आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
स्वयंघोषित
अध्यात्मिक गुरू आसाराम बापूसह इतर चार आरोपींना २०१३ सालच्या बलात्कार प्रकरणी जोधपूर न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. या प्रकरणाच्या
शिक्षेबाबत दोन्ही पक्षांतर्फे युक्तीवाद सुरू आहे. गेली चार वर्षं आसारामबापू जोधपूर
मध्यवर्ती कारागृहात असून, सुरक्षेच्या कारणामुळे न्यायालय या कारागृहातच याबबतचं काम
पाहत आहे. जोधपूर इथे कडक सुरक्षा व्यवस्था
तैनात केली असून, प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. या प्रकरणातल्या पीडितेच्या शहाजहानपूर
इथल्या घरालाही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
****
अतिरेकी संघटनांचा
बचाव करतील अशी राजकीय सोयीची वक्तव्यं इथून पुढे खपवून घेतली जाणार नाहीत, असा, पाकिस्तानकडे
उघड निर्देश करणारा इशारा भारतानं दिला आहे. संरक्षणमंत्र्यांच्या शांघाय सहकार्य परिषदेच्या
बैठकीत काल बीजिंग इथे बोलताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी हे वक्तव्य केलं.
यावेळी सीतारमण यांनी सीमा पलिकडूनचा दहशतवाद, सायबर सुरक्षा आणि मादक द्रव्यांची तस्करी
या मुद्द्यांवर विचार मांडले.
****
सक्त वसुली
संचालनालयानं विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालमत्ता जप्त करण्याची
प्रक्रिया सुरू केली आहे. फरार आर्थिक गुन्हेगार अध्यादेश लागू झाल्या बाबतची घोषणा
नुकतीच झाल्यानंतर संचालनालयानं ही कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे
करून देशाबाहेर पळून गेलेल्या आणखी काही गुन्हेगारांच्या बारा हजार कोटींहून अधिक मूल्याच्या
संपत्तीवर सक्त वसुली संचालनालयाचं लक्ष असून, ही संपत्तीही लवकरच जप्त केली जाऊ शकते.
****
महाराष्ट्र
शिक्षक पात्रता परीक्षा येत्या आठ जुलैला घेण्यात येणार आहे. येत्या १५ मे पर्यंत यासाठीचे
ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या परीक्षेशी संबंधित सगळी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
राज्यात काल
सर्वात जास्त ४४ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथे नोंदवलं गेलं. परभणी
इथे ४२ पूर्णांक नऊ, तर औरंगाबाद इथे ३९ पूर्णांक
सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
*****
***
No comments:
Post a Comment