन झालं, त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसापासून आजारी असलेल्या प्रभू यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल सायंकाळी पुण्यात त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रभू यांच्या जीवन कार्याचा हा संक्षिप्त आढावा..
पुण्यात जन्मलेल्या प्रभू यांनी प्रथम पुणे आणि त्यानंतर मुंबईतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं, १९६६ साली विवाहानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या, तिथेच सुमारे वीस वर्षे त्यांनी भूलतज्ञ म्हणून काम केलं. प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये प्रवास केला आणि, 'माझं लंडन', 'मॅक्सिकोपर्व', 'ग्रीकांजली', 'इजिप्तायन', 'तुर्कनामा', 'अपूर्वरंग', आदी अनेक प्रवास वर्णनं लिहिली, जी वाचकांच्या विशेष पसंतीस उतरली. गोवा इथं झालेल्या महिला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मीना प्रभू यांनी भूषवलं होतं. त्यांना दि.बा.मोकाशी पारितोषिक, गो.नी.दांडेकर स्मृती पुरस्कार, न. चिं. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. पुण्यात २०१७ मध्ये "प्रभुज्ञान मंदिर" हा अत्याधुनिक किंडल लायब्ररी प्रकल्पही मीना प्रभु यांनी सुरू केला होता.
****
बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारूर इथं काल दहावीच्या इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका फोडल्याची घटना निदर्शनास आली. प्रश्नपत्रिकांचं वाटप झाल्यानंतर साडे अकरा वाजता दोन मुलांनी प्रश्नपत्रिका घेऊन खिडकीतून पलायन केलं. ही बातमी समजताच, पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात या दोघांनाही ताब्यात घेऊन प्रश्नपत्रिका जमा करून घेतली. या दोन्ही आरोपीविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल असं धारूरचे तालुका गट शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे यांनी सांगितलं आहे.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. दुपारी अडीच वाजता दुबई इथं सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेच्या अ गटातील हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहेत.
दरम्यान, स्पर्धेच्या ब गटात काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर सात गडी राखत विजय मिळवला. या गटात पाच गुणांसह दक्षिण अफ्रिका अव्वल स्थानी तर ऑस्ट्रेलिया चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात असलेल्या बाभळी बंधाऱ्यातून शून्य पूर्णांक सहा टीएमसी पाणी तेलंगणासाठी गोदावरी पात्रात सोडण्यात आलं. सदस्य समितीच्या उपस्थितीत हा विसर्ग काल करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
शासनाच्या विविध योजना, उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक दिवस गावकऱ्यांसोबत या नाविन्यापूर्ण उपक्रमांतर्गत काल परभणी जिल्ह्यातल्या ९ तालुक्यात ग्रामदरबार भरवण्यात आला. गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी काल गंगाखेड तालुक्यातल्या कोद्री इथं ग्रामदरबार उपक्रमामध्ये गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला आहे. काल सायंकाळी चंद्रदर्शनानंतर मशिदींमधून तरावीह ही विशेष नमाज अदा करण्यात आली. आज पहाटे सहर नंतर पहिला रोजा अर्थात उपवास सुरु झाला. आता संध्याकाळनंतर ईफ्तारद्वारे उपवास सोडला जाईल.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं काल ज्योतिर्लिंग महादेव मंदिरात रथोत्सव सोहळा साजरा झाला. सजवलेल्या रथात श्री नागनाथांची मूर्ती बसवून रात्री मंदिराच्या पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. याप्रसंगी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते.
****
जालना जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक सचिन इंगेवाड याच्यासह पोलीस शिपाई गोकुळदास देवळे आणि खाजगी व्यक्ती विष्णू कुदरणे यांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल एक लाख ८० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या एका न्यायालयाने सुनावलेल्या २ वर्षे कारावासाच्या शिक्षेविरोधात त्यांनी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं, त्यावर येत्या ५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेकडून होळी निमित्त जालना ते पाटणा दरम्यान विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्यात येणार आहेत. काचीगुडा ते अजमेर मदार या विशेष गाडीच्याही चार फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment