Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 21 April 2018
Time
6.50AM to 7.00AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२१ एप्रिल
२०१८ सकाळी
६.५०
मि.
****
Ø सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह सात
विरोधी पक्षांचा महाभियोग प्रस्ताव
Ø बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक - पॉस्को
कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरु
Ø प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी
बीड जिल्ह्याला लोकप्रशासन पुरस्कार
आणि
Ø औरंगाबाद इथं ऑरिक बिडकीन औद्योगिक
क्षेत्राचं आज भूमीपूजन
*****
काँग्रेससह इतर सात विरोधी पक्षांनी सरन्यायाधीश
दीपक मिश्रा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला आहे. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू यांच्याकडे काल हा प्रस्ताव सादर करण्यात आला. न्यायमूर्ती बी एच लोया
मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं परवा दिलेल्या निवाड्याच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस
देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती या प्रस्तावाची छाननी करुन तो सदनासमोर मांडावा की नाही
याबाबत निर्णय घेतील.
दरम्यान, हा महाभियोग प्रस्ताव राजकीय हेतूनं प्रेरित
असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयानंही या महाभियोग प्रस्तावाबाबत
नाराजी व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती ए के सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या
पीठासमोर काल सुनावणी झाली, सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याबाबत लोकप्रतिनिधींसह
अनेकांनी केलेली जाहीर विधानं, दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया, न्यायालयानं व्यक्त
केली. या खटल्याची पुढची सुनावणी येत्या सात मे रोजी होईल.
****
दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राजिंदर
सच्चर यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक
आणि शैक्षणिक स्थितीशी संबंधित प्रकरणांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्थापन करण्यात
आलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते.
****
बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक - पॉस्को कायद्यात
सुधारणा करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारनं सुरु केली आहे. अशा प्रकरणातल्या आरोपींना
फाशीची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात
दाखल एका जनहित याचिकेसंदर्भात केंद्र सरकारनं काल सादर केलेल्या अहवालात ही माहिती
देण्यात आली.
****
२६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी जबिउद्दीन
अन्सारी उर्फ अबू जुंदाल याच्याविरुद्ध सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीला मुंबई उच्च
न्यायालयानं ११ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. २०१२ मध्ये जुंदाल याला सौदी अरेबियातून
ताब्यात घेण्यात आलं होतं, सौदी अरेबिया ते दिल्ली प्रवासासंदर्भातली कागदपत्रं सादर
करण्याचे आदेश गेल्या महिन्यात कनिष्ठ न्यायालयानं जुंदालच्या वकिलाला दिले होते, त्याविरोधात
दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता, या अर्जावर काल झालेल्या सुनावणी
दरम्यान, न्यायालयानं हे स्थगिती आदेश दिले.
****
टॅक्सी आणि हलकी वाहनं व्यावसायिक कारणासाठी चालवण्याकरता
खाजगी परवाना वापरण्याची परवानगी चालकांना
द्यावी, अशी सूचना केंद्रानं राज्य सरकारांना केली आहे. मात्र ट्रक, बस आणि इतर मध्यम तसंच मोठ्या
व्यापारी वाहनांसाठी व्यावसायिक परवानाच आवश्यक राहील, असं केंद्रीय परिवहन मंत्रालयानं
राज्यांना पाठवलेल्या सूचनेत म्हटलं आहे.
****
शिवसेना आघाडी करण्यास इच्छुक नसेल, तर भाजपही तसा
आग्रह करणार नाही, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या शिवसेनाप्रमुख
उद्धव ठाकरे यांच्या पुनरुच्चाराच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार बोलत होते.
****
प्रधानमंत्री पीक विमा
योजनेत उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल बीड जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन
पुरस्कार जाहीर झाला आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. आज
दिल्ली इथं बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह तसंच जिल्हा कृषी अधीक्षक एम एल चपळे यांना
हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
दरम्यान, राज्यातल्या
३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा राष्ट्रीय गुणात्मक
आश्वासक मानक पुरस्कार मिळवला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे
यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्या
आरोग्य संस्थांमध्ये नागपूर महिला रूग्णालय, उस्मानाबाद ग्रामीण रूग्णालयासह औरंगाबाद
जिल्ह्यातले आळंद तसंच गणोरी प्राथमिक आरोग्य केंद्रं, जालना जिल्ह्यातलं हसनाबाद प्राथमिक
आरोग्य केंद्र, अहमदनगर जिल्ह्यातलं आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, यांच्यासह २८ आरोग्य
संस्थांचा समावेश आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
श्रीरामपूर पंचायत समितीचा शाखा अभियंता अशोक मुंढे याला लाच प्रकरणात दहा वर्ष सक्तमजुरी
आणि ८५ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. श्रीरामपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं
काल हा निकाल दिला. दंड न भरल्यास, आणखी अडीच वर्ष कारावास सुनावण्यात आला आहे. २०१६
साली, एका रस्त्याच्या कामाचं देयक अदा करण्यासाठी ठेकेदाराकडून दीड लाख रुपये लाच
घेताना, मुंढे याला रंगेहाथ अटक झाली होती.
****
लाकूड वाहतुक करणाऱ्या ट्रकचालकावर कारवाई न करण्यासाठी
१० हजार रुपयांची लाच घेतांना बुलडाणा इथल्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
काल रंगेहाथ पकडलं. पुरुषोत्तम बुटे असं या वनपालाचं नाव आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
*****
औरंगाबाद इंडस्ट्रियल
टाऊनशिप लिमिटेड-ऑरिक बिडकीन, या औद्योगिक क्षेत्राचं भूमीपूजन आज होणार आहे. विधानसभा
अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात ऑरिक
ॲप लोकार्पण तसंच ऑरिक इरादा पत्रांचं हस्तांतरणही केलं जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष
देसाई यांच्या हस्ते आज औरंगाबादनजिक आसेगाव इथं, पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण हि
होणार आहे.
दरम्यान, जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेचं उद्घाटन
आज वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार
आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ही बाजारपेठ उभारण्यात आली आहे.
****
ग्रामस्वराज अभियाना
अंतर्गत उज्ज्वला दिवस काल देशभरात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त ठिकठिकाणी उज्ज्वला
पंचायतींचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या महिलांना
घरगुती गॅसचं मोफत वाटप करण्यात आलं.
औरंगाबाद इथं अनुसूचित
जाती-जमाती, अतिमागास वर्ग, अंत्योदय अन्न योजना लाभार्थी, पंतप्रधान आवास योजनेतील
लाभार्थ्यांना काल गॅस जोडणी देण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये
२० लाभार्थ्यांना घरगुती वापराच्या गॅसचं काल वाटप करण्यात आलं. यामध्ये पोहनेर इथल्या
पाच तर उमरगा तालुक्याच्या मुगळी इथल्या १५ लाभार्थ्यांचा समावेश आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या
भूम तालुक्यातल्या सुकटा हे गाव सध्या गणिताचं गाव म्हणून प्रसिध्द होत आहे. याविषयी
अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
गणित विषयाचा पाया असलेली ही सूत्र पुस्तकातून
बाहेर काढून विद्यार्थ्यांच्या सतत नजरे समोर रहावी, ज्यामुळं विद्यार्थ्यांच्या मनात
गणित विषयाची भीती नाहीशी होवून गणिताविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशानं गावातल्या
भिंती बोलक्या झाल्या आहेत. गावातले विद्यार्थी मोकळ्या वेळात घरची कामं करताना ही
गणितसूत्रं वाचत-वाचत पाठांतर करू लागली अन गणिताचा पाया पक्का होवू लागला.
प्रकाश यादगिरे या एका ध्येय वेड्या शिक्षकानं
गावातल्या शिवशाही क्रीडामंडळाच्या सहाय्यानं साकारलेलं हे एक गाव गणिताचं गाव म्हणून
आता वेगळी ओळख निर्माण करू लागलंय.
--- देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद.
****
सामाजिक न्याय आणि विशेष
सहाय्य विभागाच्यावतीनं आयोजित सहावं व्यसनमुक्ती साहित्य संमेलन आजपासून बीड इथं सुरु
होत आहे. या दोन दिवसीय संमेलनाचं उद्घाटन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार
असून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले अध्यक्षस्थानी राहतील. संमेलनाध्यक्ष डॉ.अभय
बंग, स्वागताध्यक्ष आमदार विनायक मेटे यावेळी उपस्थित असतील. आज सकाळी ९ वाजता व्यसनमुक्ती
दिंडीनं या संमेलनाला प्रारंभ होणार आहे.
****
लातूर इथल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण
केंद्रात १६६ प्रशिक्षणार्थींच्या सोळाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल झाला. मुदखेड
इथल्या सीआरपीएफ महाविद्यालयाचे प्राचार्य महानिरीक्षक राकेशकुमार यादव यावेळी प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होते. या केंद्रात आतापर्यंत सहा हजार जणांनी प्रशिक्षण घेतल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
सहा जागांसाठीच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. यामध्ये मराठवाड्यातील
परभणी-हिंगोली आणि उस्मानाबाद-बीड-लातूर सह अन्य चार मतदारसंघांचा समावेश आहे. २६ एप्रिलपासून
ते तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. चार मे रोजी अर्जांची छाननी
होणार असून, सात मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २१ मे रोजी निवडणूक तर २४
मे रोजी मतमोजणी होणार आहे.
****
जालना इथल्या बनावट
बियाणे प्रकरणातल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे. पोलीस आणि कृषी विभागाच्या
पथकानं काल बदनापूर तालुक्यात दाभाडी इथल्या एका शेतात छापा टाकून नऊ लाख रुपये किमतीचं
बनावट कपाशी बियाणं जप्त केलं. तसंच एका इसमाला अटक केली.
*****
***
No comments:
Post a Comment