Monday, 2 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ डिसेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासह राज्यात सुरू सर्व विकास कामांच्या प्रकल्पांचं पुनरावलोकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शेतकरी आणि आदिवासींनी त्यांच्या जमीनी बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये जात असल्यामुळे याला तीव्र विरोध केला आहे.  सरकार सर्वसामान्यांचं आहे. आरे कार शेड प्रकल्पासारखं आपण बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही, अशी माहितीही ठाकरे यांनी काल रात्री उशिरा पत्रकारांशी बोलताना दिली. राज्य सरकार राज्याच्या आर्थिक स्थितीवर एक श्र्वेत पत्रिका काढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. सुमारे पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज असलेलं राज्य सरकार शेतकऱ्यांना विनाअट कर्ज माफी देण्यावर ठाम असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यांचा पक्ष सहभागी असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील गेल्या सरकारचा प्राधान्यक्रम चुकला नसल्याचं नमुद करताना राज्यात सुडाचं राजकारण केलं जाणार नसल्याचं ते म्हणाले.  दरम्यान, आपला पक्ष राज्यातील जनतेवर बुलेट ट्रेनचा बोजा टाकण्याविरुद्ध असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राज्याची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे, असं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी सरकारनं देशाच्या हिरक महोत्सवी स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट २०२२पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलं आहे.
****
 भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुंडे यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील प्रतिमेतून पक्षाचं नाव हटवल्यानं खळबळ उडाल्याच्या पार्श्र्वभूमीवर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्या भाजप सोडतील या आशयाच्या वृत्तांचंही पाटील यांनी खंडण केलं आहे. भाजपचे नेते मुंडे यांच्या संपर्कात आहेत. त्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आत्मपरिक्षण करत आहेत परंतु त्या भाजप सोडत आहेत, असा याचा अर्थ होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.  अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आपल्या पक्षाच्या संपर्कात असल्याच्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी इन्कार केला. राज्यात अपघातानं सत्तेवर आलेलं सरकार अशा निराधार बातम्या पसरवत आहे. त्यांचे ठाकरे कुटुंबीयांसमवेत चांगले संबंध असण्याची शक्यता आहे परंतु याचा अर्थ त्या शिवसेनेत जात आहेत, असा होत नाही, असंही त्यांनी म्हटलं.
****

 माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या आरोपांचं खंडण केलं आहे. फडणवीस यांना गेल्या महिन्यात केवळ केंद्र सरकारचा चाळीस हजार कोटी रुपयांचा निधी वाचवण्यासाठी बहुमत नसताना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं, असं खासदार हेगडे यांनी म्हटलं होतं.  केंद्र सरकारनं  कोणत्याही निधीची मागणी केली नाही आणि राज्य सरकारनं कोणताही निधी पाठवला नाही, असं फडणवीस यांनी या संदर्भात म्हटलं आहे.
****

 अहमदनगर जिल्ह्यातील २०१३ मधील सोनई हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं चार आरोपींची फाशीची कायम ठेवली असून एका आरोपीला निर्दोष मुक्त केलं आहे.
****

 हैद्राबाद इथं झालेल्या डॉ. प्रियंका रेड्डी अत्याचार प्रकरणी आज हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार इथं बाजार पेठ बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं महिला संघटनांनी आंदोलन केलं. धुळे शहरात विश्व हिंदू परिषद आणि हिंदूत्वादी संघटनांनी निदर्शनं करून डॉ. प्रियंका रेड्डी अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपींना फाशीची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. 
****

 हिंगोली शहरात शहर वाहतुक पोलिसांनी आज हेल्मेट सक्तीसाठी मोहीम राबवली. यावेळी हेल्मेट न वापरणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. हेल्मेटधारी वाहनचालकांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं.
****

 धुळे तालुक्यातील नकाणेवार गावालगत पांझरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू चोरांवर कारवाई करणाऱ्या धुळे ग्रामीणचे तहसीलदार किशोर कदम यांच्या पथकावर काल हल्ला करण्यात आला. यात तहसिलदार कदम आणि अन्य एक जण जखमी झाला आहे. धुळे जिल्हा तलाठी संघानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याविरुद्ध निदर्शनं केली.
****

 नांदेडइथून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांत तात्पुरत्या स्वरूपात डब्बे वाढविण्यात आले आहेत. श्री गंगानगर-नांदेड – श्री गंगानगर द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डब्बा आणि श्री गंगानगर-नांदेड – श्री गंगानगर  साप्ताहिक एक्स्प्रेस मध्ये एक तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डब्बा वाढवण्यात आल्याचं रेल्वे जनसंपर्क विभागानं कळवलं आहे.
*****
***

आकाशवाणी औरंगाबाद – दि.02.12.2019 सायंकाळी 06.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद - अमरावती जिल्हा वार्तापत्र दिनांक – ०२.१२.२०१९

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०२ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
गेल्या सरकारनं स्वतःच्या जाहिरातबाजीवर मोठा खर्च केल्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. संपूर्ण देशात येवढा खर्च कोणत्याच राज्यात झाला नसून आता नव्या सरकारचे प्रमुख या संदर्भात  बोलतील, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. राज्यातील एकूण निधीवर इथल्या जनतेचाच अधिकार असल्याचं त्यांनी सांगितंल. राज्यातील विविध नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचंही ते यावेळी म्हणाले. नव्या मंत्रिमंडळातील खाते वाटपासंदर्भात सर्व निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेणार असल्याची माहितीही राऊत यांनी यावेळी दिली. 
****
पीपल्स गुर्रिल्ला आर्मीच्या आजपासून सुरु झालेल्या स्थापना सप्ताहाला हिंसक वळण देत नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात पुरसलगोंदी इथले पोलिस पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. सशस्त्र नक्षलवाद्यांनी काल रात्री पोलिस पाटील मासू पुंगाटी आणि कार्यकर्ते ऋषी मेश्राम या दोघांना पुरसलगोंदी गावातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केली. आज सकाळी पुरसलगोंदी-आलेंगा रस्त्यावर त्यांचे मृतदेह आढळले. पुरसलगोंदीनजीकच्या सुरजागड पहाडावर एका कंपनीनं लोहखनिज उत्खननाचं काम सुरु आहे. मध्यंतरी हे काम बंद होते. परंतु आता पुन्हा काम सुरु झालं आहे. नक्षलवाद्यांचा त्याला विरोध असतानाही कंपनीनं उत्खननाचं काम सुरु केले असून, पोलिस पाटील पुंगाटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मेश्राम यांनी या उत्खननाला समर्थन दर्शवलं होतं, त्यामुळे त्यांची हत्या झाल्याची चर्चा असल्याचं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
****
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पचीही नक्षलवाद्यांनी नासधूस केली आहे. या ठिकाणी वनविभागानं अनेक हत्ती पाळले असून, पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात. नक्षलवाद्यांनी तिथं नासधूस केल्यानं पर्यटक भयभीत झाले असून आलापल्ली-भामरागड मार्गावर झाडे आडवी टाकून रस्ताही अडवण्यात आला होता.
****
पोलिसांनी या भागात अतीव दक्षतेचे आदेश जाहीर केले असून सर्वत्र मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
आजपासून इंद्रधनुष या लसीकरण मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात  होणार आहे. केंद्र सरकार मार्फत राबवल्या जाणाऱ्या या मोहीमेअंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलियो, क्षयरोग, कांजण्या, मेंदुज्वर आणि काविळ या आजांरांना प्रतिबंध घालण्यासाठी गर्भवती महिला आणि २ वर्षांखालच्या बालकांचं लसीकरण केलं जाणार आहे. याशिवाय काही ठराविक क्षेत्रांमध्ये जपानी मेंदुज्वर आणि फ्ल्यू या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केलं जाणार आहे.येत्या मार्च पर्यंत देशभरातल्या सत्तावीस राज्यांमधल्या २७२ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये या मोहीमेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं होतं. दरम्यान, अमरावती शहरामधील सर्व पालकांनी दोन वर्षाखालील बालकांचे संपूर्ण लसीकरण करून घ्यावं तसंच गरोदर मातांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय निपाने यांनी केलं आहे.
****
रत्नागिरी जिल्हयातल्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक येत्या एकोणतीस डिसेंबरला  होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. इथल्या पालिकेत शिवसेनेचं वर्चस्व असून गेल्या वेळेच्या थेट निवडणुकीत शिवसेनेचे राहूल पंडित निवडून आले होते. त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होणार आहे. पंधरा प्रभागांमधल्या  एकोणपन्नास केंद्रांवर शहरातले अठ्ठावण्ण हजार सातशे सत्तर मतदार मतदान करू शकणार आहेत. निवडणुकीची मतमोजणी  तीस डिसेंबर रोजी होईल.
****
अमरावती जिल्हात बावीस हजार हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पेरणीला सुरवात झाली आहे. परतीच्या पावसामुळे जमिनीत आद्रता वाढल्यामुळे यंदा रब्बीच्या हंगामात क्षेत्र वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे त्यामुळे यंदा गव्हाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालंदर इथं झालेल्या राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रित सिंग आणि सुमित कुमार यांनी सुवर्ण पदक पटाकवलं. गुरप्रितनं ७७ किलो वजनी गटात संजन भानवल याचा ३- १ असा पराभव केला.गुरप्रितचं हे चौथं राष्ट्रीय विजेतेपद आहे. ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारनं पंजाबच्या प्रभालवर ५-१ असा विजय मिळवला. या स्पर्धेत रेल्वे संघानं २१० गुणांसह पहिलं, सेनादलानं १७० गुणांसह दुसरं, तर झारखंडनं १०९ गुणासह तिसरं स्थान पटकावलं.
****


आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 02.12.2019 दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.12.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०२ डिसेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याच्या आर्थिक स्थितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांकडून मागितला आहे, विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना याबाबत त्यांनी माहिती दिली. राज्याची आर्थिक स्थिती जाणून घेतल्यावरच पुढचे निर्णय घेणं सोपे जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
त्याचबरोबर आरे मेट्रो कारशेड विरोधी आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेशही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तेवर येताच
ठाकरे यांनी आरेतल्या मेट्रो कारशेडच्या बांधकामास स्थगिती दिली होती. त्यानंतर आता आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. विकास आणि पर्यावरण हे दोन्हीही सोबत असले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. येत्या एक-दोन दिवसात खाते वाटप जाहीर केलं जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, मेट्रो रेल्वेसाठीचं कारशेड गोरेगावच्या राज्य राखीव पोलिस दलाच्या कवायत मैदानावर उभारण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. पक्षाचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की, १०२ हेक्टर्सची ही जागा असून सध्या या मैदानावर केवळ लग्न सोहळे होत आहेत. कारशेडसाठी केवळ ५२ हेक्टर्स जागेची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारला ४० हजार कोटी रुपये परत केले आहे. केंद्र सरकारनं दिलेला हा निधी वाचवण्यासाठीच फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती असा आरोप भाजपचे खासदार अनंत हेगडें यांनी केला आहे. नव्या सरकारला हा निधी मिळु नये म्हणुन हा बनाव केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी हा आरोप फेटाळुन लावला आहे.आपण शेतकऱ्यांना ८० तासांत ५ हजार कोटींची मदत केली  असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकी मदतीशिवाय दुसरी कोणताही निर्णय घेतला नाही असं त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात सांगितलं.
****
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं या वर्षीच्या परिक्षांच्या ३८ विषयांचे निकाल आज जाहीर केले आहे. 
****



आकाशवाणी औरंगाबाद दिनांक – 02.12.2019 सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...