Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 April 2018
Time 6.50AM to 7.00AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ एप्रिल २०१८ सकाळी ६.५० मि.
****
·
खासगी प्रवासी वाहतुकदारांच्या भाडेवाढीवर
राज्य सरकारचं नियंत्रण; गर्दीच्या हंगामात एसटीच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट प्रवासभाडे
आकारता येणार.
·
हिंदू लिंगायत समाजाला सर्व त्रुटी दूर करून,
आरक्षण देणार - मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
·
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उस्मानाबादचे
गिरीश बदोले राज्यात प्रथम.
·
आष्टी इथं शोभेच्या दारुचा स्फोट; एकाच कुटुंबातल्या
तिघांचा मृत्यू.
आणि
·
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना
नेहवाल आणि एच.एस.प्रणॉय यांची एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक.
****
गर्दीच्या हंगामात खासगी प्रवासी वाहतुकदारांच्या
भाडेवाढीवर राज्य सरकारनं नियंत्रण आणलं आहे. आता गर्दीच्या हंगामात खासगी प्रवासी
वाहतुकदारांना एसटीच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली. यापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या वाहनाचा
परवाना रद्द केला जाईल, असा इशाराही रावते यांनी दिला. याबाबतचा शासन निर्णय काल जारी
करण्यात आला. प्रवाशांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं
रावते यांनी सांगितलं.
****
हिंदू लिंगायत समाजाला इतर मागास प्रवर्गाचं
आरक्षण देण्यात येणाऱ्या त्रुटी दूर करुन आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. काल सोलापूर इथं, श्रीशैल पीठाचे लिंगोद्भव जगत्गुरू श्री १००८ पंडिताराध्य यांच्या १०८ फुटी पुतळ्याचं
अनावरण आणि १००८ शिवलिंगाची प्रतिष्ठापना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी
ते बोलत होते. हिंदू लिंगायत समाजाला आरक्षणासाठी इतर मागासर्गीय आयोगाकडे शिफारस करणार
असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले. मंगळवेढा इथं महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यासाठी
येत्या १५ दिवसांच्या आत योग्य निर्णय घेण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.
दरम्यान, पत्रकारांच्या घराच्या प्रश्नाबाबत
शासन सकारात्मक असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत ‘पत्रकार आरोग्य
शिबिरा’च्या उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
****
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुहास
पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव यांनी
काल राजभवनात पेडणेकर यांना नियुक्तीचं पत्र सुपूर्द केलं. रसायन शास्त्राचे प्राध्यापक
आणि मुंबईतल्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले डॉ.पेडणेकर
यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा वयाची ६५ वर्ष, यापैकी आधी पूर्ण होणाऱ्या मुदतीसाठी
असेल.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय
पात्रता प्रवेश परीक्षा - नीट मध्ये पात्र ठरण्यासाठीच्या किमान गुणांमध्ये १५ टक्क्यांनी
कपात करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. या निर्णयाचा सुमारे
१८ हजार विद्यार्थ्यांना लाभ होईल, असं मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमातल्या जागा भरण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न
केले जात असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं आहे.
****
महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी
आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र तसंच कृषी विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी या पदवी
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची एम एच टी-सी ई टी परीक्षा येत्या १० मे रोजी होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातही १५ उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून, जिल्ह्यातून तीन हजार
५६९ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.
****
अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक-ॲट्रॉसिटी
कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावर सरकारनं दाखल केलेल्या
पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालय येत्या तीन मे रोजी सुनावणी घेणार आहे. महान्यायवादी
के के वेणुगोपाल यांनी या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयाकडे
केली होती. ॲट्रॉसिटी कायद्यातल्या काही अटी शिथिल करण्याचा निर्णय न्यायालयानं गेल्या
२० मार्च रोजी दिला होता, त्या निर्णयावर सरकारनं ही पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
****
देशभरातल्या बांधकाम, उत्पादन, सुक्ष्म, लघु
आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सुरक्षा विषयक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ७२ व्यवस्थापनांना
काल नवी दिल्लीत केंद्रीय उद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते सन्मानित
करण्यात आलं. त्यात राज्यातल्या १५ संस्थांचा समावेश आहे.
****
मुंबईतल्या कमला मिल्स अग्निकांड प्रकरणी मोजोस
बिस्तो पबचा भागीदार युग तुलीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आहे. वन
अबव्ह पबमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागल्याचं तुलीनं
आपल्या अर्जात म्हटलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या या दुर्घटनेत १४
जणांचा मृत्यू झाला होता.
****
कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमचा हस्तक तारिक
परवीन याला ठाणे पोलिसांनी काल मुंब्रा इथून अटक अटक केली. तारिक परवीन हा १९९८ मधल्या
दुहेरी हत्याकांड प्रकरणातला आरोपी आहे. जानेवारी २०१५ मध्ये तारिक परवीन हा दाऊदच्या
टोळीचा सक्रीय सदस्य होता.
****
केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससी परीक्षेचा
निकाल काल जाहीर झाला. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातल्या कसगी इथले गिरीश
बदोले यांचा राज्यातून पहिला तर देशभरातून विसावा क्रमांक आला आहे. नांदेडचे दिग्विजय
बोडके यांनी राज्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय बीडचे प्रणय नहार, परळीचे
रोहित गुट्टे, जालन्याचे डॉ.मोनिका घुगे, डॉ श्रीकांत तापडिया, औरंगाबादचे नूह सिद्दीकी,
शेख सलमान आणि स्नेहल भापकर यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलं आहे.
****
आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची
सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांनी महिला तसंच पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश
केला आहे. चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत सायनानं, दक्षिण कोरियाच्या
ली जँग मी हिचा २१-१५, २१-१३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला, तर पुरुषांच्या उपांत्यपूर्व
स्पर्धेत प्रणॉयनं कोरियाच्या सॉन वॅन याचा १८-२१, २३-२१, २१-१२ असा पराभव करून उपांत्य
फेरी गाठली. किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांचं मात्र या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
आलं आहे.
****
शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाईचा
इशारा औरंगाबादचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिला
आहे. ते काल औरंगाबाद इथं, जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना
दर्जेदार बियाणं उपलब्ध व्हावीत, साठी शासन आग्रही असल्याचं सांगतानाच, बियाणे तसंच
खतांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सावंत यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी
महाराज कृषी सन्मान योजनेच्या कर्जमाफी लाभार्थ्यांची थेट भेट घेऊन खऱ्या लाभार्थ्यांस
लाभ मिळाला का, याची पाहणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी
यावेळी दिले.
औरंगाबाद शहराच्या कचरा समस्येचाही पालकमंत्र्यांनी
यावेळी आढावा घेतला. येत्या ३० एप्रिलपर्यंत रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याची योग्य ती
विल्हेवाट लावावी, तसंच ओल्या कचऱ्यावर कंपोस्टींग प्रक्रिया तत्परतेने करुन, शहर लवकरात
लवकर स्वच्छ, सुंदर करावं, असे निर्देशही डॉ.सावंत यांनी दिले. नागरिक आणि प्रत्यक्ष
काम करणाऱ्या सफाई कामगरांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रतिबंधात्मक ठोस उपाययोजना
करावी, असंही त्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथं शोभेच्या दारुचा स्फोट
होऊन तीन जणांचा मृत्यू झाला. शहरातल्या शेकापूर
रस्त्यावर दुपारी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली, या दुर्घटनेत घराचं छत कोसळून
मोठं नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात नाणार इथला प्रस्तावित
तेल शुध्दीकरण प्रकल्प मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना किंवा दळणवळणाच्या सोयीनुसार
इतर जिल्ह्यात उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा, अशी मागणी मराठवाडा अनुशेष
निर्मुलन आणि विकास मंचानं केली आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळी आणि आत्महत्या प्रवण
भागाचा विकास होईल, अशी अपेक्षा मंचानं काल प्रसिध्द केलेल्या पत्रकातून व्यक्त केली
आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं एका जिनिंगचे
व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाच्यावतीनं
काल मानवत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. कापसाला भाव देण्याच्या मागणीवरून ही
मारहाण करण्यात आली होती. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करावा, अशा मागणीचं निवेदन,
व्यापारी महासंघांनं पोलिस प्रशासनाला सादर केलं.
****
राज्यात काल सर्वात जास्त ४५ अंश सेल्सिअस
तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी आणि नांदेड इथं ४३ अंश, बीड ४२, उस्मानाबाद
४० पूर्णांक सात, तर औरंगाबाद इथं ३९ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या परळी इथले सराफा
व्यापारी अजय सोनपेठकर यांचा काल उष्माघातानं मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून
तापमानात लक्षणीय वाढ झाली असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment