Tuesday, 11 March 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ११ मार्च २०२५ दुपारी १.०० वा.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 11 March 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ११ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकार पुढील तीन वर्षांत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग शुश्रुषा केंद्र उघडणार आहे. राज्यसभेत आज एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी ही माहिती दिली. २०२५-२६ मध्ये दोनशे शुश्रुषा केंद्र उघडले जातील, असं त्यांनी सांगितलं. आयुष्मान भारत-पीएम जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीमुळे, कर्करोगाच्या रुग्णांवर तपासणीनंतर ३० दिवसांच्या आत उपचार सुरू होतात. तसंच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सरकार परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी काम करत असल्याचं, नड्डा यांनी नमूद केलं.

दरम्यान, बनावट मतदार ओळखपत्राच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज काही वेळासाठी बाधित झालं होतं. सकाळी कामकाज सुरु होताच यासंदर्भात विरोधकांनी दिलेला स्थगन प्रस्ताव उपसभापती हरीवंश यांनी फेटाळून लावला. त्यामुळे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, आम आदमी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अतुल सावे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.

****

विधानसभेचं कामकाज आज प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू झालं. त्यानंतर राज्याच्या मंत्र्यांनी विविध अहवालांचे प्रस्ताव सभागृहासमोर ठेवले.

दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आज सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला.

****

लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या तीन कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. २०१३ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली. या रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.

****

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार जेष्ठ नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. काल रात्री नाशिकच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि जेष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

जागतिक महिला दिनानिमित्त परभणी इथं महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्त्रियांचे आरोग्य, आहार, जीवनशैली आणि व्यायामया विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. शहरातल्या नानापेठ पोलीस स्थानक इथं होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या कार्यशाळेत महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि महिला होमगार्ड उपस्थित होत्या.

****

समाजमाध्यमांवर खोट्या तसंच आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे. काल दिवसभरात याबाबत तीन गुन्हे दाखल झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

रस्त्यांवरील अपघातांचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी मिशन जीवन रक्षा या नवीन उपक्रमाला सुरूवात केली आहे. यात वाहतुकीचे योग्य नियमन, वाहतुकीविषयी जनजागृती, सीसीटीव्ही कार्यप्रणाली अधिक सक्षम करणं, कमांड कंट्रोल सेंटर प्रभावीपणे कार्यान्वित करणं, या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

****

बीड शहरात नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाला कालपासून सुरूवात झाली. या महोत्सवात महिला बचत गटाने तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ तसंच वस्तूंचे ५२ स्टॉल लावण्यात आले असून, हे प्रदर्शन उद्यापर्यंत चालणार आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं होळी निमित्त काचीगुडा ते हिसार विशेष गाडीची एक फेरी करण्याचं ठरवलं आहे. काचीगुडा ते हिसार विशेष गाडी काचीगुडा इथून १३ तारखेला संध्याकाळी साडे पाच वाजता सुटेल आणि निझामाबाद, नांदेड, हिंगोली, वडोदरा, अजमेर मार्गे हिसार इथं शनिवारी १५ तारखेला दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी १६ तारखेला रविवारी हिसार इथून सुटेल आणि १८ तारखेला मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता काचीगुडा इथं पोहोचेल.

****

राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून, उष्माघाताच्या चार रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.

दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील. इतरत्र हवामान कोरडं राहील. कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...