Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ एप्रिल २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
स्वयंघोषित आध्यात्मिक
गुरू आसाराम याला जोधपूरच्या विशेष अनुसूचित जाती जमाती न्यायालयानं आज आजन्म कारावासाची
शिक्षा सुनावली. पाच वर्षापूर्वी आपल्या आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
केल्याप्रकरणी आसाराम याला ही शिक्षा सुनावण्यात आली. सत्त्याहत्तर वर्षीय आसाराम गेल्या
साडे चार वर्षांपेक्षा अधिक काळापासून ज्या जोधपूर कारागृहात आहे, तिथेच विशेष न्यायालय
भरवून, न्यायाधीश मधुसूदन शर्मा यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात आसाराम याला मदत
करणारे, शिल्पी आणि शरद या अन्य दोघा दोषींना न्यायालयानं, प्रत्येकी वीस वर्षं कारावासाची
शिक्षा सुनावली, तर, प्रकाश आणि शिवा या दोघांची मुक्तता केली. आसाराम विरोधात गुजरातमधल्या
सूरत इथे लैंगिक अत्याचाराचा अजून एक खटला सुरू आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या
अर्थविषयक समितीनं कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली
आहे. आता ही किंमत याआधीच्या प्रति क्विंटल साडे तीन हजार रुपयांवरून तीन हजार सातशे
रुपये, इतकी करण्यात आली आहे. राष्ट्रीय बांबू अभियानाच्या केंद्र पुरस्कृत योजनेलाही
या समितीनं मान्यता दिली आहे. या योजनेमुळे बांबू उत्पादक शेतकरी तसंच बांबूक्षेत्राशी
संबंधित कामगार आणि हस्तकलाकार यांना लाभ होणार आहे.
****
राज्यातली कायदा
आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून, राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असले पाहिजेत अशी
मागणी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज अहमदनगर इथे पत्रकार परिषदेत
बोलत होते. शिवसेनेच्या मंत्र्यांना त्यांचे अधिकार वापरू दिले जात नाहीत, अशी टीकाही
ठाकरे यांनी केली.
केडगाव हत्याकांडातल्या
मयत शिवसैनिकांच्या कुटुंबियांची आज ठाकरे यांनी भेट घेतली. शिवसेनेने या दोन्ही कुटुंबांची
जबाबदारी घेतली असून त्यांना आर्थिक मदतही देण्यात आली असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं.
या हत्याकांडातले आरोपी फासावर लटकलेच पाहिजेत, हा खटला जलदगती न्यायालयात चालला पाहिजे
आणि यासाठी सरकारनं विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली पाहिजे, असंही ठाकरे
यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, केडगाव
दुहेरी हत्याकांडानंतर शहरात निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती हाताळताना,
पोलिसखात्याला अशोभनीय वर्तन करत, कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून, अहमदनगरच्या
कोतवाली पोलिस ठाण्यातल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी याबाबतचा आदेश जारी केला. अविनाश बर्डे, रवींद्र
टकले, सुमीत गवळी आणि समीर सय्यद, अशी या चार कर्मचाऱ्यांची नावं आहेत.
****
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे
योगतज्ज्ञ डॉक्टर धनंजय गुंडे यांचं आज केरळमधल्या कल्पेटा इथे निधन झालं. ते ऐंशी
वर्षांचे होते. मूळ कोल्हापूरचे असलेले डॉक्टर गुंडे केरळमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे
गेलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यातंच त्यांचं निधन झालं. महाराष्ट्रासह
देशात आणि परदेशांमध्ये त्यांनी गेल्या पन्नास वर्षांमध्ये हजारो योग शिबिरं घेतली
होती. लेखनाच्या माध्यमातूनही त्यांनी योगविद्येचा प्रसार केला होता.
****
जालना जिल्ह्यातल्या
परतूर तालुक्यातल्या मायपाटोदा गावाचा ग्रामसेवक नागरे याच्याविरोधात सात हजार रुपये
लाचेची मागणी केल्याबद्दल जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला
आहे. तक्रारदारानं खरेदी केलेल्या भूखंडाची नोंदणी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली
होती.
****
औरंगाबादमध्ये आज
इंडियन मेडिकल असोशिएशनच्या वतीनं शहरात सायकल फेरी काढून ‘नो हॉर्न डे’ पाळण्यात आला.
वाहन धारकांमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या फेरीचा उद्देश
होता. या फेरीमध्ये शहरातले विविध क्षेत्रातले नागरिक तसंच डॉक्टर्स सहभागी झाले होते.
****
बीड जिल्ह्यात संजय
गांधी निराधार योजना तसंच श्रावण बाळ योजनेतल्या लाभार्थींची बंद झालेली खाती पुन्हा
सुरू करण्यात येणार आहेत. दोन मे ते ३१ मे कालावधीत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या
हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, हा जिल्हा हिवताप निर्मूलनाकडे
वाटचाल करत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. २००८मध्ये रुग्णसंख्या दोनशे बत्तीस
होती, ती २०१७ मध्ये बत्तीस वर आली आहे. स्वच्छता अभियानामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती
होऊन हा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment