Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
गडचिरोली
जिल्ह्यात नक्षल विरोधी अभियानांतर्गत झालेल्या कारवाईत आज चौदा नक्षलवादी मारले गेले.
ताडगाव कसनूर जंगलात ही चकमक झाली. भामरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी साडे
नऊ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला,
सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चौदा नक्षलवादी मारले गेले, तर
अनेक नक्षलवादी पसार झाले. या घटनास्थळावरून सुरक्षा दलानं काही बंदुका आणि इतर साहित्यही
हस्तगत केलं आहे.
****
फरार
हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कंपन्यांविरोधात पंजाब नॅशनल बँकेनं हाँगकाँगच्या न्यायालयात
वसूली याचिका दाखल केली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली. नीरव मोदी
आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या जिथे जिथे मालमत्ता आहेत, तिथल्या न्यायालयांमध्ये अशा
याचिका दाखल करणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितलं. नीरव मोदीनं बँकेकडून घेतलेलं
कर्ज वसूल करण्याचा भाग म्हणून ही कार्यवाही करण्यात येत आहे.
****
भारताचे
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी आणलेला महाभियोग प्रस्ताव
राज्यसभेचे अध्यक्ष एम.वेंकय्या नायडू यांनी फेटाळल्यास त्या निर्णयाला काँग्रेस सर्वोच्च
न्यायालयात आव्हान देईल, असं या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या
अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाऊ शकतं, असं सांगत, आतापर्यंत ज्या न्यायमूर्तींवर
महाभियोग प्रस्ताव दाखल झाले, ते स्वत:हून न्यायालयीन कामकाजापासून दूर राहिले, आणि
आता सरन्यायाधीशांनीही असंच केलं पाहिजे, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
****
सीताराम
येचुरी यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी पुन्हा नियुक्ती झाली आहे.
हा निर्णय आज हैदराबाद इथं पक्षाच्या बावीसाव्या अधिवेशनात सर्वसहमतीनं घेण्यात आला.
या पदावर येचुरी यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल.
****
महाराष्ट्रात
सहा ठिकाणी कृषी निर्यात प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्थळ
निश्चित करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि
उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
देशात ठिकठिकाणी कृषी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात येणार असून, या केंद्रांमधून प्रक्रिया
केलेला माल संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया या आखाती देशांना निर्यात केला जाणार
आहे. त्यासाठी ही निर्यात प्रक्रिया केंद्र उभारली जात आहेत.
यंदा
साखरेची संभाव्य उत्पादन वाढ लक्षात घेता, साखर निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे,
मात्र याबाबत अन्य बाबी कृषी आणि नागरी पुरवठा मंत्रालय निश्चित करेल, असं प्रभू यांनी
सांगितलं.
औरंगाबादमध्ये
औद्योगिक क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी देखील मोठी संधी असल्याचं सांगतानाच,
देशात सेवा क्षेत्रात ३० टक्के वाढीचं उद्दिष्ट असल्याचं उद्योग मंत्री म्हणाले.
****
पैठण
इथल्या खुल्या जिल्हा कारागृहातल्या कैद्यांनी साडेतीनशे एकर शेतजमिनीवर गेल्या आर्थिक
वर्षात पंच्याऐंशी लाख रुपयांचं उत्पन्न मिळवून राज्यातल्या कारागृहांमध्ये पहिला क्रमांक
मिळवला आहे. या कारागृहातल्या अडीचशे कैद्यांकरवी फळभाज्या, पालेभाज्या, धान्यं पिकवलं
जाऊन त्याचा राज्यातल्या इतर कारागृहांना पुरवठा केला जातो, तर कडधान्यं महाबीज महामंडळाकडे
देऊन त्याचा महसूल कारागृह विभागाकडे सोपवला जातो. शेतीसोबतच पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन
आणि दुग्ध व्यवसायही कैद्यांकरवी केला जातो.
****
अहमदनगर
जिल्ह्यात श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावर खंडाळा गावाजवळ नांदूर शिवारात ट्रक आणि
कारच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ऊस वाहतूक करणाऱ्या धावत्या ट्रकचं टायर फुटून
तो कारवर उलटल्यानं, हा अपघात झाला. अन्सार पटेल असं मृत कारचालकाचं नाव असून, ते श्रीरामपूर
इथले नगरसेवक अल्तमश पटेल यांचे वडील होत.
****
जालना
शहरात नियोजित डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी योग भवनाचं भूमिपूजन आज भाजप प्रदेशाध्यक्ष
खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झालं. विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बांधण्यात
येत असलेल्या या योगभवनासाठी पाच कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. जिल्ह्यात सहा हजार
कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असून, अन्य पायाभूत सुविधांसाठी शासनानं
मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचं खासदार दानवे यांनी या वेळी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment