Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 April 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ एप्रिल २०१८ दुपारी १.०० वा.
****
भारतीय जनता पक्षानं विकासाच्या
राजकारणाला अधिक महत्व दिलं असून, कर्नाटक राज्यासाठीही तेच धोरण असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे
उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी आज पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी ॲपच्या माध्यमातून
संवाद साधला.
दरम्यान, पंतप्रधान
तीन दिवसांच्या चीन दौऱ्यासाठी आज दुपारी रवाना होणार आहेत. या दौऱ्यात उद्या आणि परवा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि
मोदी यांची अनौपचारिक बैठक होणार आहे.
****
उत्तर प्रदेशात कुशीनगर जिल्ह्यात बिशनपूर इथं
आज सकाळी एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर शाळकरी मुलांच्या वाहनाला झालेल्या अपघातात १३
विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले आहेत, त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून, जखमींना वैद्यकीय
उपचारांबरोबरच सर्व प्रकारची मदत पुरवण्याचे आदेश
जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदतही
त्यांनी जाहीर केली आहे.
****
विविध
वकील आणि राजकारणी सामाजिक माध्यमांवर आणि वृत्तवाहिन्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
करत असल्याची याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील आणि भारतीय
जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया
यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं अशा वक्तव्याची नोंद घ्यावी, अशी मागणी
या याचिकेत करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात या याचिकेवर विचार होईल, असं न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ इंदू मल्होत्रा यांच्या नियुक्तीला सरकारनं मंजुरी
दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी थेट
नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला वकील ठरणार आहेत. उद्या त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी काल मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.
काल रात्री रूग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्यामुळे हा संप
पुकारल्याची माहिती घाटी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
शासनानं थांबवलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया पुन्हा चालू
करावी, या मागणीसाठी औरंगाबाद
इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज सकाळी सेट-नेट-पीएचडी धारकांनी
आंदोलन केलं. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर सरकार विरोधात घोषणाबाजी करत त्यांनी
आपल्या मागण्यांचं निवेदन विद्यापीठाकडे सादर केलं.
****
खाजगी माहिती गहाळ झाल्याप्रकरणी केंद्र सरकारनं केंब्रिज
अॅनालिटिका आणि फेसबुक या
कंपन्यांना दुसऱ्यांदा
नोटीस बजावली आहे. यासंदर्भात दोन कंपन्यांनी दिलेल्या
माहितीत तफावत आढळल्यानं ही नोटीस बाजवण्यात आली आहे. त्याचबरोबर
१० मे रोजी विचारलेल्या आणखी एका संदर्भाचं स्पष्टीकरण या
कंपन्यांनी द्यावं, असंही केंद्रानं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या पहिल्या नोटीशीला
या दोन कंपन्यांनी ज्या प्रमाणे उत्तरं दिली होती, त्यावर समाधान
न झाल्यानं सरकारनं स्पष्टीकरण मागितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ एप्रिलला आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशावासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३वा
भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहीन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
राज्यात
तयार होणाऱ्या मद्याची
बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री होऊ नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं ट्रॅक ॲण्ड ट्रेस पद्धतीचा अवलंब
करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत राज्य उत्पादन
शुल्क विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अवैध दारु विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी
विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
****
विक्रीकर
विभागाच्या कर महसुलात यावर्षी एक लाख १५ हजार ९४० कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
मुंबई इथं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाजीएसटी संकेतस्थळ, ऑनलाईन
निर्धारणा, महाजीएसटी मोबाईल ॲप, महापीटी मोबाईल ॲप या विविध संगणकीय सुविधांचा आरंभ करण्यात आला, त्यावेळी त्यांनी ही माहिती
दिली. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या ६० उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुनगंटीवार यांच्या हस्ते
गौरव करण्यात आला.
****
भारतीय
क्रिकेट नियामक मंडळानं
कर्णधार विराट कोहलीची सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी
शिफारस केली आहे. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी सुनील गावसकर, तर द्रोणाचार्य
पुरस्कारासाठी १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या
नावाची शिफारस केली आहे. बीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी पीटीआय
या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
//*********//
No comments:
Post a Comment