Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 23 April 2018
Time
6.50AM to 7.00AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२३ एप्रिल
२०१८ सकाळी
६.५०
मि.
****
Ø गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या जंगलात नक्षल विरोधी कारवाईत
सोळा नक्षलवादी ठार
Ø बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्याच्या अध्यादेशाला राष्ट्रपतींची
मंजुरी
Ø कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी
समन्वयानं काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे
निर्देश
आणि
Ø राज्यात सहा ठिकाणी कृषी निर्यात प्रक्रिया केंद्र सुरू
करण्यात येणार- केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या जंगलात नक्षल विरोधी
अभियानांतर्गत झालेल्या कारवाईत काल सोळा नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आल्याचं पोलिसांनी
सांगितलं. या चकमकीत नक्षलवाद्यांचा विभागीय समितीचा सदस्य साईनाथ, सिनू आणि इतर काही
कमांडर ठार झाल्याचं वृत्त आहे. ताडगाव कसनूर भागात सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी
अभियान राबवत असताना बोरिया जंगलात पोलीस आणि नक्षवाद्यांमध्ये ही चकमक उडाली. सुरक्षा
दलाच्या गस्ती पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला, सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल
केलेल्या कारवाईत सोळा नक्षलवादी मारले गेले, तर अनेक नक्षलवादी पसार झाले. या घटनास्थळावरून
सुरक्षा दलानं काही बंदुका आणि इतर साहित्यही हस्तगत केलं आहे.
****
१२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांवर लैंगिक अत्याचाराच्या
गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी मंजुरी दिली आहे. आता हा अध्यादेश देशभरात लागू झाला आहे. यानुसार १२ वर्षांखालील
बालकांवर लैंगिक अत्याचारासाठी फाशी, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या - किशोरवयीनांवर
लैंगिक अत्याचारासाठी पूर्वीच्या १० वर्षांऐवजी २० वर्ष तुरुंगवास, किंवा जन्मठेपेची
तरतूद करण्यात आली आहे.
फरार आर्थिक गुन्हेगार अध्यादेशालाही राष्ट्रपतींनी
मंजूरी दिली. या अध्यादेशानुसार आर्थिक गुन्ह्यानंतर फरार झालेल्यांची तसंच कर्ज बुडव्यांची
संपत्ती, आता जप्त करता येणार आहे.
****
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर काँग्रेस आणि
इतर पक्षांनी आणलेला महाभियोग प्रस्ताव राज्यसभेचे अध्यक्ष एम.वेंकय्या नायडू यांनी
फेटाळल्यास त्या निर्णयाला काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, असं काँग्रेसच्या
ज्येष्ठ नेत्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत ज्या न्यायमूर्तींवर महाभियोग प्रस्ताव दाखल
झाले, ते स्वत:हून न्यायालयीन कामकाजापासून दूर राहिले, आता सरन्यायाधीशांनीही असंच
केलं पाहिजे, असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.
****
हज यात्रेसाठी यंदा अनुदान नसूनही देशातून विक्रमी
संख्येनं मुस्लिमधर्मीय यात्रेला जाणार असल्याची
माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. ते काल मुंबईच्या
हज हाऊस इथं बोलत होते.
सलग दुसऱ्या वर्षी हज यात्रेसाठी भारतीय यात्रेकरूंचा
कोटा वाढवून घेण्यात सरकारला यश आल्याचं ते
म्हणाले. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर अकारण
भाडं वाढवू नये यासाठी विमान कंपन्यांना निर्देश दिले जाणार असून यात्रेच्या सर्व प्रक्रियेत
पारदर्शकता ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.
****
कपाशीवरील
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नागपूर इथं काल बोंडअळीवरील उपाययोजनांबाबत बैठक
पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बोंडअळीची समस्या उद्भवणार नाही, यासाठी
विशेष उपाययोजना करण्याचे तसंच सेंद्रिय शेती -गटशेतीला प्रोत्साहन देणं गरजेचं
असल्याचं फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलतांना कृषीमंत्री फुंडकर यांनी राज्यातल्या बाजारपेठेत बिगर बीटी बियाणं
उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात बीटी बियाणं वापरावं लागणार असल्याचं सांगितलं.
कृषी विद्यापीठं आणि कृषी संशोधन केंद्रांना बिगर बीटी बियाणं विकसित करण्याच्या सूचना
देण्यात आल्या असल्याचं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या
कार्यक्रमातून देशवाशियांशी संवाद साधणार आहे. या कार्यक्रमाचा हा ४३ वा भाग असणार आहे. नागरिक त्यांचे विचार आणि
सूचना, नरेंद्र मोदी हे भ्रमणध्वनी ॲप किंवा
माय जीओव्ही संकेतस्थळ, याशिवाय अठरा-शून्य
शून्य-अकरा- अठ्ठ्याहत्तर-शून्य-शून्य या मोफत दूरध्वनी क्रमांकावर आपला संदेश हिंदी किंवा इंग्रजीत पाठवू शकतात. यापैकी निवडक संदेश या कार्यक्रमात प्रसारित होऊ शकतील.
****
राज्यात आजपासून
रस्ते सुरक्षा मोहिमेला प्रारंभ होत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन
मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन होईल. सात मे पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत विविध जनजागृतीपर
कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
*****
महाराष्ट्रात सहा ठिकाणी कृषी निर्यात प्रक्रिया
केंद्र सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्थळ निश्चित करण्याच्या सूचना राज्य सरकारला
देण्यात आल्या आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी काल औरंगाबाद
इथं पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले
कृषी निर्यात निती ही आपण
आपल्या सरकारने तयार केली आणि त्या मधून देखील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याला प्रचंड मोठी संधी निर्माण होईल. परंतु हा एक भाग
झाला नितीचा, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं
आहे. अशी सहा ठिकाणं आपण शोधून काढू किमान, जास्त झाले तर काही हरकत नाही. त्या ठिकाणी इक्पोट प्रोसेसिंग सेंन्टर
काढून शेती मालाचं तिकडचाच माल घेतला जाईल. अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सरकारनं
मान्य केल आहे आणि त्या साठी सरकार गुंतवणूक करण्यास स्वत: देखील तयार आहे.
पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी
देशात सेवा क्षेत्रासाठी ३० टक्के वाढीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यादृष्टीनं
राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय सेवा क्षेत्र वाढीसाठीचं नियोजन करण्यात येत असल्याचं उद्योग
मंत्री प्रभू म्हणाले. औरंगाबादमध्ये सेवा क्षेत्राच्या विकासासाठी वाव असल्याचं सांगतांना
ते म्हणाले,
औरंगाबाद ज्या प्रमाणे औद्योगिक
क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे. तसंच सेवा क्षेत्राच्या वाढीसाठी देखील औरंगाबाद
मध्ये प्रचंड वाव आहे आणि त्यामध्ये पर्यटन
हा एक भाग झाला पण बाकीच्या सर्व दृष्टीनही होऊ शकतो.
****
जालना शहरात नियोजित डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी
योग भवनाचं काल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भूमिपूजन झालं.
विशेष वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या या योगभवनासाठी पाच कोटी
रुपये खर्च अंदाजित आहे. जिल्ह्यात सहा हजार कोटी रुपयांच्या सिमेंट रस्त्यांची कामे
सुरू असून, अन्य पायाभूत सुविधांसाठी शासनानं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचं
खासदार दानवे यांनी या वेळी सांगितलं.
****
साहित्यात
लेखककेंद्री परंपरा बदलणं, गरजेचं असल्याचं मत,
ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर हरिश्चंद्र थोरात यांनी व्यक्त केलं
आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त, काल औरंगाबाद इथं, मराठवाडा साहित्य परिषदेच्या
वतीनं आयोजित चर्चासत्रात ते
बोलत होते. साहित्यामध्ये वाचक आणि वाचन
प्रक्रीयेला केंद्रस्थानी ठेवणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. दोन सत्रात
झालेल्या या
कार्यक्रमात विंदा करंदीकरांच्या साहित्यावर आधारित चर्चा तसंच विविध निबंधांचं वाचन
करण्यात आलं.
****
पाणी फाउन्डेशनचं काम हे जलयुक्त शिवार योजनेला पुरक
असल्याचं या संस्थेचे प्रमुख डॉक्टर अविनाश पोळ यांनी नमूद केलं आहे. ते काल लातूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते. लातूर जिल्ह्यात औसा, निलंगा आणि देवणी तालुक्यातल्या
एकूण १७१ गावांनी जलसंधारणाची कामं करण्यासाठी
या संस्थेच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतल्याची माहिती पोळ यांनी यावेळी दिली. जलमित्र
चळवळीद्वारे संस्थेनं जलसंधारण कामांचं प्रशिक्षण दिलेले लोक राज्यात संबंधित गावं
पाणीदार करण्यासाठी प्रयत्न करत असून लोकसहभागातून
श्रमदानामुळे जवळपास सहाशे गावं टॅंकर मुक्त झाली. तर, बऱ्याच गावात शेतकरी दोन वेळा पिकं घेत असल्याचं पोळ म्हणाले.
बीड जिल्ह्यात पाच तालुक्यातल्या २९० गावांनी वॉटर
कप स्पर्धेत भाग घेतला असल्याचं पोळ यांनी बीड इथं वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
*****
औरंगाबाद इथं काल चौथ्या शेक्सपिअर महोत्सवाचं आयोजन
करण्यात आलं होतं. यात नाट्यक्षेत्राचे अभ्यासक-लेखक आशुतोष पोतदार यांचं ‘समकालीन
भारतीय रंगभूमी’या विषयावर व्याख्यान झालं. त्यानंतर शेक्सपिअरच्या विविध नाटकांमधील निवडक प्रसंगांचं
सादरीकरणही करण्यात आलं.
****
औरंगाबादच्या महागामी या नृत्य प्रशिक्षण गुरुकुलातर्फे
काल ‘दृष्टीकोन’ या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. शिल्पकला आणि नृत्य, नृत्य
प्रकारांवरचं लिखाण, नृत्यासाठीची प्रकाशयोजना तसंच नृत्यकलेतील संधी याबाबत तज्ञांनी
मार्गदर्शन केलं.
*****
***
No comments:
Post a Comment