Thursday, 26 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 26.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

दिव्यांगांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, गेल्या चार वर्षात यासाठी मोठ्या प्रमाणावर काम झालं असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं आज वरिष्ठ नागरिकांसाठीच्या ‘वयोश्री’ योजनेचा आरंभ गहलोत यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते ऑनलाईन नोंदणी प्रणालीचंही उद्घाटन झालं. ‘वयोश्री’ योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालच्या वरिष्ठ नागरिकांना काठी, वॉकर आणि इतर उपयोगी साहित्य मोफत दिलं जातं.

****

जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर आज दहशतवाद्यांनी हल्ला केला. जवानांनी दहशतवाद्यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला. यात एक जवान आणि एक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं राज्यांच्या वस्त्रोद्योग मंत्र्यांची बैठक झाली. हातमाग आणि हस्तकलेला चालना देण्यासंदर्भात विविध उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा झाली. विणकरांना विमा, अनुदान, विपणन आणि त्यांच्या पाल्यांना शिक्षण यासह इतर सुविधा देण्याबाबत विचार करण्यात आल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टामटा यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.

****

एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत रद्द करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. एसटी महामंडळात भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावं लागतं. यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं. या कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक अडचण लक्षात घेता, कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धती रद्द करण्यात येत असून, या निर्णयावर संचालक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

पोलिस दलात पंधरा वर्षांपासून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक मे रोजी महाराष्ट्र दिनी पोलिस महासंचालक सन्मानचिन्हं प्रदान केली जाणार आहेत. यात मराठवाड्यातल्या ६५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील ५७१ जणांना सन्मानचिन्ह जाहीर झालं असून, मुंबईत पोलिस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर हे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहेत.

****

पुण्याजवळ मुळशी तालुक्यात कातर खडक गावात चेन्नईहून उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी तिघांचा धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या उन्हाळी शिबिरात सहभागी होण्यासाठी चेन्नईच्या २० विद्यार्थ्यांचा गट या गावात आला होता. काल एकाचा मृतदेह सापडला, तर आज दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या बाल कल्याण समितीवर विधिज्ञ अनिता शिऊरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाल न्याय अधिनियम २०१५ कलम २७ अन्वये तीन वर्षांसाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांच्या कारभारात आणि व्यवस्थापनेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, तसंच या संस्थांमध्ये बाल समित्यांचं कार्य सुरळीत चालत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

****

जिल्हा परिषद शाळांनी नवनवीन प्रयोग करुन शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं तुळजापूरचे गटविकास अधिकारी भागवत ढवळशंख यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी इथं मंगरुळ बीट विभागातल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना सावित्री जोतिबा फुले पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. मंगरुळ बीटमधल्या शाळांचा ई लर्निंग, डिजिटल वर्गखोलीचा पॅटर्न राज्यात पथदर्शी ठरावा, असं ते म्हणाले.

****

नाशिक महापालिकेच्या चार विषय समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक आज पार पडली. सर्व समित्यांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी कावेरी घुगे, आरोग्य समिती सतीश कुलकर्णी, विधी समिती पूनम सोनवणे, तर शहर सुधार समितीच्या सभापतीपदी पूनम सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

****

नाशिक शहरात सातपूर भागातल्या कार्बन नाका परिसरातल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी रामदास शिंदे यास जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. १८ एप्रिल २०१६ रोजी ही घटना घडली होती.

****

अहमदनगर इथं डाक विभागाच्या १६ आधार नावनोंदणी केंद्र आणि अद्ययावत सेवा केंद्रांचं उद्घाटन आज खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते झालं. डाक विभागाकडे आधार नोंदणीचं काम दिल्यामुळे कामाची विश्वसनीयता वाढणार असल्याचं मत बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक अजातशत्रू सोमाणी यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...