Monday, 30 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३०  एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø उन्हाळी सुट्ट्यांतल्या ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशीप २०१८’ या प्रशिक्षण उपक्रमात सहभागी होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युवकांना आवाहन

Ø राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड

Ø लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेशिवाय आंदोलन थांबणार नाही- डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज

Ø औरंगाबाद महानगरपालिकेच्या बैठकीत गोंधळ करणारे चार नगरसेवक एक दिवसासाठी निलंबित

आणि

Ø तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन

*****



 ‘स्वच्छ भारत ग्रीष्मकालीन इंटर्नशीप २०१८’ या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षणासाठी सरकारनं सुरू केलेल्या उपक्रमात देशातल्या युवकांनी सहभागी व्हावं,  असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या मालिकेचा ४३वा भाग काल प्रसारित झाला. केंद्र सरकारच्या क्रीडा, मनुष्यबळ विकास आणि पेयजल या मंत्रालयांनी मिळून हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमातल्या सर्वोत्तम प्रशिक्षकाला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील, तसंच यात सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ भारत मिशनद्वारे एक प्रशस्तीपत्र आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दोन पत गुण दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. माय जी ओ व्ही ओपन फोरमवर या इंटर्नशीपसाठी नोंदणी करता येणार असून, जास्तीत जास्त तरुणांनी यात सहभागी होऊन, स्वच्छतेचं आंदोलन यशस्वी करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.



बुद्ध पौर्णिमा हा दिवस भगवान बुद्धांचं स्मरण करत त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करुन त्यांचं अनुकरण करण्याच्या जबाबदारीची आठवण करुन देत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी बुद्ध पौर्णिमा, तसंच आगामी रमजान महिन्यानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

****

 किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईपोटी राज्य सरकारनं अकराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कृषी विभागाचे मुख्य सचिव बिजय कुमार यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. नुकसान भरपाईची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं सुमारे ३४ लाख हेक्टरवरील कपाशीचं नुकसान झाल्याचं, सरकारनं केलेल्या सर्वेक्षणात समोर आलं आहे.

****



 ग्रामसभा रद्द करण्याचा किंवा त्यांची संख्या कमी करण्याचा कोणताही निर्णय शासनानं घेतलेला नसल्याचं ग्रामविकास विभागानं स्पष्ट केलं आहे. गावात सौहार्दाचं वातावरण कायम ठेवण्याच्या दृष्टीनं ग्रामसभांच्या फक्त तारखा बदलण्यात आल्या असून, ज्या गावांमध्ये सामंजस्याचं वातावरण आहे, ती गावं एक मे रोजीच ग्रामसभा घेऊ शकतात, असं विभागानं म्हटलं आहे.

****



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. काल पुण्यात प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक यांची, सरचिटणीस पदावर शिवाजी गर्जे यांची तर खजिनदारपदी हेमंत टकले यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली.



 कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी विधान परीषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या सर्व जागा लढवल्या जाणार असून लातूर- उस्मानाबाद -बीडची जागाही लढवण्याचा आपला आग्रह असल्याचं सांगितलं. मित्र पक्षानं रडीचा डाव न खेळता सरळ व्यावहारीक भूमिका घेण्याचं आवाहन केलं.

****



 पाणी फॉऊडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातल्या सहभागी गावांना भारतीय जैन संघटनेच्यावतीनं तीन हजार जेसीबी आणि पोकलेन यंत्र देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. या स्पर्धेत मराठवाड्यातल्या वीस तालुक्यांमधल्या गावांमध्ये श्रमदानाचं काम सुरू असून सुमारे ६५० जेसीबी आणि पोकलेन यंत्राद्वारे त्यांची कठीण काम पूर्ण करण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या एक मे रोजी राज्यातल्या या सहभागी गावांमध्ये महाश्रमदानाचं अयोजन करण्यात आलं असून यामध्ये शहरातले सुमारे दोन लाख नागरिक गावांमध्ये जाऊन श्रमदान करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 परभणी - हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून शिवसेनेनं अकोल्याचे आ़मदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांना दिला असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 जायकवाडी धरणातून सिंचनासाठी पाणी देतांना ते जलवाहिनीतून देणं आवश्यक असल्यातं मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केलं आहे. दि इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर आणि सिंचन सहयोग यांच्या वतीनं काल औरंगाबाद इथं घेण्यात आलेल्या 'सिंचन आणि समन्यायी पाणी वाटप जायकवाडी प्रकल्प' या परिसंवादाचं उद्घाटन बागडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. फुलंब्री धरणातलं पाणी शेतकऱ्यांना जलवाहिनीद्वारे देण्यात येणार असून, या कामाच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे पाणी देण्यात येणार असून त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे हे पाणी वापराचयं आहे, असं बागडे यांनी सांगितलं.

****

     

 तीन राज्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेस विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना आपला समाज सत्तास्थानी विराजमान होऊ देणार नाही, असा इशारा  राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी काल लातूर इथं पत्रकारांशी बोलतांना  दिला. संपूर्ण देशातल्या  लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता देण्यात यावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी लिंगायत धर्मियांची लोकशाही मार्गानं  आंदोलनं  चालू आहेत. देशपातळीवर चालणारं हे आंदोलन  धर्म मान्यतेशिवाय थांबणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं . 

****



 औरंगाबाद महानगरपालिकेच्या चार नगरसेवकांना महापौर नंदकुमार घोडेले यांनी, एका दिवसासाठी निलंबित केलं आहे. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांना काल मनपाच्या बैठकीत अंदाजपत्रक सादर करण्यास विरोध करणाऱ्या या तीन नगरसेवकांनी अंदाजपत्रकाच्या प्रती फाडून, त्या सभापती आणि महापौरांच्या अंगावर भिरकावल्या. त्यानंतर महापौरांनी ही कारवाई केली. या गोंधळानंतरही स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी सभागृहात एक हजार ४७५ कोटी ८७ लाख ३० हजार रूपयांचा अर्थसंकल्प जाहिर केला.

****



 २७ फेब्रुवारी २०१७ च्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात दुरुस्ती करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं काल औरंगाबाद इथं प्राथमिक शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. शासनाच्या या बदलीच्या धोरणामुळे जवळपास दोन लाख शिक्षक विस्थापित होत असून त्यामुळे शासन निर्णयातल्या उणिवा दूर कराव्यात अन्यथा आगामी काळात, जेलभरो, रस्ता रोको अशी आंदोलनं करण्याचा इशारा शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी यावेळी दिला.

****

 तथागत गौतम बुध्द यांची जयंती आज उत्साहात साजरी होत आहे. औरंगाबाद शहरातल्या बुध्द लेणीवर पहाटे महापरित्राण पाठाचं वाचन करण्यात आलं. सायंकाळी पाच वाजता  क्रांतीचौकातून भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राचे अध्यक्ष भदंत विशुध्दानंद बोधी महाथेरो यांनी दिली आहे. अखिल भारतीय बौध्द महासभेच्या वतीने सिद्धार्थ उद्यानामध्ये तथागत गौतम बुध्द यांच्या ध्यानस्थ मूर्तीला सकाळी आठ वाजता वंदन करण्यात येणार आहे.

****

 पंढरपूर - शेगाव पालखी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तोडलेल्या झाडांच्या लिलावातून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जालन्याचे  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली.

*****

*** 

No comments: