Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारत आणि चीन संयुक्तरित्या
अफगाणिस्तान मध्ये आर्थिक प्रकल्प राबवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या
मध्ये या बाबत सहमती झाली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दोन्ही
नेत्यांमध्ये चीनच्या वुहान शहरात झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात
आला.
****
भारतीय
सैन्य दलाने पाकिस्तान सैन्य दलाला जम्मू आणि काश्मीर मध्ये दहशतवादी गटांना समर्थन
करणं थांबवण्यास सांगितलं
आहे. सैन्य दलाच्या लष्करी कारवाई विभागाचे
महासंचालक लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानच्या त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यास या
भागातला तणाव कमी करण्याची जबाबदारी ही पाकिस्तानवर असल्याचं सांगितलं.
****
कृषी
क्षेत्रात उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी आज उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान शेती पर्यंत
पोहचवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं
आज वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत ‘वसंतराव
नाईक स्मृती सभागृहा’चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. शासन शेतकऱ्यांसाठी
विविध योजना राबवत असून, या योजना आणि नव तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यां पर्यंत
पोहचवणं आणि त्याचा शेतात वापर केल्यास निश्चितच
उत्पादकता वाढून कृषी क्षेत्रातल्या
उत्पदनात भर
होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
प्रकल्पग्रस्तांचं
पुनर्वसन अधिक चांगल्या रितीनं होण्यासाठी राज्य सरकारनं ‘महाराष्ट्र
राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना संनियंत्रण समितीची’ स्थापना केली
आहे. या प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य
प्रवक्ते माधव भांडारी यांची नियुक्ती केली असून, त्यांना
कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यांनी भांडारी यांचं अभिनंदन केलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या पाच बाजार समित्यांना उप जिल्हानिबंधकांनी
बरखास्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. मनमाड, देवळा, उमराणे, येवला, मालेगाव
या बाजार समित्यांचा यात समावेश आहे. या बाजार समिती आवारात काही महिन्यात
झालेल्या कांदा लिलावात २० व्यापाऱ्यांनी कांदा घेतला पण शेतकऱ्यांना रक्कम देण्यात
आली नसल्याची तक्रार आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक मध्ये पणन मंत्र्यांनी घेतलेल्या
बैठकीत या बाजार समित्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार
उप जिल्हानिबंधकांनी या नोटीसा बजावल्या असून ११ मे पर्यंत त्यांना बाजू
मांडण्याचे आदेश दिले आहेत.
****
उन्हाळी
सुट्यांमध्ये प्रवाश्यांची वाढती संख्या लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेनं
नांदेड पनवेल नांदेड या विशेष रेल्वेच्या आगामी तीन महिन्यांत २६ फेऱ्या वाढवल्या आहेत. यामध्ये नांदेडहून
प्रत्येक शनिवारी सुटणाऱ्या रेल्वेच्या १३ फेऱ्या आणि पनवेलहून प्रत्येक रविवारी सुटणाऱ्या रेल्वेच्या १३ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहिती दक्षिण
मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देश वासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३ वा भाग आहे. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय घाटीत निवासी डॉक्टरांनी गेल्या तीन
दिवसापासून पुकारलेला संप आज मागे घेतला. रूग्णांच्या नातेवाईकांनी माराहाण केल्याच्या
कारणावरून हा संप पुकारण्यात आला होता. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षाविषयक आणि
अन्य मागण्यांसदर्भात घाटी प्रशासनानं संबंधित समित्यांनां ठोस पावलं उचलण्याचे आदेश
दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या आदर्श ग्राम पाटोदा इथं येत्या दोन मे रोजी दुसऱ्या भूमिजन साहित्य संमेलनाचं
आयोजन करण्यात आलं आहे. भाषा, साहित्य,
संस्कृती आणि संशोधन परिषदेच्या वतीनं आयोजित या संमेलनलाचे अध्यक्ष
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे हे असतील. या संमेलनात विविध परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
राज्यात तापमानात वाढ
कायम असून, आज सर्वात जास्त ४५ पूर्णांक
सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी ४३
पूर्णांक दोन, तर उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं सरासरी ४० अंश
सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
मुंबईतल्या
भांडूप परिसरात आज सकाळी सार्वजनिक स्वच्छतागृह ढासळल्याची घटना घडली. ढिगाऱ्याखालून एक पुरूष आणि एका महिलेला
बाहेर काढलं असून त्यांना राजावाडी रुग्णालयात नेल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेचं वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान आणि मलनि:स्सारण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी
दाखल झाले.
*****
***
No comments:
Post a Comment