Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 21 April 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ एप्रिल
२०१८
दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रकुल देशांनी २०२० पर्यंत एकत्रितरित्या सायबर सुरक्षेबाबत
कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राष्ट्रकुलचे सदस्य असलेल्या ५३ देशांच्या प्रमुखांच्या काल लंडनमध्ये झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण
निर्णय घेण्यात आला. या बैठकीत सायबर सुरक्षेच्या रणनितीमधल्या सुरक्षेबरोबरच याबाबतच्या
धोक्याचा कठोरपणे सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या
गटांबरोबर राजकीय मदतीनं काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्याचा निर्धारही
व्यक्त करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मन चान्सलर ॲन्जेला
मर्केल यांनी उभय देशांमधल्या अनेक विषयांबरोबरच जागतिक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा
केली. पंतप्रधान मोदी यांनी लंडनमध्ये झालेल्या राष्ट्रकुल देशांच्या बैठकीनंतर जर्ननीमध्ये
मर्केल यांची भेट घेतली. जर्मनीचे अध्यक्ष फ्रँक वाल्टर यांनी गेल्या महिन्यात भारताच्या
दौऱ्यावेळी दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला होता. पंतप्रधान
मोदी यांच्या या भेटीमध्येही आर्थिक संबंधांबाबत अधिक सखोल चर्चा करण्यात आली.
****
विषांणूंपासून होणाऱ्या काविळ या रोगाला प्रतिबंध
करण्याबाबत आरोग्य मंत्रालयानं एक योजना आखली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा
यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. या योजनेमध्ये ५१७ कोटी रुपये खर्च करून देशभरात
येत्या तीन वर्षांमध्ये शंभर उपचार आणि ६६५ तपासणी केंद्रांची स्थापना करण्यात येणार
आहे. तसंच या योजनेत या आजाराबाबत जनजागृती, लसीकरण, आजाराचं निदान, क्षमता निर्मिती
आणि संशोधन यासारखे कार्यक्रम देखील राबवण्यात येणार आहेत. जागतिक स्तरावर विषाणूंपासून
होणाऱ्या काविळला जागतिक आरोग्याशी निगडीत समस्या म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
****
आधार
कार्डला मतदान ओळखपत्राशी जोडणी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात
दाखल करण्यात आली आहे. १२
अंकी वैशिष्ट्यपूर्ण ओळख क्रमांकाच्या
घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांसंदर्भात निकाल दिल्यानंतर या याचिकेची सुनावणी
करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
****
छत्तीसगढमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत
झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे एक जवान शहीद झाले. काल रात्री ही चकमक
झाली. किस्ताराम क्षेत्रात जवान शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्या ताफ्यावर
हल्ला केल्यानंतर ही चकमक सुरु झाली.
****
औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड-ऑरिक बिडकीन,
या औद्योगिक क्षेत्राचं भूमीपूजन आज होणार आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय
उद्योग मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योग मंत्री सुभाष
देसाई, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात ऑरिक ॲप लोकार्पण तसंच ऑरिक इरादा
पत्रांचं हस्तांतरणही केलं जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज औरंगाबाद
नजिक आसेगाव इथं, पाणी पुरवठा योजनेचं लोकार्पण होणार आहे.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी
केल्याबद्दल बीड जिल्ह्याला प्रधानमंत्री उत्कृष्ट लोकप्रशासन पुरस्कार जाहीर झाला
आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. आज दिल्ली इथं बीडचे जिल्हाधिकारी
एम डी सिंह तसंच जिल्हा कृषी अधीक्षक एम एल चपळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
दरम्यान, राज्यातल्या ३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानक पुरस्कार मिळवला
आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत
हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
औरंगाबाद शहरातली कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी
वैज्ञानिक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया करावी, असे निर्देश विभागीय
आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत. शहर कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीच्या
बैठकीत ते बोलत होते. दररोज संपूर्ण कचरा उचलून त्याच्या वर्गिकरणावर भर देऊन योग्य
व्यवस्थापन करावं, असं ते म्हणाले. कचरा समस्येच्या निराकरणासाठी दररोज केलेल्या कार्यवाहीचा
आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना यावर्षीच्या हंगामासाठी
प्राधान्यानं सर्वच बँकांनी नव्यानं कर्जपुरवठा करावा, असे निर्देश पालक सचिव एस एस
संधू यांनी दिले आहेत. परभणी इथं यासंदर्भातल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत
होते. यावेळी विविध विभागांचा आणि योजनांचा आढावा घेण्यात आला.
****
पुणे शहरात मार्केटयार्ड इथल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीत
आज भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. पुणे अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आणि तीन टँकरच्या
सहाय्यानं आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment