Friday, 27 April 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.04.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 April 2018

Time 6.50AM to 7.00AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ एप्रिल २०१ सकाळी .५० मि.

****

·                    ॲट्रोसिटी कायदा सक्षम ठेवण्यासाठी गरज भासल्यास अध्यादेश जारी करणार - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत ांची ग्वाही

·                    एसटी महामंडळामध्ये नवीन कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत रद्द

·                    दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करण्याची राज्य किसान सभेची मागणी

·                    राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची शिफारस

आणि

·                    आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या एकाला लातूर इथून अटक  

****

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रोसिटी कायदा सक्षम ठेवण्यासाठी गरज भासल्यास केंद्र सरकार अध्यादेश जारी करेल, अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. या कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निर्णयावर सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केली आहे, या याचिकेवरचा निर्णय सरकारच्या विरोधात गेल्यास, अध्यादेश काढून कायद्याची सक्षमता अबाधित ठेवू, असं गेहलोत म्हणाले. ॲट्रोसिटी कायदा तसंच आरक्षण कायम राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वयोश्रीयोजनेचा आरंभ गहलोत यांच्या हस्ते, काल मुंबई इथं झाला, वयोश्रीयोजनेच्या माध्यमातून दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना काठी, वॉकर आणि इतर उपयोगी साहित्य मोफत दिलं जातं. गेहलोत यांच्या हस्ते यावेळी ऑनलाईन नोंदणी प्रणालीचंही उद्घाटन करण्यात आलं.

****

एसटी महामंडळामध्ये भरती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी कनिष्ठ वेतनश्रेणीची पध्दत रद्द करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल ही घोषणा केली. महामंडळात भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सध्या एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावं लागतं असल्यामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं. ही अडचण लक्षात घेता, कनिष्ठ वेतन श्रेणीची पद्धत रद्द करण्यात येत असून, संचालक मंडळाच्या आगामी बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होईल, असंही रावते यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या १९२ तूर खरेदी केंद्रांवर कालपर्यंत २५ लाख ४७ हजार ८१७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल ही माहिती दिली. दोन लाख चार हजार ४८३ शेतकऱ्यांकडून ही तूर खरेदी करण्यात आली आहे. केंद्र शासनाने तूर खरेदीला नुकतीच १५ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

दरम्यान, एक मार्चपासून हमीभावाने हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत २२ हजार ६५६ शेतकऱ्यांकडून तीन लाख दहा हजार २४४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

****

राज्याला मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी नियोजनबद्ध योजना आखावी अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. काल मुंबई इथं आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. राज्यात नीलक्रांती करण्यासाठी आपलेच सीड-आपलेच फीड’ ही संकल्पना राबवण्याची गरज मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

****

दूध उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा भरून काढण्यासाठी शासनानं भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी केली आहे. काल अहमदनगर इथं, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. शासनानं गायीच्या दुधाचा खरेदी दर २७ रुपये प्रतिलीटर निश्चित केला आहे, मात्र उत्पादकांना प्रतिलीटर १७ रुपये दर मिळतो, याच्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाखगंगा इथल्या दूध उत्पादकांनी येत्या तीन ते नऊ मे दरम्यान मोफत दूध वाटपाचा निर्णय घेतल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

याच धर्तीवर येत्या एक मे रोजी राज्यभरात ग्रामसभा घेऊन, आठवडाभर मोफत दूध वाटपाचा ठराव घेण्यात येणार आहे, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोफत दूध वाटप करणार असल्याचं नवले यांनी सांगितलं. ग्राहकांना भेसळयुक्त दूध विकलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमदार सुनील तटकरे यांची पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदी नियुक्ती केली आहे. तटकरे यांचा, राज्य प्रदेशाध्यक्ष पदाचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून, येत्या २९ तारखेला पुण्यात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत नवीन प्रदेशध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता, पीटीआय या वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे.

****

छत्तीसगडमध्ये जवळपास साठ नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं. यामध्ये २० महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांचं पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असं पोलिस प्रशासनानं म्हटलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ एप्रिलला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशावासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४३वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळनं कर्णधार विराट कोहलीची सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी माजी कर्णधार सुनील गावसकर यांची तर १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. मंडळाच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. 

****

आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या एकाला लातूरच्या गुन्हे अन्वेषण विभागानं अहमदपूर इथून अटक केली. रियाज पटेल असं या व्यक्तीचं नाव असून, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या सामन्यावर सट्टा लावत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्या ताब्यातून एलसीडी दूरचित्रवाणी संच, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ऐवज जप्त करण्यात आला.

****

साखर उद्योगाला दिलासा देणारे निर्णय, केंद्र सरकार आगामी काळात घेईल अशी अपेक्षा पश्चिम भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. देशभरातल्या सहकारी तसंच खाजगी साखर कारखानदारांनी साखर उद्योग वाचवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली,या भेटीत कारखानदारांच्या शिष्टमंडळानं सात मुद्यावर चर्चा करुन मागण्या आणि उपाय सुचवले आहेत,येत्या आठवडाभरात शासनाकडून यावर  सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं ठोंबरे यांनी सांगितलं.

****

उस्मानाबाद तालुक्यातल्या येडशी इथल्या गुरुकुल संस्कृत महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आचार्य सुभाषचंद्र शास्त्री यांच्या पार्थिव देहावर काल येडशी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. शास्त्री यांचं परवा बुधवारी निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते.

****

औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तपदी डॉ.निपुण विनायक यांची बदली करण्यात आली आहे. सध्या केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियान या उपक्रमाचे सचिव असलेले विनायक यांचे बदली आदेश काल जारी करण्यात आले. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून ह्या पदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.

****

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी जिल्ह्यातल्या प्रत्येक बँकेनं कर्ज द्यावं असे निर्देश अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. खरिप पीक कर्ज वाटपासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल अहमदनगर इथं बोलत होते. आतापर्यंत बँकांनी पीक कर्ज वाटपात सकारात्मक कामगिरी केलेली नाही, अशी नाराजी द्विवेदी यांनी यावेळी  व्यक्त केली.

****

जालना जिल्ह्यात पोलिसांनी दहा टन गारगोटी सदृश दगड जप्त केला. या दगडाची किंमत अंदाजे चाळीस लाख रूपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दगडवाडी शिवारात सुरु असलेल्या अवैध उत्खननावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली.

****

जिल्हा परिषद शाळांनी नवनवीन प्रयोग करुन शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करावे, असं तुळजापूरचे गटविकास अधिकारी भागवत शंख यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या यमगरवाडी इथं मंगरुळ बीट विभागातल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना सावित्री जोतिबा फुले पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. मंगरुळ बीटमधल्या शाळांचा ई लर्निंग, डिजिटल वर्गखोलीचा पॅटर्न राज्यात पथदर्शी ठरावा, असं ते म्हणाले.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयतल्या निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. परवा रात्री रूग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्यामुळे हा संप पुकारल्याची माहिती घाटी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली.

****

शासनानं थांबवलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया पुन्हा चालू करावी, या मागणीसाठी रंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल सेट-नेट-पीएचडी धारकांनी आंदोलन केलं. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर सरकार विरोधात घोषणाबाजी करत त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदनही विद्यापीठाकडे सादर केलं.

//***********//


No comments: