Saturday, 21 April 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.04.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



नागरी सेवा दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त नवी दिल्लीत दोन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरी दिनानिमित्त सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे प्रशासकीय अधिकारी देशाच्या विकासासाठी स्वत:ला समर्पित करतील, असा विश्वास असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल बीड जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला आहे.  

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली उज्ज्वला योजना महिलांच्या उज्ज्वल जीवनासाठी वरदान ठरणार आहे, असं मत केंद्रीय वाणिज्य आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे इथं त्यांच्या हस्ते महिलांना गॅस जोडणी आणि शेगडीचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेतून देशभरात १५ लाख गॅस जोडण्या देऊन उज्ज्वला दिवस साजरा केल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 जम्मू काश्मीरमधल्या कठुआ आणि उत्तर प्रदेशातल्या उन्नाव इथं घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ काल परभणी शहरात सर्वधर्म जातीय सलोखा मंच आणि मुस्लिम मुत्तहेदा महाजच्या वतीनं बंद पाळण्यात आला. या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातल्या सर्व बाजारपेठा बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी इदगाह मैदानावरुन निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****



 औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड-ऑरिक बिडकीन, या औद्योगिक क्षेत्राचं भूमीपूजन आज होणार आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात ऑरिक ॲप लोकार्पण तसंच ऑरिक इरादा पत्रांचं हस्तांतरणही केलं जाणार आहे.

 दरम्यान, जालना इथं रेशीम कोष बाजारपेठेचं उद्घाटन आज वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते होणार आहे.

*****

***

No comments: