Wednesday, 26 March 2025

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २६ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 26 March 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून डेटा सेंटर,  स्टार्टअप,  इनोव्हेशन आणि गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत यु.एस. इंडिया बिझनेस कौन्सिल च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष परिषदेत ते काल बोलत होते. स्टार्टअपमधील गुंतवणूक आणि स्टार्टअप कंपन्यांमध्येही महाराष्ट्र अव्वल असल्याचं एका अहवालात नमूद असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन करणार आहे. अशा प्रकारचं हे देशातलं पहीलंच आयोजन असेल. या ॲग्री हॅकॅथॉनच्या नियोजनाबाबत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या निमित्तानं युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, दूध भेसळीसंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना पवार यांनी, भेसळ करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं सांगितलं. या सुधारणांसंबंधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

****

कोल्हापूर जिल्ह्यातल्या ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नगरविकास विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. विधानभवनात झालेल्या बैठकीत त्यांनी या निधीला मंजुरी दिली असून, याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला आहे.  

****

महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी १२ हजार रुपये निवृत्तीवेतन देण्यात येणार आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी काल विधानपरिषदेत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. दहा वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक सहा हजार रुपये, १५  वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक नऊ हजार रुपये आणि २० किंवा अधिक वर्ष नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक १२ हजार रुपये, याप्रमाणे लाभ देण्यात येणार असल्याचं फुंडकर यांनी सांगितलं. 

****

बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी संबंधित तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करून त्यांची तीन महिन्यात चौकशी करू, इतर दोषींवरही कारवाई करू अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. 

गेवराई तालुक्यातल्या ४५ तर माजलगाव तालुक्यातल्या २९ गावांच्या पाणीपुरवठ्याचं काम देण्यात आलेल्या प्रगती कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामाची प्रगती असमाधानकारक असल्यामुळे काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. सदस्य विजयसिंह पंडित यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. 

****

परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने काल परभणी इथं राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये सात हजार ५६७ प्रकरणं निकाली काढण्यात आली असून, १९ कोटी ३९ लाखापेक्षा जास्त रकमेची वसुली करण्यात आली. 

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन योजना, आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने काल परभणी इथं 'कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प' अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणी यांनी यावेळी, कापूस, सोयाबीन आणि मका या पिकांच्या उत्पादन वाढीबाबत मार्गदर्शन केलं. 

****

नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत १४ सुवर्ण पदकांसह एकंदर ३६ पदकं पटकावली आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या दहा सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये एफ तेरा या प्रकारात प्रतीक पाटीलनं कांस्यपदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या एफ 56 प्रकारात मीना पिंगाने हिने थाळीफेक मध्ये तिसरं स्थान मिळवलं. राजश्री कासदेकर हिने भालाफेकमध्ये कास्यपदक प्राप्त केलं. 

****

मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या युकी भांब्री आणि पोर्तुगालच्या नुनो बोर्जेस यांचा सामना आज युनायटेड किंग्डमच्या लॉयड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश यांच्याशी होईल. काल झालेल्या सामन्यात भांब्री आणि बोर्जेस यांच्या जोडीने चेकियाच्या ॲडम पावलासेक आणि युनायटेड किंग्डमच्या जेमी मरे या जोडीचा ७-६, ६-२ असा पराभव केला. 

****

रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी शहर परिसरातही किरकोळ पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला तर पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात मिरज आणि परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात सातारा आणि जावळी तालुक्यातल्या काही गावांतही काल पावसानं हजेरी लावली. 

****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 October-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبر...