आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Saturday, 28 April 2018
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.04.2018 17.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारत आणि चीन संयुक्तरित्या
अफगाणिस्तान मध्ये आर्थिक प्रकल्प राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या
मध्ये या बाबत सहमती झाली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दोन्ही
नेत्यांमध्ये चीनच्या वुहान शहरात झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात
आला.
****
भारतीय
सैन्य दलाने पाकिस्तान सैन्य दलाला जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी गटांना समर्थन
करणं थांबवण्यास सांगितलं
आहे. सैन्य दलाच्या लष्करी कारवाई विभागाचे
महासंचालक लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानच्या त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यास या
भागातला तणाव कमी करण्याची जबाबदारी ही पाकिस्तानवर असल्याचं सांगितलं.
****
कृषी
क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी आज उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेती पर्यंत
पोहचवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं
आज वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत ‘वसंतराव
नाईक स्मृती सभागृहा’चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शासन शेतकऱ्यांसाठी
विविध योजना राबवत असून, या योजना आणि नव तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यां पर्यंत
पोहचवणं आणि त्याचा शेतात वापर केल्यास निश्चितच
उत्पादकता वाढून कृषी क्षेत्रातल्या
उत्पदनात भर
होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
प्रकल्पग्रस्तांचं
पुनर्वसन अधिक चांगल्या रितीनं होण्यासाठी राज्य सरकारनं ‘महाराष्ट्र
राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची’ स्थापना केली
आहे. या प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य
प्रवक्ते माधव भांडारी यांची नियुक्ती केली असून, त्यांना
कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यांनी भांडारी यांचं अभिनंदन केलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या पाच बाजार समित्यांना उप जिल्हानिबंधकांनी
बरखास्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव
या बाजार समित्यांचा यात समावेश आहे. या बाजार समिती आवारात काही महिन्यात
झालेल्या कांदा लिलावात २० व्यापाऱ्यांनी कांदा घेतला पण शेतकऱ्यांना रक्कम देण्यात
आली नसल्याची तक्रार आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक मध्ये पणन मंत्र्यांनी घेतलेल्या
बैठकीत या बाजार समित्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार
उप जिल्हानिबंधकांनी या नोटीसा बजावल्या असून ११ मे पर्यंत त्यांना बाजू
मांडण्याचे आदेश दिले आहेत.
****
उन्हाळी
सुट्यांमध्ये प्रवाश्यांची वाढती संख्या लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं
नांदेड पनवेल नांदेड या विशेष रेल्वेच्या आगामी तीन महिन्यांत २६ फेऱ्या वाढवल्या आहेत. यामध्ये नांदेडहून
प्रत्येक शनिवारी सुटणाऱ्या रेल्वेच्या १३ फेऱ्या आणि पनवेलहून प्रत्येक रविवारी सुटणाऱ्या रेल्वेच्या १३ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहिती दक्षिण
मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देश वासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३ वा भाग आहे. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीत निवासी डॉक्टरांनी गेल्या तीन
दिवसापासून पुकारलेला संप आज मागे घेतला. रूग्णांच्या नातेवाईकांनी माराहाण केल्याच्या
कारणावरून हा संप पुकारण्यात आला होता. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक आणि
अन्य मागण्यांसदर्भात घाटी प्रशासनानं संबंधित समित्यांनां ठोस पावलं उचलण्याचे आदेश
दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या आदर्श ग्राम पाटोदा इथं येत्या दोन मे रोजी दुसऱ्या भूमिजन साहित्य संमेलनाचं
आयोजन करण्यात आलं आहे. भाषा, साहित्य,
संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित या संमेलनलाचे अध्यक्ष
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे हे असतील. या संमेलनात विविध परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात तापमानात वाढ
कायम असून, आज सर्वात जास्त ४५ पूर्णांक
सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी ४३
पूर्णांक दोन, तर उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं सरासरी ४० अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
मुंबईतल्या
भांडूप परिसरात आज सकाळी सार्वजनिक स्वच्छतागृह ढासळल्याची घटना घडली. ढिगाऱ्याखालून एक पुरूष आणि एका महिलेला
बाहेर काढलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात नेल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेचं वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान आणि मलनि:स्सारण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी
दाखल झाले.
*****
***
Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 28.04.2018 6.50
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन्ही देशांदरम्यान
संवाद, दळणवळण वाढवण्याबरोबरच विश्वासाचं वातावरण निर्मितीसाठी आपापल्या सैन्याला सामरिक
मार्गदर्शिका जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. वुहान शहरात झालेल्या अनौपचारिक शिखर
परिषदेनंतर परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारत
आणि चीनच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण टिकवणं दोन्ही देशांसाठी
हितावह असल्याबाबत यावेळी एकमत झालं.
****
संरक्षण संपादन परिषद - डॅकनं तीन हजार ६८७ कोटी रुपयांच्या
भांडवल संपादन प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्या
अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या डॅकच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्थानिकीकरणाला
अधिक वाव देणं आणि देशाच्या तंत्रज्ञान कौशल्याची नोंद घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात
आला. या संपादनामध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसीत केलेल्या ५२४ कोटी
रुपयांच्या नॅग क्षेपणास्र यंत्रणेचा समावेश आहे.
****
प्लास्टीकमुळे होणाऱ्या
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं देशभरातल्या संरक्षित
क्षेत्रांमध्ये प्लास्टीक बंदी केली असून, या
भागांना प्लास्टीकमुक्त क्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. सर्व
राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी याविषयी जनजागृती करावी, असे
आदेशही मंत्रालयानं दिले आहेत. पाच जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, या
क्षेत्रांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीकला बंदी करुन ते प्लास्टीकमुक्त
क्षेत्र घोषित केलं असल्याचं, केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटरच्या
संदेशात सांगितलं.
****
स्वच्छ भारत ग्रामीण अभियानाअंतर्गत प्रत्येक पात्र
लाभार्थ्याला चांगल्या दर्जाचं वैयक्तीक शौचालय बांधण्यासाठी १२ हजार
रुपये इतकी प्रोत्साहन पर रक्कम दिली जाते असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. या
प्रोत्साहनपर रकमेत केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के
तर राज्य सरकारचा ४० टक्के इतका असतो. प्रसार
माध्यमं याविषयी चुकीची आकडेवारी देत असल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारनं हे
स्पष्टीकरण दिलं.
****
केंद्र सरकार दिव्यांगांना आर्थिक आणि सामाजिक
स्तरावर सक्षम बनवण्याचा प्रयत्न करत असून, त्यासाठी
अधिकाधिक दिव्यांगांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय सामाजिक आणि
न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल दिव्यांगांसाठीच्या
राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. या योजनेअंतर्गत
दारिद्र्य देषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं
उपयुक्त अशी उपकरणं दिली जातात.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातल्या
ऐतिहासिक अवशेषांची ओळख होण्यासाठी औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे उद्या हेरिटेज वॉकचं
आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता विद्यापीठ परिसरातल्या ऍथलेटिक्स मैदानापासून
या वॉकला सुरूवात होईल. इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी हे तत्कालीन मराठा
आणि मुघल राजकारणाबद्दल माहिती देतील. विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींनी याचा
लाभ घ्यावा, असं आवाहन औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे करण्यात आलं आहे.
****
जालना शहरात उभारण्यात आलेल्या रसायनशास्त्र शिक्षण संस्थेचा
शुभारंभ येत्या चार मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जालना
शहरात सिरसवाडी परिसरात २०० एकर जमिनीवर ही संस्था उभारण्यात येत असून, यासाठी सरकारनं
३९३ कोटी रुपयांची तरतुद केली असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या शैक्षणिक वर्षात या
संस्थेत रसायन तंत्रज्ञान अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यास सुरुवात होणार
असल्याचं लोणीकर यांनी सांगितलं.
****
अहमदनगर इथल्या मकेनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटर च्या
वतीनं आज अखोरा ड्रिल मैदानावर नव्यानं सैन्यात सामील होणाऱ्या आणि प्रशिक्षण पूर्ण
करणाऱ्या ३९२ प्रशिक्षणार्थींच्या पासिंग आऊट परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी
या प्रशिक्षणार्थींना देशसेवा आणि कर्तव्य निष्ठतेची शपथ देण्यात आली.
****
चीन मधल्या वुहान इथं सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत
सायना नेहवाल आणि एच एस प्रणय आपापले उपान्त्य फेरीतले सामने आज खेळणार आहेत. सायनाचा
सामना चीनी तैपेईच्या ताई जू यींग हिच्याशी, तर प्रणयचा सामना चीनच्या चेन लॉग सोबत
होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीच्या सामन्यात सायनानं दक्षिण कोरियाच्या
ली जँग मी हिचा २१ - १५, २१ - १३ असा पराभव केला, तर प्रणयनं कोरियाच्या सॉन वॅन याचा
१८ - २१, २३ - २१, २१ - १२ असा पराभव केला. किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांचं
या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
//*********//
Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.04.2018 - 11.00
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग
यांच्यात वुहान इथं सुरू असलेल्या दोन दिवसांच्या अनौपचारिक शिखर परिषदेत आज पुन्हा
एकदा चर्चेला सुरुवात झाली. वुहान इथं आयोजित अनेक बैठकांमध्ये द्वीपक्षिय, जागतिक आणि क्षेत्रीय अशा अनेक मुद्द्यांवर
यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. दोन्ही नेत्यांनी अनौपचारिक शिखर परिषदेच्या पहिल्या
दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भारत आणि चीनचे संबंध अधिक दृढ करण्यावर आणि जागतिक
मुद्द्यांवर चर्चा केल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.
****
पुढच्या वर्षात राज्यात २५
हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचं उद्दीष्ट असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी सांगितलं आहे. पुणे इथं काल ऊर्जा संवर्धनामध्ये उत्कृष्ट कार्य करणार्या
राज्यातल्या विविध संस्थांना महाऊर्जाच्या वतीनं गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
२०२५ पर्यंत राज्यातल्या ४५ हजार शेतकऱ्यांनी सौरऊर्जेचा वापर करावा, यासाठी राज्य
शासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
ढोकी इथं एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. आज सकाळी हा अपघात
झाला. जखमींना लातूर आणि उस्मानाबाद इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी
परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कसगी
इथले गिरीश बदोले यांनी राज्यातून पहिला तर देशभरातून विसावा क्रमांक मिळवला आहे. नांदेडचे
दिग्विजय बोडके यांनी राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. याशिवाय बीडचे प्रणय नहार,
परळीचे रोहित गुट्टे, जालन्याच्या डॉ.मोनिका घुगे आणि डॉ.श्रीकांत तापडिया, औरंगाबादचे
नूह सिद्दीकी, शेख सलमान, आणि स्नेहल भापकर यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं
आहे.
****
औरंगाबाद शहराच्या कचरा समस्येचा
पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी काल आढावा घेतला. येत्या ३० एप्रिलपर्यंत रस्त्यावर
साचलेल्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, तसंच ओल्या कचऱ्यावर तत्परतेनं कंपोस्टींग
प्रक्रिया करुन, शहर लवकरात लवकर स्वच्छ, सुंदर करावं, असे निर्देश त्यांनी यावेळी
दिले.
****
Subscribe to:
Posts (Atom)
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी ...
-
आकाशवाणी औरंगाबाद. संक्षिप्त बातमीपत्र ३० जून २०१७ सकाळी १०.०० वाजता **** देशातली सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखली जाणारी...
-
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad. Date: 18 February 2019 Time: 8:40 to 8:45 am آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۱۸ ؍فر...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 April 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छ...