Sunday, 22 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.04.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

****



Ø  १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Ø  औरंगाबादमधल्या 'ऑरिक सिटी' चं काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Ø  रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी कोष विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्याचा सरकारचा प्रयत्न- राज्यमंत्री अर्जुन खोतकर

 आणि

Ø  बीड इथ होणारं सहावं राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन आचारसंहितेमुळे रद्द

*****



 १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या अध्यादेशाद्वारे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांमध्ये सुधारणा होणार असून, १२ वर्षांखालील बालकांवर लैंगिक अत्याचारासाठी फाशी, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या - किशोरवयीनांवर लैंगिक अत्याचारासाठी पूर्वीच्या १० वर्षांऐवजी २० वर्ष तुरुंगवास, किंवा जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. तसंच हा गुन्हा अजामीनपात्र असावा, असंही या अध्यादेशात प्रस्तावित आहे. अशा अत्याचाराच्या घटनांचा दोन महिने मुदतीत तपास करणं आणि त्या नंतरच्या दोन महिन्यात सुनावणी पूर्ण करणं बंधनकारक असावं, असंही या अध्यादेशात म्हटलं आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर अध्यादेश लागू होईल. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

 फरार आर्थिक गुन्हेगार अध्यादेश २०१८ लाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या नवीन अध्यादेशानुसार आर्थिक गुन्ह्यात फरार असलेल्या तसेच कर्ज बुडव्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

****



 औरंगाबादची ऑरिक सिटी ही राज्यातली सर्वात झपाट्यानं वाढणारी औद्योगिक वसाहत २०२२ पर्यंत पूर्ण केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड-ऑरिक बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, मुख्यमंत्र्यांनी ऑरिक सिटीच्या माध्यमातून तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले....



इथला ऑकर उद्योग हा युसोंगच्या रूपाने आलेला आहे. आणि योसोंग हि केवळ एक इंडस्ट्रि नाही आहे. एक मोठी वेन्डंर इंको सिस्टम आणि म्यानिफॉचरींग इंको सिस्टक जी त्यातनं उभी होणार आहे.  यातनं कितीतरी हजार कोटीची इनवेस्टमेंन्ट ही तयार होणार आहे. आणि हि अतिशय इंन्टिग्रेटेड स्मार्ट सिटी  ति आपण तयार करतो आहोत. ज्यामध्ये  साधारणपणे तिन लाख लोकांना रोजगार मिळेल. अश्या प्रकारची अपेक्षा आहे.  औद्योगिक वसाहतिनी केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा असं मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितलं. ते म्हणाले ..

 जेवढ्या एम.आय.डी.सी. असतील तेवढ्या औष्णीक केंद्र असतील. यांनी पहिल्यांदा पुढच्या तिन वर्षामध्ये महानगर पालिकांच जे सिवेज वॉटर आहे, प्रलिट करून वापरावं. ते जर कमी पडलं तर त्यांनी फ्रेश पाणी घ्यावं. काही प्रमाणात तर त्यांना फ्रेश पाणी लागणारचं आहे. पिण्याकरता लागणाऱ्या पण इंडस्ट्रियल युज करीता. याच पहिल मॉडेल आपण नागपूर येथे तयार केलं. आता ऑरिक मध्ये ते तयार करतोयं. नांदेडचं पाणी हे परळीला देण्या करीता  औद्योगिक वौष्णीक केंद्राला त्याची आपण वैवस्था केली आहे. दिल्ली, मुंबई, औद्योगिक वसाहतित जमिनी संपादीत झालेल्या शेतकऱ्यांचे  प्रश्न सोडविण्यासाठी लवकरचं शिबिर घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एक महिना आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सांगतोयं की, जे जे प्रश्न आहेतं ते सुचीबध करून त्याच्यावर ज्या काही उपाय योजना आहेत त्याचे काय निर्णय आहे ते तयार करा. आणि एक महिन्या नंतर येथे कॅम्प लावू त्या माध्यमातण शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवू.



 केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच उद्योजक यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकार देशात विमान निर्मितीला प्राधान्य देत असून, औरंगाबाद डीएमआयसीमध्ये विमान निर्मिती प्रकल्प उभारण्याचा विचार करण्यात येईल, असं केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात ऑरिक ॲपचं लोकार्पण तसंच ऑरिक इरादा पत्रांचं हस्तांतरणही करण्यात आलं.

 दरम्यान, काल सकाळी निर्लेप उद्योग समुहाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमालाही मुख्यमंत्री उपस्थित होते, भोगले परिवारानं निर्लेप उद्योग समूहाच्या माध्यमातून मिळवलेलं यश, इतरांना प्रोत्साहित करणारं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे लिखित नीतिधुरंधर या दिवंगत नेते बाळासाहेब पवार यांच्यावरील चरित्र ग्रंथाचं प्रकाशनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. बाळासाहेब पवार यांच्या कामाचा भाव हा व्रतस्थ होता, अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

 याशिवाय औरंगाबाद पोलिस परिक्षेत्राच्या ई- समन्स, एम पोलिस, आणि यथार्थ ॲपचं उदघाटनही मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. पोलिस यंत्रणेनं नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण ५२ टक्क्यांनी वाढल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****



 प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल बीड जिल्ह्याला उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार देऊन काल गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. जनतेला केंद्रस्थानी ठेवून योजना राबवल्या गेल्या तर, देशातल्या लोकांचं जीवनमान बदलू शकत असं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर.  डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यशासन शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत, प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेच्या उदघाटन प्रसंगी ते काल बोलत होते. देशातल्या एकूण रेशीम उत्पादनाच्या ५० टक्के उत्पादन मराठवाड्यात होतं, त्यामुळे जालना रेशीम कोष बाजारपेठेसाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. ‘महारेशीम अभियानआणि ‘मनरेगाच्या माध्यमातून रेशीम उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक मदत केली जात असल्याचं ते म्हणाले.

****



 बीड इथ होणारं सहावं राज्यस्तरीय व्यसनमुक्ती संमेलन कालच्या उद्घाटनाच्या दिवशी सकाळी साडेनऊला  निघालेल्या व्यसनमुक्ती दिंडीनंतर आचारसंहितेच्या कारणावरून रद्द करण्यात आलं. उस्मानाबाद- लातूर -बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातल्या विधान परिषद निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याचे आदेश जारी झाल्यानं ते रद्द करावं लागलं.

****



 परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या ११० गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. पाणी फाऊंडेशनचे प्रमुख अविनाश पौळ यांनी काल परभणी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जलसंधारणाच्या कामात शहरातल्या नागरिकांनाही सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रसिध्द कवयित्री संध्या रंगारी यांना २०१७ चा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारजाहीर झाला आहे. लातूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी च्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथं काल पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनादरम्यान काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली.  औरंगाबाद - खुलताबाद रस्त्यावर वेरुळ टी पॉईंट इथं  झालेल्या या आंदोलनामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून जवळपास शंभर जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

****



 औरंगाबाद इथं महागामी या नृत्य प्रशिक्षण गुरुकुलातर्फे आयोजित दोन दिवसीय नृत्य महोत्सवाला काल सुरुवात झाली. पहिल्या दिवसाच्या सत्रात अष्ट प्रहर या कार्यक्रमातून दिवसाचे आठ प्रहर आणि काव्य, राग तसंच नृत्य यावर सादरीकरण झालं. 

****



 लातूर इथं काल कबीर व्याख्यानमालेत ‘मराठी संत परंपरा आणि वर्तमान’या विषयावर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांचं  व्याख्यान झालं. आजच्या भौतीक प्रधान युगामध्ये नैतिक मूल्यं जपण्यासाठी संतांच्या विचाराची गरज असल्याचं मत, देशमुख यांनी व्यक्त केलं.

*****

***

No comments: