Saturday, 21 April 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.04.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 April 2018

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

केंद्रीय मंत्रीमंडळानं १२ वर्षांखालील मुलांवर बलात्कार करणाऱ्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. या गुन्हेगारी सुधारणा कायद्याअंतर्गत भारतीय दंड विधान, गुन्हेगारी प्रक्रिया संहिता आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक-पॉस्को या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. तसंच या नवीन अध्यादेशानुसार १६ वर्षांखालील मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना पूर्वीच्या १० वर्षांऐवजी २० वर्ष तुरुंगवास किंवा जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसंच या गुन्ह्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवणे प्रस्तावित आहे. अशा अत्याचाराच्या घटनांचा दोन महिन्तयात तपास करणं आणि त्या नंतरच्या दोन महिन्यात सुनावणी पूर्ण करणं बंधनकारक करणं प्रस्तावित आहे. जम्मू काश्मीरमधल्या कठुआ इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर हा अध्यादेश काढण्यात आला आहे. हा अध्यादेश आता मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे.

फरार आर्थिक गुन्हेगार अध्यादेश २०१८ लाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या नवीन अध्यादेशानुसार आर्थिक गुन्ह्यात फरार असलेल्या तसेच कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

****

औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड-ऑरिक बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचं भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. ऑरिक सिटी ही राज्यातली सर्वात झपाट्यानं वाढणारी औद्योगिक वसाहत असून ती २०२२ पर्यंत पूर्ण केली जाईल, तसंच या माध्यमातून तीन लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच एक शिबीर घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकार देशात विमान निर्मितीला प्राधान्य देत असून, औरंगाबाद डीएमआयसीमध्ये विमान निर्मितीचा विचार करण्यात येईल, असं सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमात ऑरिक ॲप लोकार्पण तसंच ऑरिक इरादा पत्रांचं हस्तांतरणही करण्यात आलं.

****

रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना रेशीम कोष विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारपेठेच्या उदघाटन प्रसंगी ते आज बोलत होते. देशातल्या एकूण रेशीम उत्पादनाच्या ५० टक्के उत्पादन मराठवाड्यात होतं, त्यामुळे जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ उभारण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘महारेशीम अभियान’ आणि ‘मनरेगा’च्या माध्यमातून रेशीम उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक मदत केली जात असल्याचं ते म्हणाले.

****

डिजीटल प्लॅटफॉर्मचा वापर करुन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून सामान्यांना चांगल्या सेवा द्याव्यात, असं आवाहन मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी केलं आहे. मुंबई इथं आज सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं नागरी सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचं दरडोई उत्पन्न वाढलं असून, बाल मृत्यूदर कमी झाला आहे, तसंच अन्य क्षेत्राचा देखील विकास झाला असल्याचं मुख्य सचिवांनी यावेळी नमूद केलं.

****

वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या सोमवारपासून रस्ता सुरक्षा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा विषयाचं गांभीर्य लक्षात घेता २३ एप्रिल ते सात मे या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या ११० गावांनी ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे’त सहभाग घेतला आहे. पाणी फाऊंडेशनचे प्रमुख अविनाश पौळ यांनी आज परभणी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जलसंधारणाच्या कामात शहरातल्या नागरिकांनाही सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयाच्या प्राध्यापिका तथा मराठी साहित्यातील प्रसिध्द कवयित्री संध्या रंगारी यांना २०१७चा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. लातूरच्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमी’ च्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ३० एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

राज्यात आज सर्वात जास्त ४५ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी ४३, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: