Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 04 March 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.
****
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी
आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा आपण स्वीकारला असून, पुढच्या कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात
आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधीमंडळ परिसरात ते वार्ताहरांशी
बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातले आरोपी
मुंडे यांच्या संपर्कातले असल्याचं सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी देशमुख कुटुंबिय,
मस्साजोग ग्रामस्थ तसंच विरोधकांकडून करण्यात येत होती.
दरम्यान, या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे
आज नागरीकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ नागरीकांनी बीड शहरातून रॅली
काढली. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. या प्रकरणातल्या
आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी धस यांनी विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलताना
केली.
सरकारने राजीनामा घेण्यास दोन महिने
वेळ घेतला, त्यामुळे
हा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा असू शकत नाही, अशी टीका विरोधकांनी
केली आहे.
****
दरम्यान, वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असल्याचं
मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या
आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही आपली पहिल्या दिवसापासूनची
ठाम मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुरावे
असूनही कारवाईला उशीर केल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला, परंतू त्यांना बडतर्फ का केलं
नाही असा प्रश्न त्यांनी विचारला.
****
समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी
यांच्या औरंगजेबाच्या समर्थनातल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी सदस्य आज विधानसभेत आक्रमक
झाले. अबू आझमी यांना अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबित करण्याची मागणी करत या सदस्यांनी
सदनात गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सदनाचं कामकाज दोन वेळा
तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही
अबु आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतरही सत्ताधारी
आणि विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने सदनाचं कामकाज वारंवार तहकूब झालं.
दरम्यान, याप्रकरणी आमदार अबू आझमी यांच्या विरोधात
मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
लातूर जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग
व्यक्तीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आजपासून २५ मार्च पर्यंत विशेष मोहीम राबवली जात
आहे. यासाठी महानगरपालिका, नगरपालिका
आणि ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून प्रत्येक दिव्यांग व्यक्तीच्या
नावाची पडताळणी करून त्यांचे नाव ऑनलाईन पोर्टलवर नोंदवावं, अशा
सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन
केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्या काल बोलत होत्या.
****
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरानं आगामी नव्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलन भरवण्यासाठीचा प्रस्ताव महामंडळाला पाठवला आहे. संस्थेतर्फे त्याबाबतचं पत्र
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला देण्यात आलं आहे. ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचं आयोजन या संस्थेतर्फे करण्यात आलं होतं.
****
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून शिमगोत्सवाला
सुरूवात होत आहे. हा उत्सव गावांमधल्या प्रथेनुसार फाल्गुन शुद्ध पंचमीला सुरू होऊन
गुढीपाडव्यापर्यंत चालतो. गावागावांमध्ये होळ्या आणायला सुरुवात झाली असून, त्यानंतर त्या उभ्या करून त्यांची पूजा
केली जाते. जिल्ह्यात एक हजार ३१५ सार्वजनिक, तर दोन हजार ८५४
ठिकाणी खासगी होळ्या उभारल्या जाणार आहेत. प्रत्यक्ष होळी पेटवून झाल्यावर ग्रामदैवतांना
रूपं लावून त्यांच्या पालख्या नाचवण्यात येतात.
****
महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर
इथं येत्या सात ते नऊ मार्च दरम्यान औरंगपुरा परिसरातल्या जिल्हा परिषद मैदानावर बचत
गटातल्या महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव होणार
आहे. या मेळाव्यात ५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. तसंच दररोज विविध
विषयावर परिसंवाद आणि बचत गटातल्या उद्योजक महिलांचं मनोगत तसंच उद्योजक महिलांचा सन्मान
केला जाणार असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी
दिली. या मेळाव्यास भेट देऊन उपलब्ध वस्तूंची खरेदी करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट
स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुबई इथं
खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. उपांत्य
फेरीचा दुसरा सामना उद्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघांदरम्यान होणार असून, अंतिम सामना येत्या रविवारी नऊ मार्चला
खेळवला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment