Tuesday, 11 March 2025

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ११ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 11 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ११ मार्च २०२ सकाळी .०० वाजता.

****

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२४-२५ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार खरीप अन्नधान्य उत्पादन एक हजार ६६४ लाख मेट्रिक टन तर रब्बी अन्नधान्य उत्पादन एक हजार ६४५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. या वर्षासाठी तांदळाचं उत्पादन एक हजार २०६ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. २०२३-२४ मध्ये हे उत्पादन एक हजार १३२ लाख मेट्रिक टन होतं. तूर आणि हरभऱ्याचं उत्पादन अनुक्रमे ३५ पूर्णांक ११ लाख मेट्रिक टन आणि ११५ पूर्णांक ३५ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार सातत्यानं काम करत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही आकडेवारी जाहीर करताना सांगितलं. कृषी मंत्रालयाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मदत आणि प्रोत्साहन मिळत असून, त्यामुळे कृषी उत्पादनात विक्रमी वाढ होत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.

****

राज्यसभेत काल रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ मंजूर करण्यात आलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक सादर केलं. या विधेयकाद्वारे भारतीय रेल्वे बोर्ड कायदा, १९०५ मधल्या सर्व तरतुदी रेल्वे कायदा, १९८९ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. लोकसभेनं या विधेयकाला आधीच मान्यता दिली आहे.

****

राज्याच्या काल सादर झालेल्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात व्यक्तीगत वापराच्या सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरच्या करात एक टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय ३० लाखापेक्षा अधिक किंमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी आणि बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एस्कॅव्हेटर्स या प्रकारातल्या वाहनांना तसंच मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर सात टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. विविध गोष्टींसाठी लागणारं मुद्रांक शुल्क शंभर रुपयांवरुन ५०० आणि एक हजार रुपये करण्याचा प्रस्तावही त्यांनी सादर केला आहे.

****

मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नयेयासाठी "कमवा आणि शिका" योजना अधिक प्रभावी करून त्यांना किमान दरमहा दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. योजनेतल्या सुधारणांमुळे विद्यार्थिनींसाठी मोठी शैक्षणिक मदत मिळेल, असं  उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते.

****

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काल पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या १०-१२ वर्षांपासून काँग्रेस पक्षाबरोबर काम करत असून, पक्ष सोडताना दु:ख होत असल्याचं ते म्हणाले.

****

बीड इथं काल एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव आणि मरावाड्यातल्या संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली. यात शैक्षणिक गुणवत्तेच्या सुधारणा, नवीन योजना आणि संस्थेच्या विकासासंबंधी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी ४५ संस्था चालक उपस्थित होते.

****

बिहार राज्यातला महाबोधी बौद्ध विहार कायदा १९४९ रद्द करुन, महाबोधी बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय रिपब्लकन पक्षाच्या वतीनं काल बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. यावेळी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथंल्या वेरूळ लेणी इथं कालपासून दोन दिवसाच्या किरणोत्सवाच्या सोहळ्याला सुरूवात झाली. यात लेणी क्रमांक दहा इथल्या चैत्यगृहातील गौतम बुद्धांच्या मूर्तीवर पायापासून ते चेहऱ्यावर सुर्यकिरणे विसावतात. या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक, अभ्यासकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ. संजय पाईकराव यांनी केलं आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये, बारामुल्ला जिल्ह्यातल्या गुलमर्ग इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या पाचव्या आवृत्तीच्या दुसऱ्या बर्फावरील खेळांच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पुरुष गटात पुण्याच्या सिद्धार्थ गडेकर यांनी, सुवर्णपदक जिंकलं.

****

जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२५ स्पर्धा आज दुपारी नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू मैदानावर सुरू होईल. तीन दिवसांच्या या स्पर्धेत २५० पॅरा-अ‍ॅथलीट्स सहभागी होतील, ज्यामध्ये १४५ भारतीय आणि २० देशांतले १०५ आंतरराष्ट्रीय स्पर्धक असतील. यंदाची ही स्पर्धा भारतानं आतापर्यंत आयोजित केलेली सर्वांत मोठी पॅरा-अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आहे.

****

राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, उष्माघाताच्या चार रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...