आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२० एप्रिल
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रकुल
गटातल्या लहान आणि बेट स्वरूपातल्या देशांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं महत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
अधोरेखित केलं आहे. लंडन इथं राष्ट्रकुल गटातल्या देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत
ते बोलत होते. शाश्वत विकासाचं ध्येय गाठण्यासाठी सामाईक निधीतलं भारताचं योगदान
दुप्पट करणं, संयुक्त राष्ट्राच्या कायमस्वरूपी
मोहिमेच्या माध्यमातून लहान देशांमध्ये लहान प्रकल्प राबवणं, तसंच क्रिकेट आणि कौशल्य विकास
क्षेत्रात क्षमता उभारणीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवणं, अशा विविध उपक्रमांची
पंतप्रधानांनी यावेळी घोषणा केली.
****
इयत्ता दहावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या
टंकलेखनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना सरसकट दोन गुण देण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक
शिक्षण मंडळानं घेतला आहे. गेल्या महिन्यात बारा तारखेला झालेल्या इंग्रजी विषयाच्या
प्रश्नपत्रिकेतल्या एका परिच्छेदात त्रुटी आढळल्या प्रकरणी अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनीं
मंडळाशी संपर्क साधला होता. प्रश्नपत्रिकेतली टंकलेखनाची चूक लक्षात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं हे दोन गुण
देणार असल्याचं मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी देण्यात
येणारे कायाकल्प पुरस्कार काल नवी दिल्लीत आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते
प्रदान करण्यात आले. रुग्णालय आणि रुग्णालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यात केंद्र शासनाच्या
मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या देशातल्या रुग्णालयांना या पुरस्कारानं गौरवण्यात
येतं. यात राज्यातल्या तीन रुग्णालयांना सन्मानित करण्यात आलं. त्यामध्ये गडचिरोलीचं
जिल्हा सामान्य रुग्णालय, बारामतीचं महिला रुग्णालय आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर
ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहाराच्या भूमी अभिलेख कार्यालयातल्या
छाननी लिपिकाला ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी
काल रंगेहात पकडलं. शेतजमीन मोजणीच्या नकाशावर हद्द कायम करून नकाशाची नक्कल देण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
परभणी इथंही न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात तक्रारदाराच्या
बाजूनं साक्ष देऊन मदत करण्यासाठी २५ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या पोलिस जमादार शेख
उस्मानला अटक करण्यात आली.
//**********//
No comments:
Post a Comment