Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 04
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
जल जीवन मिशन अंतर्गत १५ कोटींहून अधिक घरांना नळाच्या
पाण्याची जोडणी देण्यात आल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं.
ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. आणखी चार कोटी घरांना स्वच्छ पिण्याचं
पाणी पुरवण्याचं काम सुरू असल्यांचही त्यांनी सांगितलं. जल प्रकल्पांशी संबंधित इतर
योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
****
सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा करत
नसल्याच्या काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या आरोपाचं राज्यसभेतले सभागृह नेते
जे पी नड्डा यांनी खंडन केलं आहे. सरकार सभागृहात सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार
असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, लोकसभेत आज आरोग्य सुरक्षेच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षा
उपकर विधेयक २०२५ वर चर्चा होणार आहे. या विधेयकातील तरतुदी, त्यांचा वित्तीय परिणाम आणि मिळणाऱ्या महसूलाचा विनियोग
याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सभागृहाला माहिती देतील.
****
नौदल दिवस आज साजरा होत आहे. १९७१ च्या भारत–पाकिस्तान
युद्धात भारतीय नौदलाने केलेला कराची हल्ला – ऑपरेशन ट्रायडंट च्या स्मरणार्थ हा दिवस
पाळला जातो. समुद्राच्या पलीकडील क्षितिजावर राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या आपल्या नौदल
वीरांच्या अतुलनीय शौर्य, शिस्त आणि समर्पणाला सलाम करण्याचा हा दिवस. समुद्री सीमा सुरक्षित
ठेवण्यापासून ते आव्हानात्मक समुद्रात जीवित बचाव मोहिमा राबवण्यापर्यंत, भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं
प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या सर्व अधिकारी, जवान, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी
नौदलाच्या “साहस, समर्पण, आत्मनिर्भरता आणि आधुनिकीकरणाच्या प्रवासाची” प्रशंसा
केली.
****
आंतरराष्ट्रीय चित्ता दिनही आज पाळला जातो. चित्त्यांना
नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संरक्षण करण्याबद्दल
जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणस्नेही नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
****
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी
आज नवी दिल्ली इथं बालविवाहमुक्त भारतासाठी १०० दिवसाच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
केला. याप्रसंगी अन्नपूर्णा देवी यांनी उपस्थितांना बालविवाह मुक्त भारताची शपथ दिली.
****
डिजिटल ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे डिजिटल ७/१२ ला अधिकृत मान्यता मिळेल, फक्त १५ रुपयात अधिकृत उतारा उपलब्ध होईल, तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज राहणार नाही. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि १६ अंकी पडताळणी क्रमांक असलेले ७/१२, ८-अ आणि फेरफार उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असतील. हा निर्णय
शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी
सुविधा, पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा
नवा अध्याय असेल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी सांगितलं.
****
दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा
कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा, यासाठीच्या पद सुनिश्चिती प्रक्रियेसाठी राज्य शासनानं एकसमान
कार्यपद्धती तयार केली आहे. ही प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक करण्याच्या हेतूनं
तज्ज्ञ समितीची पुनर्रचनादेखील करण्यात आली आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागाच्या या
समितीत अंध-अल्पदृष्टी, श्रवणदोष, अस्थिव्यंगता, स्वमग्नता, विशिष्ट शिक्षण अक्षमता आणि मानसिक आजार अशा विविध प्रवर्गांतील
किमान एका तज्ज्ञाचा समावेश असेल. या निर्णयामुळे राज्यातल्या लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी
रोजगार आणि सर्व स्तरांवर समान संधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचं दिव्यांग कल्याण
विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
****
दत्त जयंती आज सर्वत्र मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात
साजरी होत आहे. औदुंबर, गाणगापूर, माहूर, नृसिंहवाडी, कुरवपूर, कर्दळीवन यांसारख्या दत्ताच्या प्रमुख स्थानांसह राज्यभरातल्या
दत्त मंदिरांत पहाटेपासून भाविकांची गर्दी दिसून येत आहे. शिर्डीत श्री साईबाबा मंदिर, दत्त मंदिर आणि परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे.
****
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेकामाला गती मिळत असून, आता बीड ते वडवणी रेल्वेमार्गावर इंजिनची चाचणी परवा सहा
तारखेला होणार आहे. यावेळी नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन खासदार बजरंग सोनवणे यांनी
केलं आहे.
****
No comments:
Post a Comment