Friday, 3 November 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.11.2017 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

०३ नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता

*****

जगभरातल्या खाद्य पदार्थ उद्योगातले गुंतवणुकदार आणि उद्योजकांचा सर्वात मोठा मेळावा - वर्ल्ड फुड इंडिया नवी दिल्ली इथं आजपासून सुरू झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होत आहे. खाद्य पदार्थ उद्योगाचं स्थित्यंतर घडवणं आणि भारताला गुंतवणुकीसाठी पसंतीचा देश बनवून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायची मोहीम यशस्वी करणं हा या मेळाव्याचा उद्देश आहे. या मेळाव्यात ३० देशांमधल्या २०० कंपन्या आणि दोन हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

*****

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना तीन कोटी ७० लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळालेल्या ग्रीन लिस्ट मध्ये पहिल्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांची नावं प्राप्त झाली आहेत. तालुका स्तरावरील समित्यांकडून पडताळणी झाल्यानंतर या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीची रक्कम जमा होईल असं बँकेच्या सूत्रांनी सांगितलं.

*****

बारामती इथं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं उभारण्यात येणारा देशातला पहिला भाजीपाला गुणवत्ता प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरणार असल्याचा विश्वास कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केला. बारामती मधल्या कृषी विज्ञान केंद्रात उभारण्यात आलेल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राचं उद्घाटन फुंडकर आणि नेदरलँडचे कृषीमंत्री ॲल्ड्रीक खिअरवेल्ड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या शेती मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असून, शेतकऱ्यांना निर्यातक्षम मालाचं उत्पादन घेण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

*****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात परवा पाच तारखेपासून पंधराव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या नऊ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात राज्यभरातल्या २० विद्यापीठांमधले जवळपास एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या युवक महोत्सवात संगीत, नृत्य, साहित्य, रंगमंचीय, ललित कला अशा विविध २४ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थी कलावंत आपली कला सादर करणार आहेत.

******


AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.11.2017_11.00

Regional Urdu Audio Bulletin, Aurangabad, Date: 03.11.2017 ,Time:8.40-8...


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad, Date: 03.11.2017 ,Time:8.40-8.45 am

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 03.11.2017 6.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 November 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्‍लंघन करणाऱ्या राज्यातल्या पाच नामांकित बीटी कॉटन उत्पादक कंपन्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडं मागणी

·      वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या उत्सवी मंडपांविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन महापालिका आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

·      राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल हमी भावानुसार देणार -सहकार मंत्री सुभाष देशमुख

आणि

·      राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम.शेख यांच्यावरच्या अविश्वास ठरावावर येत्या ९ नोव्हेंबर रोजी मतदान

*****

राज्यातल्या पाच नामांकित कंपन्यांच्या बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातल्या तरतुदीनुसार घातक असणारे ‘हर्बिसाईड टॉलरन्ट जीन्स’ आढळून आलं असून या बियाण्यांचं उत्पादन अन्य राज्यांतही होत असल्यानं या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग- सीबीआयमार्फत करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं सखोल अभ्यास करून यासंदर्भातला अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. या अहवालानुसार हे जीन्स पर्यावरण संरक्षण कायदा-१९८६ मधल्या तरतुदींच्या विरुद्ध आहेत. त्यानुसार या पाचही कंपन्यांविरूद्ध नागपूर इथं प्रथम माहिती अहवाल  नोंदवण्यात आला आहे.

*****

उत्सव काळात आदेश धाब्यावर बसवून वाहतूक तथा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या उत्सवी मंडपांना परवानगी देणाऱ्या तसंच अशा मंडपांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पालिका आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच त्यांच्यावर अवमानप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये याचा खुलासा करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. याबाबत डॉ. महेश बेडेकर यांनी जनहित याचिका दाखल करत ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. यासाठी अजब सबबी पुढे करणाऱ्या मुंबईसह नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

*****

राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल हमी भावानुसार दिली जाईल, असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी  सांगितलं आहे. ऊस दराबाबत आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत काल ते बोलत होते.

राज्यात सहकार क्षेत्र अधिक सक्षम करणं गरजेचं असून, शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यामध्ये समन्वय ठेऊन सर्वांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील; दुसऱ्या उचलपासून परिस्थिती पाहून कारखानदारांकडून भाव दिला जाईल आणि त्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं सहकारमंत्री म्हणाले.  या बैठकीत विविध शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि कारखान्यांच्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

*****

काश्मीर प्रश्नावर केंद्र सरकारची  सर्व  संबंधितांशी चर्चा आणि  तिथली  लष्करी कारवाई या दोन्ही बाबी एकाच वेळी चालू राहतील आणि त्यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केला आहे. पुण्याच्या सेनादल वैद्यकीय महाविद्यालयातल्या एक समारंभात भाग घेतल्यानंतर काल ते बातमीदारांशी बोलत होते. चीनकडून रासायनिक किंवा जैविक शस्त्रांचा हल्ला होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. गेल्या अनेक वर्षापासून सीमेवरच्या सैनिकांना राख्या आणि दिवाळीची शुभेच्छा पत्रं पाठवणाऱ्या पुण्यातल्या शाळांचा रावत यांनी सत्कार केला. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांची माहिती एका पुस्तकात संकलित करण्यात आली असून पुढच्या शैक्षणिक वर्षात ती केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

*****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****

कर चुकवेगिरी आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जालना औद्योगिक वसाहतीतल्या तीन स्टील कारखान्यांसह अन्य दोन प्रतिष्ठानांवर प्राप्तिकर विभागानं टाकलेल्या छाप्यांमध्ये कागदपत्रांच्या तपासणीची कारवाई काल तिसऱ्या दिवशीही सुरुच होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नाशिक, पुणे आणि औरंगाबाद इथल्या ३०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक तीन दिवसांपासून जालन्यात तळ ठोकून आहे. प्राप्तिकर विभागाच्या नियम १३२ अन्वये करण्यात आलेल्या या कारवाईत अत्यंत बारकाईनं सर्व व्यवहारांची तपासणी केली जात आहे. आज सायंकाळपर्यंत ही कारवाई पूर्ण होईल, असं औरंगाबाद इथल्या प्राप्तीकर विभागाचे उपसंचालक अभिजीत चौधरी यांनी सांगितलं

*****

राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष एम.एम.शेख यांच्यावरच्या अविश्वास ठरावावर येत्या ९ नोव्हेंबर रोजी औरंगाबादमध्ये एका बैठकीत मतदान होणार आहे. बोर्डाच्या दहा पैकी पाच सदस्यांनी शेख यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. शेख हे काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाली होती.

*****

शेतमालाची हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि मिलधारकांविरुद्ध तात्काळ फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी नांदेडच्या सहकार उपनिबंधकांकडे केली आहे. जिल्ह्यातले व्यापारी सोयाबीन आणि इतर शेतमालाची हमी भावापेक्षा कमी दरानं खरेदी करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुट होत असल्याचं देवसरकर यांचं म्हणणं आहे.

*****

भारतीय जनता पक्षानं सत्तेवर आल्यानंतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या शेकडो योजना बंद केल्या असून अनेक योजनांच्या निधीत सुमारे ४० टक्क्यांची कपात केली असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर राजू वाघमारे यांनी केला आहे. औरंगाबाद इथं आयोजित सामाजिक परिवर्तन मेळाव्यात काल ते बोलत होते. भाजप पुन्हा सत्तेत आली तर सध्या सुरु असलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या सर्वच योजना बंद करेल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.

*****

औरंगाबाद इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल मागासवर्गीय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती देण्याच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढत भीक मांगो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं.

*****

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अत्यल्प दर आकारणारं भोजनगृह उभारलं जाणार आहे. या भोजन कक्ष उभारणीच्या कामाचा शुभारंभ समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते काल करण्यात आला. लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातली मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. माल खरेदी आणि विक्रीसाठी लातूरसह नांदेड, बीड, सोलापूर आणि बीदर इथून येणाऱ्या  शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात आहार मिळावा यासाठी बाजार समितीनं हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

******

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...