Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 11 March 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रावर भर देणारा सुमारे
४५ हजार कोटी रुपये तुटीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर
·
बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेची घोषणा तर रोजगारासाठी
नवी मुंबईत नाविन्यता नगर उभारण्यात येणार
·
अर्थसंकल्पात शेती, उद्योग,
पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकासाची पंचसुत्री-मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन
·
निवडणूक घोषणापत्रातली आश्वासनं अर्थसंकल्पात पाळली नसल्याची
विरोधकांची टीका
आणि
·
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तापमान वाढीमुळे काळजी
घेण्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं आवाहन
****
राज्याचा
आगामी आर्थिक वर्षाचा सुमारे ४५ हजार ८९१ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प काल सादर झाला.
विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी तर विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल
यांनी अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलं. आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा पाच लाख ६० हजार
९६४ कोटी रुपये, तर महसुली खर्च, सहा लाख सहा हजार ८५५ कोटी
रुपये अंदाजित असल्याचं, या अर्थसंकल्पात म्हटलं आहे. राजकोषीय
तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही शासन यशस्वी ठरल्याचं,
अर्थमंत्र्यांनी नमूद केलं.
या अर्थसंकल्पात
सार्वजनिक बांधकाम विभागाला सुमारे २१ हजार कोटी, नगर विकास १० हजार
६२९ कोटी, ग्रामविकास ११ हजार ४८० कोटी, कृषी नऊ हजार ७१० कोटी, ऊर्जा २१ हजार ५३४ कोटी,
मृद आणि जलसंधारण चार हजार २४७ कोटी, जलसंपदा आणि
खारभूमी विभागाला सुमारे साडे १६ हजार कोटी, जलजीवन मिशन तीन
हजार ९३९ कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाला सुमारे
साडे २५ हजार कोटी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता तीन हजार ८७५ कोटी,
सार्वजनिक आरोग्य तीन हजार ८२७ कोटी, वैद्यकीय
शिक्षण सुमारे अडीच हजार कोटी, शालेय शिक्षण तीन हजार ४९६ कोटी,
उच्च आणि तंत्रशिक्षण तीन हजार कोटी, तर मराठी
भाषा विभागाला २२५ कोटी रुपये निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
नार-पार-गिरणा
नदीजोड, तापी महापुनर्भरण, दमणगंगा-एकदरे-गोदावरी,
आदी नदीजोड प्रकल्पांचा, अर्थमंत्र्यांनी आपल्या
भाषणात उल्लेख केला..
बाईट – अर्थमंत्री अजित पवार
शेतमालाच्या
वाहतूकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या शेत आणि पाणंद रस्त्यांच्या बांधणीसाठी, “बळीराजा
शेत आणि पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा, अर्थमंत्र्यांनी केली.
२७ जिल्ह्यांमध्ये
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात, दोन हजार
७७९ विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून, ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला. राज्यात वीजेचे दर कमी होणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
हिंदुहृदयसम्राट
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमणे हा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला
होईल, या महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केलं जाणार आहे.
२०४७ पर्यंतचा
राज्याचा दीर्घकालीन आणि सर्वसमावेशक, अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा प्रस्तावित
असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसंच मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून, राज्यात रस्त्यांच्या
८३ हजार कोटी रुपयांहून अधिक कामांचा त्यांनी उल्लेख केला.
“दुर्गम ते सुगम” कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातली ४५ पर्यटन स्थळं रोप-वे द्वारे
जोडण्यात येणार असून, प्राचीन मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर
विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचंही पवार यांनी सांगितलं.
छत्रपती
शिवाजी महाराज मुघलांच्या नजरकैदेत असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात त्यांचं भव्य स्मारक, संगमेश्वर
इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, तसंच हरियाणात पानिपत
इथं मराठ्यांनी गाजवलेल्या शौर्याची महती सांगणारं स्मारक उभारण्याची घोषणाही अर्थमंत्री
पवार यांनी केली.
नवीन पिढीला
रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई इथं अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता
नगर, इनोव्हेशन सिटी, उभारण्यात येणार असल्याची
माहिती त्यांनी दिली.
“एक तालुका - एक बाजार समिती” योजना, “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या
पाच वर्षात साध्य करण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरण, सप्लाय चेन
- ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरुन स्वस्त धान्याची वाहतूक तसंच वितरण प्रणाली अधिक पारदर्शक
करणं, सुमारे पावणे दोन कोटी असंघटीत कामगार आणि शेतमजूरांसाठी
सामाजिक सुरक्षा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी
एकूण ३६ हजार कोटी रुपये तरतूद, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या
अनुदानात २५ लाख रुपये वाढ, आदी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या.
शेतीसाठी
“कृत्रिम बुद्धिमत्ता” तंत्रज्ञानाचा वापर, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान
केंद्रांची उभारणी, सर्व नगरपालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया
करुन त्याचा उद्योग आणि शेतीसाठी वापर, तसंच नवी मुंबईत महामुंबई
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थापना करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. प्रत्येक
विषयानुरुप कवितांच्या ओळींची गुंफण हे या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्यं ठरलं.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी, हा लोकाभिमुख अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासाला
चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे..
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
****
महायुतीने
निवडणूक घोषणापत्रात दिलेली आश्वासनं अर्थसंकल्पात पाळली नसल्याची टीका विरोधकांनी
केली. अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि लाडक्या बहिणींची फसवणूक
करणारा असल्याची टीका, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
राष्ट्रवादी
काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, या अर्थसंकल्पात
सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीयांकडे पूर्णपणे
दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत,
हा अर्थसंकल्प आभासी असल्याची टीका केली...
बाईट – जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे
****
महाराष्ट्र
स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असोसिएशनचे चेतन राऊत यांनी या अर्थसंकल्पातल्या तरतुदींचा
आढावा घेतला.
बाईट – चेतन राऊत
****
छत्रपती
संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात तापमान वाढीमुळे उष्माघातात वाढ झाली आहे, त्यामुळे
नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
अभय धानोरकर यांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे. जिल्ह्यात रुग्णांना तातडीनं औषधोपचार
मिळण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि आरोग्य उपकेंद्र स्तरावर प्रथमोपचार
तसंच उष्माघात नियंत्रणाच्या अनुषंगाने शितकक्षाची स्थापना करण्यात आली असून,
यामध्ये आवश्यक औषधी, साहित्य सामग्री सुसज्ज ठेवण्यात
आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं काल मराठवाडा पाणी परिषद घेण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या नागरवाडी
इथले जलसंधारण तज्ज्ञ हनुमंत केंद्रे यांनी या परिषदेतल्या बीजभाषणात बोलतांना, पाणलोट क्षेत्र
विकासातून मराठवाड्यात जलक्रांती घडू शकते असं मत व्यक्त केलं.
****
परभणी जिल्ह्यात
पालम तालुक्यातल्या दिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यातून आज पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात
आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment